डीएसके : ३००० कोटींचा घोटाळा झाला तरी कसा?

बँक घोटाळा, बँक ऑफ महाराष्ट्र, डीएसके फसवणूक Image copyright DSK WEBSITE
प्रतिमा मथळा कसा झाला 3000 कोटींचा बँक घोटाळा?

पुण्याचे प्रथितयश बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी उर्फ डीएसके हे सध्या बँकांची कर्ज थकवल्याबद्दल आणि गुंतवणुकदारांचे पैसे बुडवल्या प्रकरणी पुण्याच्या येरवडा तुरुंगात आहेत. यातल्या थकित कर्ज प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना काल पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली.

शून्यातून विश्व निर्माण करणारा उद्योगपती अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या डी. एस. कुलकर्णी यांचं नाव इतक्या मोठ्या घोटाळ्याप्रकरणात आलं तरी कसं?

बुधवारी झालेल्या कारवाईत ज्या अधिकाऱ्यांना अटक झाली त्यात व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठेही आहेत.

त्यांच्याबरोबर माजी कार्यकारी अधिकारी सुशील मुनहोत, विभागीय अधिकारी नित्यानंद देशपांडे यांनाही अटक झाली आहे.

पुणे पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, या चारही अधिकाऱ्यांवर अधिकारांचा गैरवापर करून वाईट हेतूने, कागदपत्रांची छाननी न करता डीएसके असोसिएट्स या कंपनीला मोठ्या रकमेची कर्ज दिल्याचा संशय आहे.

काय आहे घोटाळा?

थोडक्यात म्हणजे डीएसकेंना कर्ज देणं, त्यांनी ती बुडवणं यात अधिकाऱ्यांचा हात होता असा हा आरोप आहे. डीएसकेंना विविध बँकांनी दिलेली कर्जं ही थोडीथोडकी नाहीत तर ३००० कोटींच्या आसपास आहेत.

त्यामुळे हा घोटाळ्याची व्याप्तीही खूप मोठी आहे.

Image copyright VIJAY KUMBHAR
प्रतिमा मथळा डीएसके यांचा कर्ज घोटाळा अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाला का?

डीएसके यांनी तेजीच्या काळात आपल्या कंपनीद्वारे मुदत ठेवीही सुरू केल्या होत्या. गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद देत त्यांच्याकडे जवळजवळ १ हजार ११५ कोटी रुपये गुंतवले.

हे पैसेही गुंतवणूकदारांना परत मिळालेले नाहीत. गृहनिर्माण प्रकल्प उभारणं हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. तर तिथेही गुंतवणूकदार अडकले आहेत. लोकांना घरांचा ताबा मिळालेला नाही.

सगळ्याच बाजूने गुंतवणूकदारांचे हाल झाल्यावर त्यांनी एकत्र येऊन चौकशी सुरू केली. तेव्हा एकेक प्रकरणं बाहेर आली.

बँकेत केलेला कर्ज घोटाळा हा आपल्याच नातेवाईकांच्या नावाने नवीन कंपन्या उघडून त्यांच्याकडच्या जमिनी डीएसके असोसिएट्स या मुख्य कंपनीला दामदुप्पट दराने विकण्याच्या षड्यंत्रातून घडला आहे.

कारण अवास्तव दराने जमिनी घेण्यासाठी बँकांकडून बेकायदेशीर कर्जं उचललं आहे आणि या कर्जांची परतफेड झालेली नाही.

बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाला घोटाळा?

बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ देवीदास तुळजापूरकर यांच्याकडून बीबीसीने बँक घोटाळा समजून घेतला.

ते म्हणाले, घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही तेव्हा कर्जाचं खातं नॉन परफॉर्मिंग होतं. म्हणजे अधिकृतपणे बुडित कर्जाच्या यादीत जातं. त्यालाच नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणतात.

"पण, तसं झालं तर अशा व्यक्तीला नवीन कर्ज देता येत नाही. म्हणून मग डीएसके यांचं खातं बुडित व्हायला आलं की लगेच बँक अधिकारी संगनमताने त्यांना छोट्या मुदतीचं नवीन कर्जं द्यायचे. त्यामुळे लगेचचा हप्ता भरला जाऊन खातं बुडित होण्यापासून वाचायचं." तुळजापूरकर यांनी सांगितलं.

Image copyright VIJAY KUMBHAR
प्रतिमा मथळा कर्जाचं खातं नॉन परफॉर्मिंग झाल्यावर उघड झाला घोटाळा

"शिवाय नवीन कर्जं देतानाही नियम डावलले जात होते. कमी मुदतीचं कर्जं देणं हे बँकांकडून सर्रास केलं जातं. पण, डीएसके कर्जच फेडू शकले नाहीत तेव्हा सगळं प्रकरण बाहेर आलं," ते म्हणाले.

"कारण, काही कर्जं कागदपत्रं पूर्णपणे न तपासता दिली गेली होती. नवीन कर्ज घेऊन जुनी फेडायचं सत्र अवैधरित्या दहा वर्षं सुरू होतं," तुळजापूरकर यांनी प्रकरण आणखी स्पष्ट करून सांगितलं.

बँक ऑफ महाराष्ट्र बँकेनं डीएसके यांना दिलेलं कर्ज सुमारे सव्वादोनशे कोटी रुपयांचं आहे.

कसा घडवून आणला घोटाळा?

डीएसके म्हणजे दीपक सखाराम कुलकर्णी. शून्यातून वर आलेला उद्योजक अशी त्यांची प्रतिमा त्यांनी मागची २०-३० वर्षँ मराठी माणसाच्या मनात निर्माण केलेली आहे.

शिवाय एखाद्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या भूमीपूजनाच्या दिवशी वास्तूशांतीचा म्हणजे ताबा देण्याचा दिवस जाहीर करणार आणि तो पाळला नाही तर स्वत:वर आर्थिक पेनल्टी लादणार असा नियम त्यांनी केला होता.

कंपनीच्या वेबसाईटवर तसं लिहिलंच आहे. त्यातून लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला. आणि हळूहळू या विश्वासाच त्यांनी गैरफायदा घेतला, असं दिसत आहे.

Image copyright TkKurikawa
प्रतिमा मथळा सार्वजनिक बँकांचं 3000 कोटींचं नुकसान झालं

ज्येष्ठ गुंतवणूक तज्ज्ञ वसंत कुलकर्णी यांचा डीएसके प्रकरणी सखोल अभ्यास आहे. त्यांनी कागदपत्रं आणि कंपनीची बॅलन्स शिटही तपासली आहे. त्यांच्याकडून बीबीसीने बँक घोटाळ्याची पद्धत समजून घेतली.

डीएसके यांनी आपली पत्नी हेमांती, मुलगा शिशिर, मेहुणी पुरंदरे आणि इतर अनेक मित्र यांच्या नावावर नवीन कंपन्या उघडल्या. या कंपन्यांच्या नावे ते जमिनी विकत घ्यायचे.

एखाद दुसऱ्या वर्षाने या जमिनीची किंमत वाढली असं दाखवून डीएसके असोसिएट्स या मुख्य कंपनीला त्या दुप्पट दराने विकायच्या. जमीन विकत घेताना पहिल्या कंपनीसाठी बँकेकडून कर्ज घ्यायचं.

"पुन्हा जमिनीची किंमत वाढली असं दाखवून दुसऱ्या आपल्याच कंपनीसाठी बँकेकडून वाढीव रकमेचं कर्ज घ्यायचं असा हा उद्योग," अशी माहिती त्यांनी दिली.

कुलकर्णी यांनी बँक घोटाळा सोप्या शब्दांत सांगितला.

नवीन आणखी मोठ्या रकमेची कर्ज घेऊन जुनी कर्जं अंशत: फेडायची हीच घोटाळ्याची पद्धत. जमीन व्यवहारातल्या सगळ्या कंपन्या इथून तिथून डीएसके यांच्याच मालकीच्या.

मागच्या दहा वर्षांत एकाच जमिनीचं चारवेळा हस्तांतरण झालं आहे. आणि अशाप्रकारे बँकेकडून कर्जं उचलण्यात आलं आहे.

जमिनीवर मूळात कर्जं असताना बँक नवीन कर्जं बिनदिक्कत कशी काय देते हा कुलकर्णी यांचा प्रश्न?

आणखी एक किस्सा त्यांनी सांगितला. डीएसके यांनी काही वर्षांपूर्वी बावधनमधली एक जमीन गहाण ठेवून बँकेकडून कर्ज उचललं. ही जमीन चक्क स्मशानासाठी आरक्षित आहे.

"असा आरक्षित भूखंड गहाण ठेवता येतो का? सगळी प्रक्रिया ऑनलाईन झालेली असताना बँक अधिकाऱ्यांना आरक्षित भूखंडाचा पत्ता लागत नाही का?" असा सवालही कुलकर्णी यांनी केला.

पुढे काय?

साधारण २०१६ पर्यंत सगळे व्यवहार सुरळीत सुरू होते. पण, त्यानंतर गुंतवणूकदारांना परताव्याचे दिलेले धनादेश वटणं बंद झाले. गृहनिर्माण प्रकल्प लांबले, घरांचा ताबा मिळेना झाला.

आणि फसलेल्या गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशाची चौकशी माहितीच्या अधिकारा अंतर्गत केली तेव्हा त्यांचे पैसे कर्जं फेडण्यासाठी आणि धंद्याच्या वाढीसाठी वापरल्याचं स्पष्ट झालं.

हे अर्थातच कायद्यात बसणारं नाही. त्यातून मग हळूहळू हा मोठा घोटाळा बाहेर आला. आता डीएसके, त्यांची पत्नी हेमांती तुरुंगात आहेत. मुलाचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेला आहे.

बँकेच्या अधिकाऱ्यांची एकामागून एक चौकशी सुरू झाली आहे. आणि गुंतवणूकदार रस्त्यावर आले आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)