#5मोठ्याबातम्या : तुमच्या ACचा रिमोट सरकारच्या हाती जाणार?

एअर कंडिशनिंग Image copyright Getty Images

पाहूयात आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. आता ACच्या कुलिंगवरही लगाम

एअर कंडिशनरसाठी किमान तापमानाची मर्यादा लवकरच 24 डिग्री सेल्सियस करण्याचा विचार केंद्रीय ऊर्जा मंत्रालय करत आहे. तसं झाल्यास वर्षाकाठी देशभरात 20 अब्ज युनिट विजेची बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने 'AC'बाबत जनजागृती अभियान हाती घेतले असून त्याचा आरंभ केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना सिंह यांनी, एसीचे किमान तापमान केवळ 1 डिग्री सेल्सियसने वाढवले तरी 6 टक्के विजेची बचत होऊ शकेल, असा दावा केला.

याबाबत पुढील 4 ते 6 महिने हे अभियान राबवण्यात येणार आहे. तसंच सर्वेक्षणही घेतलं जाणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ऊर्जा दक्षता ब्युरोने याबाबत सखोल अभ्यास केला असून त्याची अंमलबजावणी करताना सर्वांत आधी विमानतळ, हॉटेल्स, शॉपिंग मॉल तसंच सर्व कमर्शियल इमारतींसाठी दिशानिर्देश जारी केले जाणार आहेत.

2. '...तर क्रिकेटचा बट्ट्याबोळ होईल'

Image copyright Getty Images

भारताचा माजी फलंदाज आणि मास्टर-ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यातील दोन नव्या चेंडूंच्या वापराला जोरदार विरोध दर्शविला आहे.

एकाच डावात दोन नवीन चेंडू वापरले तर चेंडू जुना होणार नाही. त्यामुळे क्रिकेटमधून रिव्हर्स स्विंग नावाचं अस्त्र लुप्त होईल. शेवटच्या षटकांमध्ये गोलदाजांकडून वापरलं जाणारं हे अस्त्र क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे. म्हणून हा निर्णय खेळाचा बट्ट्याबोळ होण्यास आमंत्रण देणारा आहे, असं सचिन तेंडुलकरने म्हटल्याचं वृत्त लोकमतनं दिलं आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एका मॅचमध्ये एकाच डावात दोन नव्या चेंडूंचा वापर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सचिनने ट्वीट करून आपली नाराजी व्यक्त केली.

3. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर

Image copyright mls.org.in

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या विधानसभा सदस्यांकडून निवडून येणाऱ्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 16 जुलैला मतदान होणार आहे, तर याच दिवशी सायंकाळी पाच वाजल्यानंतर मतमोजणी होईल.

एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, सुनील तटकरे, अमरसिंह पंडित, शिवसेनेचे अनिल परब, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर यांची मुदत संपत आहे.

4. '...तर देशात लोकशाही जिवंत राहणार नाही'

Image copyright PTI
प्रतिमा मथळा न्यायमुर्ती जे. चेलमेश्वर

स्वतंत्र न्यायव्यवस्थेशिवाय देशात लोकशाही जिवंत राहणार नाही, असं मत शुक्रवारी निवृत्त झालेले न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांनी मांडलं आहे.

12 जानेवारी रोजी घेतलेल्या सुप्रीम कोर्टाच्या आवारात चार न्यायमूर्तींनी एक ऐतिहासिक पत्रकार परिषद घेत सरन्यायाधीशांवर गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. त्यापैकीच एक न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर होते.

"त्या पत्रकार परिषदेत काहीही गैर नव्हतं. आमची घुसमट आम्ही त्यात मांडली. जे काही घडत होतं ते मांडणारा मी एकटाच नव्हतो. माझ्यासोबत आणखी तिघे जण होते आणि त्यांचे मतंही माझ्यासारखेच होते," असंही चेलमेश्वर म्हणाल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

5. अमित शाह यांच्याबद्दलची बातमी काढली

Image copyright Getty Images

नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदी लागू झाल्यानंतर पहिल्या काही दिवसांतच भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी निगडित जिल्हा सहकारी बँकेत सर्वाधिक पैसे जमा झाल्याची माहिती RTI द्वारे मिळाल्याचं वृत्त शुक्रवारी बऱ्याच ठिकाणी प्रकाशित झालं होतं.

मात्र काही वेबसाईटवरून नंतर ती बातमी काढल्याची किंवा त्यातील अमित शाह यांचं नाव वगळण्याल्याची बातमी द वायरने दिली आहे.

Times Now, News18.com, FirstPost आणि New Indian Express या संकेतस्थळांनी ही बातमी त्यांच्या वेबसाईटवरून काढल्याचं द वायरनं म्हटलं आहे. ही बातमी प्रथम IANS वृत्तसंस्थेने दिली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)