#5मोठ्याबातम्या : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीची अजिंठा वेरूळला भेट

Image copyright MANJUNATH KIRAN / Getty Images
प्रतिमा मथळा जेफ बेझोस

आजच्या वृत्तपत्रांतील आणि विविध वेबसाईटवरील महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे :

1. अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांची औरंगाबादला भेट

अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती जेफ बिझोस यांनी सहकुटुंब अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांना भेट दिली. लोकसत्ताने आणि टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

त्यांच्या बरोबर पत्नी मॅकेंझी टटल आणि त्यांची तीन मुलं होती. सुमारे 2 तास ते इथं होते, असं लोकसत्तातील वृत्तात म्हटलं आहे.

आपल्या खासगी विमानाने त्यांनी आधी औरंगाबादला भेट दिली असून इथून पुढे ते वारणसीला जाणार असल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे.

फोर्ब्स मॅगझीननुसार बेझोस यांची एकूण संपत्ती मार्च 2018मध्ये 112 अब्ज डॉलर होती.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
व्हीडिओ पाहा: गरीब घरात जन्मलेली जगातील श्रीमंत व्यक्ती

2. 'एकतर्फी प्रमातून लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीचा खून'

दिल्ली कॅन्टॉनमेंटमध्ये मेजर अमित द्विवेदी यांची पत्नी शैलजा यांच्या खून प्रकरणात लष्करी अधिकारी मेजर निखिल हांडा यांना अटक करण्यात आली आहे.

NDTVने दिलेल्या वृत्तानुसार, शैलजा यांनी लग्नास नकार दिल्याने हांडा यांनी त्यांचा शनिवारी खून केला, असं दिल्ली पोलीसने रविवारी प्रसारमाध्यमांना सांगितलं. शैलजा यांचा गळा चिरून त्यांना गाडीखाली चिरडून ठार करण्यात आलं होतं.

हांडा यांची नियुक्ती नागालँडची राजधानी दिमापूरमध्ये आहे. त्यांना रविवारी उत्तर प्रदेश मिरत इथून अटक करण्यात आली.

3. प्रवीण तोगडिया यांची नवी संघटना

विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदावरून दूर झालेले प्रवीण तोगडिया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नावाची नवी संघटना स्थापन केली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रवीण तोगडिया

अहमदाबादमध्ये ही घोषणा करताना प्रवीण तोगडिया म्हणाले की ही संघटना प्रमुख्याने धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी चालवली जाणार आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्यानंतर ते नाराज होते, असं एबीपी माझाच्या बातमीत म्हटलं आहे.

सध्या विष्णू सदाशिव कोकजे हे विहिंपचे अध्यक्ष आहेत. ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.

4. 'महाआघाडीची शक्यता नाही'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपविरोधात देशात महाआघाडी होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं आहे.

न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "महाआघाडी होणार असेल तर मी त्यात आड येणार नाही मात्र अशी शक्यता दिसत नाही. निवडणुकीनंतर सर्व पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा पर्याय स्वीकारला पाहिजे."

"भाजपचा पराभव करणं हे आमचं उद्दीष्ट आहे. अर्जुनाच्या डोळ्याप्रमाणे सध्या आम्हीचं तेच एकमेव उद्दीष्ट आहे आणि त्यासाठीच आम्ही काम करतोय," असं ते पुढे म्हणाले.

5. सुषमा स्वराज यांनी ट्रोल्सना शिकवला 'रिट्वीट' धडा

मुस्लीम युवकाशी लग्न करणाऱ्या हिंदू महिलेच्या पासपोर्टभोवती सुरू असलेल्या वादावरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्रोल केलं जात आहे.

याप्रकरणी "17 ते 23 जून या काळात भारताबाहेर होते. माझ्या गैरहजेरीत काय झालं, हे मला माहीत नाही. काही ट्वीट्समुळं मला सन्मानित झाल्यासारखं वाटलं. त्यांना मी लाईक केलं आहे आणि तुमच्यासोबत शेअरही करत आहे," असं त्या म्हणाल्या.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा सुषमा स्वराज

सोबतच या ट्रोल्सवर हल्ला करत स्वराज यांनी यातील काही रिट्वीटही केले. बीबीसी हिंदीने ही सविस्तर बातमी दिली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)