#5मोठ्याबातम्या : स्विस बँकेतल्या भारतीयांच्या रकमेत 50% वाढ

Swiss National Bank Image copyright FABRICE COFFRINI/Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. स्विस बँकेतल्या भारतीयांच्या रकमेत 50% वाढ

स्विस बँकेतल्या भारतीयांच्या खात्यातल्या रकमेत 2017 या आर्थिक वर्षात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असं स्विस नॅशनल बँकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे. ही रक्कम वाढून 7,000 कोटींवर गेली आहे.

स्विस बँकेत भारतीयांची जी खाती आहेत त्यातील रक्कम जवळपास 6,891 कोटी रुपयांनी वाढली. मॅनेजर्सच्या माध्यमातून जी रक्कम या खात्यांत जमा करण्यात आली आहे ती 112 कोटींनी वाढली आहे.

दरम्यान 2016मध्ये स्विस बँकेतल्या भारतीयांची रक्कम 45 टक्क्यांनी कमी झाली होती.

2. इराणकडून तेल आयात बंद करा

"4 नोव्हेंबरपर्यंत भारतानं इराणकडून होणारी तेल आयात शून्यावर आणण्याची आवश्यकता आहे," असं मत संयुक्त राष्ट्रांतील (यूएन) अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी व्यक्त केलं आहे. द हिंदूनं ही बातमी दिली आहे.

इराण म्हणजे जगाला धोका आहे, असं मत त्यांनी दिल्ली येथील एका कार्यक्रमात व्यक्त केलं आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा निक्की हेली

"आम्ही इराणवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी इतर देश आम्हाला मदत करतील अशी आम्हाला आशा आहे. मी पंतप्रधान मोदींनाही याबाबत बोलले आहे. अमेरिका आणि मित्र देश एकत्र येऊन इराणला एक जबाबदार शेजारी बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत," असं यावेळी निक्की यांनी म्हटलं आहे.

भारतानं इराणसोबतच्या संबंधांबद्दल पुनर्विचार करायला हवा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

"निक्की हेली यांचं हे वक्तव्य भारतकेंद्रीत नव्हतं आणि ते सगळ्याच देशांसाठी बंधनकारक नाही," असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहाणी यांनी फेब्रुवारी महिन्यात भारताला भेट दिली होती. त्यानंतर भारत इराणकडून 25 % अधिक तेलाची आयात करेल, असं स्पष्ट करण्यात आलं होतं.

3. मोदींच्या परदेशवारीवर 355 कोटींचा खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 4 वर्षांत 41 परदेश दौरे केले असून त्यासाठी तब्बल 355 कोटींचा खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

Image copyright AFP

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेश दौरे आणि त्यावर होणारा खर्च याबाबतची माहिती बंगळुरुतील एका माहिती अधिकार कार्यकर्त्यानं मागितली होती.

त्यानुसार, मोदींनी गेल्या 4 वर्षांमध्ये 41 परदेश दौरे केले असून 50 देशांना भेटी दिल्या आहेत. या दौऱ्यांसाठी एकूण 355 कोटी रुपये खर्च करण्यात आले, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली. गेल्या 4 वर्षांत मोदी 165 दिवस परदेशात असल्याचंही समोर आलं आहे.

मोदी यांचा फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या 3 देशांचा दौरा सर्वांत महागडा ठरला आहे. यासाठी 31 कोटी 25 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. तर भूतान दौऱ्यासाठी सर्वांत कमी 2 कोटी 45 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

4. पानसरे-दाभोळकर हत्येप्रकरणी तपास यंत्रणांवर ताशेरे

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटकातले पोलीस महाराष्ट्रात येऊन आरोपींना अटक करतात. पण पानसरे, दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणांना काहीच कसं कळत नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय आणि एसआयटीवर ताशेरे ओढले आहेत. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.

पानसरे-दाभोळकर कुटुंबीयांनी तपास धीम्या गतीनं होत असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

यावर सुनावणी करताना दोन्ही तपास संस्थांनी न्यायालयापुढे एक सीलबंद अहवाल सादर केला. प्रत्येक वेळी आमच्यासमोर नुसतेच अहवाल सादर केले जातात, पण त्यातून निष्पन्न काहीच होत नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

तसंच सुनावणीवेळी दोन्‍ही तपास यंत्रणांचे वकील हायकोर्टात हजर नव्‍हते. यावरून तुम्‍ही या प्रकरणांकडे किती गांभिर्यानं पाहता हे लक्षात येतं, असंही न्यायालयानं या संस्थांना सुनावलं आहे.

5. मुंबईत शिवसेनेनं गड राखला, कपिल पाटीलही विजयी

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांनी भाजपचे अमितकुमार मेहता यांचा 11,611 मतांनी पराभव केला. तर शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे कपिल पाटील विजयी झाले आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

दरम्यान विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल आज अधिकृतरित्या जाहीर होणार आहे. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या जागांचा हा निकाल असणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)