झारखंडमध्ये बंदुकीच्या धाकावर 5 मुलींवर सामूहिक बलात्कार

सांकेतिक तस्वीर

झारखंडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून या पाच किशोरवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, अशी तक्रार पोलिसांनी नोंदवली आहे. मानवी तस्करीविरोधात पथनाट्य करण्यासाठी गेलेल्या 5 मुलींनाच पळवून नेण्यात आलं.

राजधानी रांचीपासून 80 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोचांग गावात ही घटना घडल्याचं वृत्त आहे. खुंटी जिल्ह्यातल्या या घटनेप्रकरणी एका मिशनरी शाळेच्या फादरसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या मंगळवारी (19 जून) आशा किरण या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांची टीम कोचांग गावात पोहोचली. 11 जणांची ही टीम मानवी तस्करीविरोधात जागरुकता अभियानासाठी पथनाट्य करणार होती.

खुंटीचे पोलीस अधीक्षक अश्विनी सिंह यांनी बीबीसी हिंदीसाठी नीरज सिन्हा यांना दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीचं एक रेखाचित्र जारी केलं आहे आणि त्याच्यासंदर्भात माहिती देणाऱ्यास 50 हजाराचं बक्षीस जाहीर केलं आहे.

"गावातल्या बाजाराजवळ पथनाट्य केल्यानंतर हे पथक स्थानिक मिशनरी स्कूलमध्ये पोहोचलं. त्याचवेळी काही सशस्त्र लोक शाळेजवळ पोहोचले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून त्या पथकातल्या पाच मुलींना पळवून नेलं. एका जंगलात नेऊन त्यांच्यावर बलात्कार केला", अशी माहिती वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नीरज सिन्हा यांना दिली.

अश्विनी सिंह यांच्या माहितीनुसार 20 जूनला ही घटना प्रकाशात आली. त्यानंतर खुंटी जिल्ह्याच्या उपायुक्तांनी आपल्या टीमसह तपास सुरू केला. 21 जूनला एक बलात्कार पीडित मुलगी पुढे आली आणि त्यानंतर चौकशी सुरू झाली. सध्या पाचही मुली पोलिसांच्या सुरक्षेत आहेत आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

हे आरोपी कुठल्या नक्षलवादी गटाशी संबंधित आहेत का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. या जिल्ह्याच्या काही भागात पत्थरगडी - म्हणजे प्रस्थापित प्रशासनाला प्रवेश बंद केला गेला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)