अमेरिकेमध्ये का चर्चेत आहेत हे मराठी डॉक्टर : डॉ. अतुल गावंडे

Dr. Atul Gawande Image copyright Atul Gawand/Facebook
प्रतिमा मथळा अमेरिकेच्या आरोग्याची काळजी घेणारे भारतीय डॉक्टर अतुल गावंडे

तुम्हाला कसा मृत्यू यावा, असं तुम्हाला वाटतं? तुमच्या जवळच्या माणसांसोबत की हॉस्पिटलच्या बेडमध्ये नाकातोंडात नळ्या घातलेल्या असताना? किती विचित्र प्रश्न आहे ना? आणि ज्याने आपल्याला जगण्याचा दिलासा द्यायचा, औषधोपचार करायचे तो डॉक्टरच असे प्रश्न विचारत असेल तर?

अमेरिकेमध्ये काम करणारे प्रसिद्ध सर्जन डॉ. अतुल गावंडे त्यांच्या पुस्तकांमधून, व्याख्यानांमधून आपल्याला हा प्रश्न विचारतात तेव्हा आपण खडबडून जागे होतो. धडधाकटपणे आत्ता जगत असलो तरी आपल्याला कधीतरी वृद्धत्वाला सामोरं जावं लागणार आहे, नंतर मृत्यूला सामोरं जाण्याची तयारी करावी लागणार आहे, याचं आपल्याला भानही नसतं.

डॉ. अतुल गावंडे म्हणतात, "मेडिकलचा विद्यार्थी म्हणून आम्हाला एखाद्या रुग्णाला काहीही करून कसं जगवायचं हे शिकवलं जातं. पण मृत्यू अटळ आहे, हे सत्य डॉक्टरांनीही समजून घेतलं पाहिजे हे कुणी सांगतच नाही."

"संध्याकाळी क्षिजितावर झालेला सूर्यास्त आपण शांतपणे स्वीकारतोच ना?"


भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर अतुल गावंडे सध्या अमेरिकेत प्रकाशझोतात आले आहेत कारण त्यांची अमेरिकेतल्या अॅमेझऑन-बर्कशायर-JP मॉर्गन चेस या हेल्थकेअर पार्टनरशिपच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. अमेरिकेत आरोग्यसेवा अत्यंत महाग आहेत. या तीन बड्या कंपन्या एकत्र येऊन त्यांचा आरोग्यविमा घेणाऱ्या लोकांना रास्त दरात आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत.

दहा लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना या पार्टनरशिपचा फायदा होऊ शकतो. हे मॉडेल जर डॉ. गावंडे यशस्वी करू शकले, तर त्याचं अनुकरण इतरही कंपन्याही करू शकतील.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात डॉ. अतुल गावंडेंचं महत्त्वाचं योगदान आहे.

डॉ. गावंडे प्रसिद्ध डॉक्टर आहेत, त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत, पण त्यांच्या नियुक्तीवर अमेरिकेत टीकाही होत आहे. डॉ. गावंडेंकडे पुरेसा अनुभव नसल्याचा आरोप तिथे काही जाणकारांनी केला आहे.

डॉ. अतुल गावंडेंचं मूळ विदर्भात आहे. यवतमाळपासून ते न्यूयॉर्कपर्यंतचा त्यांच्या कुटुंबाचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

वडिलांचं आजारपण

"अमेरिकेतच स्थायिक झालेल्या माझ्या वडिलांना जेव्हा पाठीच्या कण्याचा ट्यूमर झाला, तेव्हा आमच्या कुटुंबावर आघात झाला. भारतातून अमेरिकेत येऊन सर्जन म्हणून नाव कमावलेले, हिकमतीने ऑपरेशन्स करणारे, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या उचलणारे आणि टेनिस खेळणारे माझे वडील डॉ. आत्माराम गावंडे कधीतरी अशा दुर्धर आजाराच्या विळख्यात अडकतील, याची मी कल्पनाही केली नव्हती," असं डॉ. अतुल गावंडे त्यांच्या पुस्तकात सांगतात.

Image copyright Atul Gawande/Twitter
प्रतिमा मथळा डॉ. अतुल गावंडेंचे आईबाबा डॉ. सुशीला आणि डॉ. आत्माराम गावंडे

120 वर्षांचा अनुभव

"मी, माझी आई आणि बाबा... आम्ही तिघंही डॉक्टर. आमच्या तिघांचा मिळून तब्बल 120 वर्षांचा अनुभव होता पण तरीही माझ्या बाबांच्या मृत्यूचे क्षण जसजसे जवळ येत होते तसतसे आम्ही अनेक भावनिक चढउतार अनुभवले. दुसऱ्यावर अवलंबून असलेलं जिणं बाबांना नको होतं, हॉस्पिटलमध्ये नाकातोंडात नळ्या घालून आलेलं मरणही त्यांना नको होतं. अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला तो आमच्या सगळ्यांच्या सहवासातच."

"जेव्हा किमोथेरपी, रेडिएशन हे उपचारही त्यांचा कॅन्सर थांबवू शकले नाहीत, तेव्हा त्यांना आधार दिला तो मरणाचा स्वीकार करण्याच्या भावनेनं. त्यावेळी मला प्रकर्षानं जाणवलं, जेव्हा तुम्ही दीर्घकाळ जगण्याचा प्रयत्न करणं थांबवता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं चांगलं जगू शकता," असं डॉ. गावंडेंनी बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं.


'बिइंग मॉर्टल' या पुस्तकात डॉ. अतुल गावंडेंनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

डॉ. अतुल गावंडेंच्या कामाचा परिचय करून द्यायचा तर एक भलीमोठी यादी द्यावी लागेल आणि तरीही त्यांची ओळख पूर्ण होणार नाही. ते ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम करतात. हॉवर्ड विद्यापीठातल्या आरोग्यधोरण आणि व्यवस्थापन विभागामध्ये ते प्रोफेसर आहेत. 'काँप्लिकेशन्स', 'बिइंग मॉर्टल' अशा जगभरात गाजलेल्या पुस्तकांचे ते लेखक आहेत. 'न्यूयॉर्कर' या अतिशय प्रतिष्ठित साप्ताहिकाचे ते मानद लेखक आहेत.

अमेरिकेमधल्या आरोग्यधोरणांबद्दल थेट व्हाईट हाऊसमधून त्यांचा सल्ला घेतला जातो. बराक ओबामा, बिल क्लिंटन यांच्यासोबतच अमेरिकेमधल्या आरोग्य क्षेत्रातल्या कंपन्या आणि तज्ज्ञमंडळी यांची मदार त्यांच्यावर आहे.

Image copyright Ariadne Lab
प्रतिमा मथळा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत डॉ. अतुल गावंडे

आज जगातल्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये डॉ. अतुल गावंडेंचं नाव घेतलं जातं. 'टाईम' मासिकाने 2010 मध्ये त्यांना जगातल्या महत्त्वाच्या थिंकर्सपैकी एक म्हटलं होतं. जभरातून त्यांना व्याख्यानासाठी दरवर्षी हजारो आमंत्रणं येत असतात. त्यांचं टेड टॉकमधलं भाषण लाखो लोकांनी पाहिलं आहे.

उमरखेड ते बोस्टन

अशा या अवलिया डॉक्टरचा जन्म अमेरिकेतला असला तरी विदर्भातल्या त्यांच्या छोट्या खेड्याशी त्यांची नाळ कायम आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेडजवळचं उटी हे त्यांचं मूळ गाव. म्हणजे डॉ. अतुल गावंडे तसे महाराष्ट्राचेच.

त्यांचे वडील डॉ. आत्माराम गावंडे हे नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधून MBBS झाल्यानंतर 1963 मध्ये न्यूयॉर्कला गेले आणि त्यांनी सर्जरीमध्ये नैपुण्य मिळवलं. न्यूयॉर्कमध्येच त्यांचं लग्न झालं आणि मग आपली पत्नी डॉ. सुशीला गावंडे यांच्यासोबत ते ओहायो या राज्यातल्या अथेन्समध्ये स्थिरावले. त्यामुळे डॉ. अतुल गावंडे यांचा जन्म अमेरिकेतला.

उमरखेडमध्ये राहणारे डॉ. यादवराव राऊत हे अतुल गावंडेंचे आतेभाऊ. ते सांगतात, "अमेरिकेत जन्म झाला असला तरी अतुलचं मन हे भारताच्या भूमीतलंच आहे हे मला त्याला भेटल्यावर नेहमी जाणवतं. अतुलचे वडील म्हणायचे, माय फ्रुट्स आर इन अमेरिका बट माय रूट्स आर इन उमरखेड. तशीच आपलीही मुळं आपल्या वडिलांइतकीच इथे घट्ट रुतलेली आहेत हे अतुललाही माहीत आहे."

Image copyright Dr. Yadavrao Raut
प्रतिमा मथळा डॉ. अतुल गावंडे कुटुंबीयांसोबत

"वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या उत्तरक्रियेसाठी अतुल वाराणसीला गेले. वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी त्यांच्या अस्थींचं विसर्जन या नदीमध्ये केलं. गंगेचं प्रदूषित पाणी पिणं हे त्याच्यासारख्या डॉक्टरला कधीच पटणारं नव्हतं. पण तरीही भारतीय संस्कृतीतल्या या विधींचाही त्याने आदर केला."

डॉ. आत्माराम गावंडे यांनी आपल्या आईच्या नावाने उमरखेडमध्ये महाविद्यालय सुरू केलं आहे. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी डॉ. अतुल वेळात वेळ काढून येतात. ते जेव्हा इथे येतात तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत अमेरिकेतली तज्ज्ञ मंडळी असतात.

'अतुल इज व्हेरी टॉल'...असं ते म्हणतात तेव्हा आमच्या गावाच्या या सुपुत्राबद्दल मन भरून येतं, डॉ. यादवराव राऊत अभिमानाने सांगतात.

तरुणांना प्रेरणा

यवतमाळमध्ये शिकलेले पत्रकार अजय कौटिकवार हेही डॉ. गावंडेंच्या प्रेरणेबद्दल भरभरून बोलतात. ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, जगभरातलं बदलतं तंत्रज्ञान इथेही पोहोचावं यासाठी त्यांची तळमळ असते. अमेरिकेच्या विद्यापीठांमधल्या तज्ज्ञांना आपल्या छोट्या खेड्यात आणून विद्यार्थ्यांना संधी मिळवून देणं हे काम ते करत राहतात. या जगविख्यात डॉक्टरचं मोल आपण भारतीय नागरिक आणि सरकारनेही जाणलं पाहिजे, असं अजय कौटिकवार आवर्जून सांगतात.

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना डॉ. अतुल गावंडे भेटले ते 'न्यूयॉर्कर' या साप्ताहिकातून. ते सांगतात, "या साप्ताहिकातले त्यांचे वैद्यकीय विश्वातले लेख मी आवडीने वाचत होतो. त्यावेळी या साप्ताहिकात अगदी मोजकीच भारतीय नावं दिसायची. म्हणून मला त्यांच्याबदद्ल उत्सुकता निर्माण झाली. पुढे जेव्हा 'काँप्लिकेशन्स', 'चेकलिस्ट मॅनिफेस्टो' अशी त्यांची एकेक पुस्तकं यायला लागली तेव्हा मी आवर्जून ती विकत घेतली. मला भावतं ते त्यांचं 'चेकलिस्ट मॅनिफेस्टो' हे पुस्तक. कोणत्याही क्षेत्रात उत्तम पद्धतीने काम कसं करावं याबद्दल त्यांनी या पुस्तकात लिहिलंय. त्यामुळेच हे एखाद्या कंपनीच्या CEOपासून ते गृहिणीपर्यंत कुणालाही उपयोगी पडू शकतं."

'भारतात सुधारणेची गरज'

Image copyright Getty Images

बीबीसीचे प्रतिनिधी सौतिक बिस्वास यांना 2014 मध्ये दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, भारताची आरोग्ययंत्रणा खूपच गुंतागुंतीची आहे. माझी आजी 32 वर्षांची असताना मलेरियामुळे मरण पावली. त्यावेळी खेडोपाड्यांत मलेरियावर औषधोपचार होणंही कठीण होतं. आता मात्र वैद्यकीय सेवा खेडोपाड्यांपर्यंत पोहोचल्या आहेत.

स्वच्छ पाणी, चांगलं सिंचन, समृद्ध शेती या सगळ्यांत आपण गेल्या काही वर्षांत खूप प्रगती केली आहे. पण तरीही बदलत्या जीवनशैलीमुळे ब्लड प्रेशर, डायबेटिस या व्याधींची आव्हानं आपल्यासमोर आहेत. एखाद्याला हृदयविकार असेल तर त्यावर औषधोपचार मिळवणं, योग्य पद्धतीने ऑपरेशन करून त्यावर मात करणं हे अजूनही सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं आहे.

भारतामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता नाही, पण त्यांना जर कमकुवत आरोग्ययंत्रणेमध्ये काम करावं लागत असेल तर त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग आपल्याला करून घेता येणार नाही. यासाठीच सार्वजनिक आरोग्ययंत्रणेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासोबतच आरोग्यविमा हाही प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे.

एका मुलाखतीत ते म्हणाले होते, "माझ्या तरुणपणी मला तत्त्वज्ञान शिकावंसं वाटायचं. मी रॉक बँडसाठी गाणीही लिहिली. हे सगळं सोडून मी मेडिकलची वाट धरली."

असं असलं तरी हे तत्त्वज्ञान आणि कवीची संवेदनशीलता त्यांच्यासोबत अजनूही कायम आहे हे जाणवत राहतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)