#5मोठ्याबातम्या : मुंबईतल्या पावसानं घेतले १० जणांचे बळी

रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढणारा दुचाकीस्वार

फोटो स्रोत, Reuters

आजच्या वृत्तपत्रांतील आणि विविध वेबसाईटवरील महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे :

१. मुंबईत पावसाचे १० बळी

रविवारी रात्रीपासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच, या शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही कोलमडून पडली होती. अशी बातमी इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्रानं दिली आहे.

मुंबईत यंदाच्या मान्सून काळात झालेला हा सर्वांत मोठा पाऊस आहे. रविवारी रात्रीपासून सोमवारपर्यंतच्या २४ तासांत २३१.४ मीमी. पावसाची नोंद सांताक्रूझ वेधशाळेत झाली.

पावसाचा जोर जास्त असल्यानं खड्ड्यांत, नाल्यात, मॅनहोलमध्ये पडून तर भिंत कोसळल्यानं काहींचा मृत्यू झाला आहे. मालाड, आझाद मैदान, कळवा, खारघर, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर तळोजा या उपनगरांमध्ये हे मृत्यू झाले.

वडाळा इथं एका इमारतीच्या कंपाऊंडचा भाग कोसळल्यानं त्या खाली १४ गाड्या दबल्या गेल्या. यात कोणताही जीवितहानी झाली नसली तरी, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

२. जेटलींकडून इंदिरा गांधीची हिटलरशी तुलना

इंदिरा गांधी यांच्यावर हिटलर यांचा प्रभाव होता. म्हणूनच त्यांनी १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादली. असं विधान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. आणीबाणीला ४३ वर्षं झाल्यानिमित्त त्यांनी लिहीलेल्या एका ब्लॉगमध्ये हे मत व्यक्त केलं. असं वृत्त टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रानं दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी संविधानाचा विरोध केला. उलट त्यांनी संविधानाचा वापर करत लोकशाहीचं रुपांतर हुकुमशाहीत केल्याचंही जेटली यांनी या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

अरुण जेटली यांच्या या ब्लॉगचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून कौतुक केलं आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी आणीबाणी लादून संविधानावर गांधी यांनी हल्ला केल्याचं मोदी यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

३. 'पाकच्या सांगण्यावरून बुखारींची हत्या'

जम्मू काश्मीरमधील 'द रायजिंग काश्मीर' या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या पाकिस्तानच्या सांगण्यावरून झाली असल्याचा दावा काश्मीर पोलिसांनी केला आहे. महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात ही बातमी प्रसिद्ध झाली आहे.

दहशतवाद्यांनी शुजात बुखारींची हत्या केली तसंच त्यांना पाकिस्तानातून आदेश आले होते, असं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

जमात-ए-इस्लामीच्या लोकांनी दहशतवाद्यांना भडकावलं होतं. त्यांना शुजात बुखारींची ओळख पटवून दिली आणि त्यांची हत्या करण्यास सांगितलं. म्हणूनच, शुजात बुखारी यांची हत्या करण्यात आली, असं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

त्यांची हत्या करणाऱ्यांची ओळख पटली असून लवकरच आम्ही त्यासंदर्भात कठोर कारवाई करु, असं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे.

4. चेलमेश्वर यांच्या विधानाचा बार काऊन्सिलकडून निषेध

निवृत्तीनंतर न्या. चेलमेश्वर यांनी केलेल्या विधानाचा बार काऊन्सिल ऑफ इंडीयानं निषेध केला आहे. चेलमेश्वर यांनी न्यायसंस्थेबाबत केलेलं विधान वादग्रस्त आणि तथ्यहीन असल्याचं बार काऊन्सिल ऑफ इंडीयानं स्पष्ट केलं. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रामध्ये याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झालं आहे.

फोटो स्रोत, REUTERS/ADNAN ABIDI

२२ जूनला न्या. चेलमेश्वर सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या नेमणुकीवरून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बार काऊन्सिल ऑफ इंडीयानं त्यांच्या या विधानाचा पत्रकार परिषद घेऊन विरोध केला.

बार काऊन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी त्यांच्या विधानाची समिक्षा करताना म्हटलं की, "चेलमेश्वर यांनी कार्यालय सोडल्यावर असं विधान करणं योग्य नाही. त्यांच्यासारख्या व्यक्तीकडून ही अपेक्षा नाही."

5. सोहराबुद्दीन खटल्यातील साक्षीदारांना धमक्या

सोहराबुद्दीन शेख प्रकरणातील साक्षीदारानं आपल्याला धमकावण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. या कथित बनावट चकमकीच्या खटल्यात एकामागोमाग ७२ साक्षीदार फितूर झाले आहेत. त्यातचं सोमवारी एका साक्षीदार महिलेनं हा आरोप केला आहे.

'मला आणि माझ्या पतीला साक्ष देऊ नये यासाठी गुजरात पोलिसांकडून आणि राजस्थानमधल्या राजकारण्यांकडून अनेकदा धमक्या देण्यात आल्या', असं या साक्षीदार महिलेचं म्हणणं आहे.

असं वृत्त महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं आहे.

'या खटल्यात साक्ष देऊ नये यासाठी धमक्यांचे अनेक फोन आले. साक्ष दिली तर तुम्हालाही तुलसीदास प्रजापतीप्रमाणे ठार करू,' अशा धमक्या आल्याचं रिझवाना खान यांनी विशेष सीबीआय कोर्टात सांगितलं. त्यांच्या पतीनं लिहिलेलं एक पत्र त्यांनी न्यायाधीश एस. जे. शर्मा यांना दिलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)