#5मोठ्याबातम्या : प्लास्टिकबंदीबाबत संभ्रम कायम

प्लॅस्टिक Image copyright curtoicurto

पाहूयात आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. प्लास्टिकबंदीबाबत संभ्रम कायम

प्लास्टिकबंदी लागू होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे, मात्र मुंबईकरांमध्ये याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. पुरेशी जनजागृती न झाल्यानं कोणत्या पद्धतीच्या प्लास्टिकचा वापर चालेल किंवा कोणते प्लास्टिक बाळगले तर दंडात्मक कारवाई होईल यासंदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

प्लास्टिकच्या ५० मायक्रॉनवरील पिशव्या वापरल्या तर चालतीत, मॉलमध्ये मिळणाऱ्या किंवा सामानाच्या मोठ्या पिशव्या वापरल्या तर चालतील, अशा पद्धतीचेही संदेश सोशल नेटवर्किंग साईट्सवरून फिरत असल्यानं आणि सुरुवातीच्या काळात यातील कोणत्याच माहितीला अधिकृतरित्या चुकीचं न ठरवल्यानं संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्ससह बहुतेक वृत्तपत्रांनी याबाबत बातमी दिली आहे.

2. 'यापुढे नवीन धरण नाही!'

Image copyright Twitter

वातावरणीय बदलांमुळे पावसाच्या अनिश्चिततेत भर पडली असून कमी पावसामुळे राज्यातील 50 टक्के क्षेत्र दुष्काळग्रस्त बनलं आहे.

वाढत्या नागरीकरणामुळेही शहरांची तहान भागवण्यासाठी सिंचनाचं पाणी कमी होत आहे. अशा कारणांमुळे नवीन धरण परवडणारं नसल्यानं राज्यात यापुढे एकही नवीन धरण न बांधता अर्धवट स्थितीतील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या या घोषणेचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

3. काश्मीर - 'एनएसजी'च्या कमांडोंना लष्करीतळावर प्रशिक्षण

राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे कमांडो हे काश्‍मीर खोऱ्यातल्या दहशतवादविरोधी मोहिमेमध्ये गरजेनुसार सहभागी होतील.

मागील दोन आठवड्यांपासून काही कमांडोंना काश्‍मीर खोऱ्यातच प्रशिक्षण दिलं जात आहे. सध्या बीएसएफच्या केंद्रांवर एनएसजीची शंभर माणसं तैनात करण्यात आली आहेत.

एनएसजीच्या बहुतांश कमांडोंना विमान अपहरणाला सामोरं जाण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं असल्यानं त्यांना विमानतळांवरच तैनात केलं जाणार असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितल्याचं वृत्त सकाळनं दिलं आहे.

दरम्यान, कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याला ठार करणारा अधिकारी आयएएस बीवीआर सुब्रह्मण्यम यांची जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तसंच, राज्यपालांचे सल्लागार म्हणून आयपीएस विजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीवीआर सुब्रमण्यम आणि विजयकुमार हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. असंही वृत्त सकाळनं दिलं आहे.

4. खासगी शाळांतील शिक्षकभरतीही सरकारकडून

अल्पसंख्याक संस्था वगळता राज्यातल्या सर्व खासगी शाळांमधील शिक्षणसेवक आणि शिक्षकांची भरती यापुढे राज्य सरकारमार्फत होणार आहे.

खासगी शाळांमधली भरतीप्रक्रिया पारदर्शक असावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 'पवित्र पोर्टल व्हिजिबल टू ऑल टीचर्स'द्वारे ही भरती होणार असून शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं नुकताच याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.

खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षणसेवक आणि शिक्षक भरतीबाबतचा निर्णय वर्षभरापूर्वीच घेण्यात आला होता. मात्र, शिक्षणसम्राट आणि राजकीय दबावामुळे त्याची अंमलबजावणी रखडली होती, अशी बातमी लोकमतनं दिली आहे.

5. कर्नल पुरोहित यांच्या भवितव्याचा आज फैसला?

मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या भवितव्याचा फैसला 22 जूनला होणार आहे.

Image copyright PTI

कर्नल पुरोहितांनी या खटल्यातून आपल्याला आरोपमुक्त करण्यात यावं यासाठी याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर 22 जूनला मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम फैसला येण्याची शक्यता आहे.

एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, कर्नल प्रसाद पुरोहित यांनी त्यांच्यावरील आरोप ठेवण्यापूर्वी लष्कराची परवानगी घेण्यात आली नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात खटलाच दाखल करता येत नाही असं म्हणत यातून आरोप मुक्त करण्यात यावं अशी याचिका त्यांनी हायकोर्टात केली आहे. पुरोहित यांच्या या याचिकेला एनआयएनं मात्र विरोध केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)