मोबाईल गेम्सचं याड लागलंय? सावधान, तुम्ही आजारी असू शकता

मोबाईल Image copyright WANG ZHAO/AFP/Getty Images

अवघ्या 4 वर्षांची पूजा (बदललेलं नाव) सकाळी उठल्यावर ब्रश करताना, नाश्ता करताना, प्ले-स्कूलला जाईपर्यंत सगळी कामं मोबाईलवर कार्टून बघत किंवा कँडी क्रश गेम खेळतच करत असते.

हातातून ब्रश, जेवणाचा चमचा खाली ठेवला की लगेच पूजा मोबाईलवर 'अँग्री बर्ड्स' गेम खेळणं सुरू करते. त्या मोबाईलवर गेमचा शॉर्टकट नाही, पण काहीतरी खटाटोप करून ती शोधून काढतेच.

हातापेक्षा मोठ्या मोबाईलवर पूजा आपली बोटं इतकी जलदगतीनं फिरवते की तिचे आई-वडिलांना त्याच आश्चर्य वाटतं.

पुजाचे आई-वडील हे एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात. कामाचा आवाका एवढा असतो की ते घरी आल्यावरही ऑफिसचंच काम करत असतात. साहजिकच मुलीचा त्रास होऊ नये म्हणून तिच्या हातात मोबाईल दिला जातो.

पण त्यांच्या या सवयीचा पुढं जाऊन मुलीला एवढा त्रास होईल, याचा विचारही त्यांनी केला नाही.

पूजा आता मोबाईल गेमच्या आहारी गेली आहे. तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला की ती जमिनीवर लोळून रडायला लागते. शेवटी नाईलाजाने तिचं तोंड बंद करायला आई-बाबा पुन्हा तिला मोबाईल परत देऊन टाकतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रतिकात्मक

मोबाईलच्या व्यसनामुळे ती प्ले-स्कूलमध्ये एकही मित्र बनवू शकली नाही, पार्कमध्ये खेळायलाही जात नाही. शाळेतून आली की लगेच मोबाईलला चिटकते.

सध्यातरी पुजावर 'प्ले थेरपी'चा उपचार केला जातोय. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्या सवयीत थोडीशी सुधारणा झाली आहे.

मोबाईल गेम खेळणं हा एक आजार आहे

जगभरात मोबाईल आणि व्हीडिओ गेमचा वाढता वापर लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) हा व्यसनाला 'मानसिक आजार' आहे म्हटलं आहे.

WHOने 27 वर्षांनंतर पहिल्यांदाच आजारांचं आंतरराष्ट्रीय पातळीवर वर्गीकरण करणारं पुस्तक - International Classification of Disease, ICD - 11 - अपडेट करत या आजाराची नोंद केली आहे.

गेम खेळण्याची सवय केवळ मुलांमध्येच असते, असं नाही. पुजावर उपचार करणाऱ्या डॉ. जयंती दत्ता यांच्यानुसार हा आजार मोठ्या लोकांमध्येही आहे.

बऱ्याच ऑफिसमधली मंडळींना Angry Birds, Temple Run, Candy Crush, Contra या गेम्स खेळण्याचं वेड असतं.

Image copyright Thanasak Wanichpan / Getty Images

डॉ. जयंती दत्ता या मनोविकारतज्ज्ञ आहेत. त्यांच्या मते, सुरुवातीला वेळ घालवण्यासाठी लोक मोबाईलवर गेम खेळत टाईमपास करतात. पण त्याची सवय कधी लागते, हे लक्षातच येत नाही. शेवटी गेम खेळणं हा दैनंदिन जीवनाचा भाग होतो.

गेमिंग डिसऑर्डर काय आहे?

WHO नुसार हा आजार जडलेल्या व्यक्तीला गेम खेळण्याची एक वेगळीच तलफ असते. हा ऑनलाईन डिजिटल गेम असू शकतो किंवा व्हीडिओ गेमही.

असा आजार असलेली व्यक्ती प्रत्यक्ष समोरासमोर असलेल्या लोकांबरोबरच्या संबधांकडे लक्ष न देता गेम खेळण्यातच मग्न असते. त्यामुळे दररोजच्या कामकाजावर त्याचा वाईट परिणाम होतो.

गेमचा नाद असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा आजार झाला आहे, असं म्हणता येत नाही.

WHOच्या मते अशा व्यक्तीचा वर्षभराचा गेम खेळण्याचा पॅटर्न बघावा लागेल. गेम खेळण्यामुळे जर का त्यांच्या खासगी आयुष्य, सामाजिक जीवन, अभ्यास आणि नोकरीवर वाईट परिणाम झाला असेल तर ती व्यक्ती ही गेमच्या व्यसनी गेली आहे, असं म्हटलं जातं.

2016 साली दिल्लीतल्या AIIMS हॉस्पिटलमध्ये Behavioural Addiction Center सुरू केलं आहे. या सेंटरचे डॉ. यातन पाल सिंह बलहार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत रुग्णांची संख्या बरीच वाढली आहे.

डॉ. बलहार हे मनोविकारतज्ज्ञ आहेत. त्यांच्या मते, गेमचं व्यसन लागलेल्या व्यक्तीच्या पाच गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत.

या व्यक्ती -

  1. इतर कामांपेक्षा गेम खेळण्याला जास्त महत्त्व देतात.
  2. गेम खेळण्यापासून ते स्वत:ला रोखू शकत नाहीत.
  3. गेम खेळल्यावर त्यांना एक सुखद आनंद मिळतो.
  4. गेम खेळणं कधी थांबवावं या लक्षात येत नाही.
  5. खासगी आयुष्यावर त्याचा वाईट होतो.

गेम खेळणाऱ्या प्रत्येकाला हा आजार होतो का?

WHOच्या अहवालानुसार, मोबाईल गेम किंवा व्हीडिओ गेम खेळणारे खूप कमी लोक या आजाराच्या आहारी जात आहेत. दिवसभरात आपण किती वेळ गेम खेळण्यात घालवतो, हे ध्यानात घ्यायला पाहिजे. सगळ काम उरकून तुम्ही गेम खेळत असाल तर त्याचा काही परिणाम होत नाही.

किती वेळ गेम खेळल्यावर हा आजार होतो?

याबाबत काही ठराविक फॉर्मुला नाही, असं बलहारा सांगतात. "दिवसातून चार तास खेळणारे याच्या आहारी जाऊ शकतात आणि 12 तास गेमवर काम करणाराही बरा होऊ शकतो."

बलहारा यांनी बीबीसीसा सांगितलं की त्यांच्याकडे एक अशी केस होती, ज्यात मुलगा दिवसातून केवळ चार तास गेम खेळायचा, पण तो त्याला हा आजार झाला आहे.

या मुलाविषयी सविस्तर बोलताना डॉ. बलहारा सांगतात, "24 तासातले चार तास गेम खेळणं काही वाईट नाही. पण तो मुलगा गेमच्या व्यसनी गेला होता, कारण तो दिवसातले 7 तास शाळेत जायचा, नंतर ट्युशनला जायचा. त्यानंतर मात्र तो आई-वडिलांशी बोलायचा नाही, अभ्यास करायचा नाही. अगदी जेवण आणि झोपणंही त्यानं सोडून दिलं होतं. म्हणून त्याचं व्यसन सोडणं जरा अवघड होतं."

ते पुढं म्हणाले, "दुसरा व्यक्ती जो गेम तयार करतो किंवा दुरुस्त करतो आणि दिवसातून 12 तास गेम खेळतो, तर त्यांना आजारी म्हणता येणार नाही. कारण तो त्याचा व्यवसाय आहे."

या आजारावर उपचार होतो का?

या आजारावर मनोविकार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ या दोघांची मदत घ्यावी लागते. काही डॉक्टरांच्या मत दोन्ही तज्ज्ञाची मदत घेतली तर लवकर उपचार होऊ शकतो. पण डॉ. जयंती वरच्या मताशी सहमत नाहीत. त्याच्या मते काही केसेसमध्ये मानसोपचार करावे लागतात तर काही बाबतीत cognitive therapyची आवश्यकता असते. मुलांसाठी play therapy योग्य ठरू शकते. संबंधित व्यक्ती ही गेमच्या कितपत आहारी गेली आहे, यावरून उपचाराची पातळी ठरते.

बलहारा यांच्या मते, सध्याच्या पिढीत गेमिंग, इंटरनेट आणि गँबलिंग ही तीन प्रकारची व्यसनं दिसून येतात.

दिल्लीतल्या AIIMS हॉस्पटलच्या Behavioural Clinicमध्ये या तिन्ही व्यसनावर उपचार होतो. दर शनिवारी सकाळी 9 पासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत हा उपचार होतो. आठवड्याला 5 ते 7 व्यक्तींवर उपचार होतो आणि असे महिन्याला जवळजवळ 30 रुग्ण उपचार घेतात.

Image copyright Getty Images

रुग्णांमध्ये बहुतेक पुरुषमंडळी आहे. पण महिलांना हा आजार होत नाही, असं नाही. आजकाल मुली आणि महिलांचीही संख्या वाढू लागली आहे, असं ते सांगतात.

कधी थेरपीने उपचार केला जातो तर कधी औषधं देऊन. कधीकधी दोन्हींचा वापर केला जातो, असं जयंती सांगतात.

WHOच्या मते, यातल्या 10 रुग्णांपैकी एका रुग्णाला हॉस्पिटमध्ये अॅडमिट होऊन उपचार घ्यावा लागतो.

गेमचं व्यसन हे 6 ते 8 आठवड्यात सुटू शकतं. याचं व्यसन लागू न देणं हाच सगळ्यांत उत्तम उपाय आहे, असं डॉ. बलहारा सांगतात. या व्यसनानंतर उपचाराचा एवढा फरक पडत नाही, असं त्यांना वाटतं.

त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल देण्याअगोदर किंवा स्वत: गेम खेळण्याआधी विचार जरूर विचार करावा.

हेही वाचलंत का?

  1. हा काँप्युटर वादावादीतही भारी पडत आहे
  2. FIFA World CUP : मॅच जिंकल्यावर जपानी लोकांचं 'हे' वागणं पाहून सगळेच झाले अचंबित
  3. राष्ट्रीय विज्ञान दिवस : या ८ शोधांनी आपलं जग बदलून टाकलं!

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)