ग्राउंड रिपोर्ट: लातूरच्या 24 दलित कुटुंबांनी का सोडली रुद्रवाडी?

  • अमेय पाठक आणि निरंजन छानवाल
  • बीबीसी मराठी
मातंग समाजातील 24 कुटुंब सध्या लोणीजवळ वास्तव्यास आहेत.

फोटो स्रोत, Amey Pathak

फोटो कॅप्शन,

मातंग समाजातील 24 कुटुंब सध्या लोणीजवळ वास्तव्यास आहेत.

लातूर जिल्ह्यातल्या रुद्रवाडी गावात मराठा आणि मातंग समाजातील लोकांमध्ये वाद झाल्यानंतर 24 दलित कुटुंबांनी हे गाव सोडलं आहे. असं नेमकं काय घडलं की एवढ्या लोकांना गाव सोडावं लागलं? या घटनेमागची सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं रुद्रवाडी गाव गाठलं.

औरंगाबादपासून जवळपास 370 किलोमीटर अंतरावर उदगीर तालुका आहे. याच तालुक्यात साधारण 1,200 लोकवस्तीचं रुद्रवाडी गाव येतं, जिथे हा प्रकार घडला.

सध्या ही 24 कुटुंबं उदगीरजवळच्या लोणी परिसरात एका ओसाड टेकडीवर असलेल्या पडक्या वसतिगृहात वास्तव्याला आली आहेत. उद्गीरला पोहोचल्यानंतर आम्ही या दलित कुटुंबातील एकाशी फोनवरून संपर्क केला. उदगीर ते अहमदपूर रस्त्यावर इच्छापूर्ती मारुती मंदिराजवळ आम्हाला ही व्यक्ती भेटली. तिच्याबरोबर आम्ही पायवाट धरत 'त्या' टेकडीवर पोहोचलो.

इथं एक जुनाट, जीर्ण झालेली इमारत उभी होती. हे होतं बंद पडलेलं श्यामलाल वसतिगृह.

'आता गावात जाणार नाही'

गाव सोडून इथं येऊन राहण्यामागचं कारण काय, असा प्रश्न समोर आलेल्या एका तरुणाला विचारला असता त्याने "सरपंच बाईंनाच विचारा" असं सांगितलं.

समोरून स्वतः सरपंच शालूबाई केरबा शिंदे आल्या. ज्या गावातून 24 कुटुंबांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला, त्याच रुद्रवाडी गावाच्या त्या सरपंच आहेत. त्या स्वतः दलित प्रवर्गातील.

फोटो स्रोत, Amey Pathak

फोटो कॅप्शन,

सरपंच शालूबाई शिंदे

"कसली सरपंच बाबा? आतापर्यंत लई वेळीस असली भांडण झालीत. अनेक वेळा माझ्या पतीला लक्ष्य करण्यात आलंय. काय कामाची असली पदं!" सरपंच शालूबाई शिंदे सांगू लागल्या.

आतापर्यंत गावात तीन वेळेस अशी भांडण झाल्याचा दावाही शालूबाई करतात.

"दोन वेळा गुणवंत शिंदे या मातंग समाजातील तरुणाच्या कारणावरून, तर यावेळीस आता ऐन लग्नाच्या वेळी हे झालं हाय. आता तिथं जाणं नको आणि ते भांडण पण नको," असं त्या वैतागून म्हणाल्या.

फोटो स्रोत, Amey Pathak

फोटो कॅप्शन,

ईश्वर शिंदे

ठिणगी कधी पडली?

शालूबाई शिंदे यांच्या मुलाने सांगितलं की आम्ही नवीन कपडे घातले किंवा रिक्षात मोठ्याने गाणी लावली तर आक्षेप घेतला जातो. मे महिन्यात घडलेल्या एका प्रकाराविषयी ईश्वर शिंदे यांनी त्यांची बाजू सांगितली आम्हाला सविस्तर सांगितली, "माझी चुलत बहीण मनीषा वैजीनाथ शिंदे हिचं 9 मेला लग्न होतं. हळदीच्या दिवशी म्हणजे 8 मेला आम्ही गावच्या मारुती मंदिरासमोर पोहोचलो. तिथं आम्हाला 'इथं काय करत आहात?' असा जाब विचारत काही तरुणांनी मारहाण केली. यानंतर माघार घेत आम्ही घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी घरातील मुलीचं लग्नकार्य गावातच पार पडलं."

फोटो स्रोत, Amey Pathak

फोटो कॅप्शन,

गावातलं मंदिर

"गावात काही वाद होऊ नये म्हणून आम्ही गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पिराजी आटोलकर यांच्यासह गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांना समन्वयासाठी आवाहन केलं. आम्ही त्यांना 10 तारखेला तंटामुक्तीची बैठक घेण्याची विनंती केली." असं ईश्वर शिंदे यांनी आम्हाला सांगितलं.

"पण ही मीटिंग 13 तारखेला घेऊया, असा निरोप आला. त्याआधीच काही वेगळं घडलं. आमच्या एका नातेवाइकाचा गावातल्या तरुणाशी वाद झाला. यानंतर संपूर्ण गाव आमच्यावर लाठ्या काठ्या घेऊन आलं. वाढवणे पोलीस आमच्यापर्यंत पोहोचले. याबाबत आम्ही 10 तारखेला तक्रार नोंदवली असून 11 तारखेला गुन्हा नोंद झाला," ईश्वर पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, Amey Patahk

फोटो कॅप्शन,

वसतिगृहात वास्तव्यास आलेली कुटूंब

गाव सोडलेल्या सरपंच शालूबाई शिंदे यांनी राज्य सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना एक निवेदन लिहत, लोणीच्या वसतिगृहातच आमचं पुनवर्सन करावं, अशी मागणी केली.

दरम्यान, पोलिसांत दिलेल्या तक्रारीत 8 आणि 10 मेच्या घटनांचा उल्लेख आहे. त्याचबरोबर मातंग समाजातील गुणवंत शिंदे नावाच्या एका तरुणाचे सवर्ण जातीतील एका मुलीशी प्रेमसंबंध होते, या संशयावरून या कुटुंबांना धमकी दिली जात आहे, त्यांच्या घरांमध्ये घुसून त्यांना मारहाण केली जात आहे, असं या तक्रारीत म्हटलेलं आहे.

दुसरी बाजू

या घटनेची दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही उदगीर तालुकाच्या केंद्रस्थानापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या रुद्रवाडी गावात पोहोचलो. मातंग समाजातली सर्व 24 कुटुंबं हे गाव सोडून गेल्यामुळे इथे आता मराठा समाजाचं वर्चस्व जाणवत होतं.

2016 मध्ये झालेल्या वादानंतर गुणवंत शिंदे यांनी 11 डिसेंबर 2016 रोजी तंटामुक्त समितीसमोर लिहून दिलं होतं की, गावातील सहा व्यक्तींबरोबर झालेला वाद आम्ही तंटामुक्त समितीसमोर मिटवून घेत आहोत. यापुढे कुणासोबतही भांडण करणार नाही, तसंच कसल्याची प्रकारची तक्रार करणार नाही, असंही यामध्ये लिहून देण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Amey Pathak

फोटो कॅप्शन,

रुद्रवाडी गावातील इतर समाजाची लोक

दरम्यान, रुद्रवाडीच्या गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला 22 जूनला निवेदन दिलं. गावात कोणत्याही प्रकारची जातीवाचक किंवा कुणालाही बहिष्कृत करण्याची घटना घडलेली नसताना गावातील मराठा आणि यलम समाजातील 23 लोकांविरोधात खोटी अॅट्रासिटीची गुन्हा नोंदवण्यात आला आणि राजकीय द्वेषापोटी काही संघटना गैरफायदा घेत आहेत, असा दावा या निवेदनात करण्यात आला आहे.

गावातील पाराजवळील काही घरांमध्ये आम्ही विचारपूस केली. तेव्हा त्यांपैकी एक कौसल्याबाई राजाराम आटोलकर यांनी आमच्याबरोबर संवाद साधला.

फोटो स्रोत, Amey Pathak

फोटो कॅप्शन,

गाव सोडून गेलेले लोक परत आले तर आम्हाला आनंदच आहे, असं कौशल्या आटोलकर यांनी सांगितलं.

"आमच्या गावाची परिस्थिती काय पाहता? पीक पेरणीच्या दिवसांत गावांतील कर्त्याधरत्या पुरुषांना अटक झाली आहे. मी अनेक पिढ्या इथं पाहिल्या, पण कधी जातीयता या गावात पाहिली नाही. गाव सोडून गेलेले लोक परत आले तर आम्हाला आनंदच आहे."

गावातील अनेक जण शेतात कामाला गेले होते. शेतातून परत आलेल्या काही तरुणांशी आम्ही संवाद साधला. त्यापैकी यादव वैजीनाथ आटोलकर यांनी तर थेट आरोप केला आहे की "हा संपूर्ण वाद गावातील मातंग समाजाचा मुलगा गुणवंत शिंदे आणि मराठा समाजाच्या एक मुलीच्या प्रकरणातून झाला आहे. याला जातीय रंग देण्यात येत आहे."

फोटो स्रोत, Amey Pathak

फोटो कॅप्शन,

यादव आटोलकर

गावच्या सरपंच शालूबाई शिंदे यांनी ज्या तंटामुक्त समितीला समन्वयासाठी आवाहन केलं होतं, त्या समितीच्या अध्यक्ष पिराजी आटोलकर यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी सांगितले की, "समन्वय बैठकीसाठी त्यांनी 9 तारखेला वेळ मागितली होती. पण गावात 12 तारखेला आणखी एक लग्न असल्यानं आम्ही 13 तारीख दिली होती. त्याआधीच 10 तारखेला वाद चिघळला आणि प्रकरण थेट पोलिसांत गेलं."

फोटो स्रोत, Amey Pathak

फोटो कॅप्शन,

श्रीधर पवार

या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी श्रीधर पवार सांगतात, "आम्ही प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं आहे. घटनेचे अनेक पैलू आम्ही तपासत आहोत. आरोपींना शिक्षा होत गाव पुन्हा पूर्ववत व्हावं, हा आमचा प्रयत्न आहे."

आतापर्यंत 23 आरोपींपैकी 11 जणांना अटक करण्यात आली असून 12 जण फरार आहेत.

सरकारची प्रतिक्रिया काय?

दरम्यान या प्रकरणात सरकारनं आतापर्यंत काय पावलं उचलली आहेत, हे जाणून घेण्यासाठी आम्ही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संपर्क साधला.

तर "या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन नंतर याविषयी बोलतो," असं बडोले यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

नंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याप्रकरणी त्यांची काही प्रतिक्रिया आल्यास इथे आम्ही अपडेट करू.

मातंग समाजातील शंभरावर गावकरी गेल्या 21 दिवसांपासून गावाबाहेर राहत आहेत. सरपंच शालूबाई शिंदे यांचा मुलगा ईश्वर यांनी संभाषणादरम्यान आम्हाला सांगितलं, "आता आम्हाला गावात परत जायचं नाही. आम्हाला तिथं कधीच सम्मान मिळाला नाही."

यावरूनच या गावातली मनं दुभंगली आहेत, हे लक्षात येतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)