या 5 कारणांसाठी यंदा विम्बल्डन अजिबात चुकवू नका!

विम्बल्डन

ग्रँड स्लॅम टेनिसमधली सर्वात जुनी आणि मानाची समजली जाणारी स्पर्धा अर्थात विम्बल्डनला सोमवारपासून सुरूवात होते आहे. टेनिस चाहत्यांना खरं तर विम्बल्डन पाहण्यासाठी दुसऱ्या कुठल्याच कारणाची गरज नाही. पण ग्रास कोर्टवरची ही स्पर्धा यंदा पाच गोष्टींमुळे आणखी खास बनली आहे.

1. रॉजर फेडररची 15 वर्षं

स्वित्झर्लंडचा टेनिसस्टार रॉजर फेडररनं पहिल्यांदा विम्बल्डन जिंकलं, त्याला यंदा पंधरा वर्षं पूर्ण होत आहेत.

2003 ते 2017 या कालावधीत फेडररनं तब्बल 8 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे आणि या स्पर्धेत पुरुष एकेरीत सर्वाधिक विजेतेपदांचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.

फेडररच्या याच 'अशक्य' वाटचालीचा आढावा घेणारा हा व्हीडियो पाहा:

लवकरच फेडरर व्यावसायिक टेनिस कारकीर्दीचीही दोन दशकं पूर्ण करणार असून, वयाच्या ३७व्या वर्षीही त्याला विम्बल्डनच्या विजेतेपदासाठी सर्वांत प्रबळ दावेदार मानलं जात आहे. त्यामुळं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असूनही फेडररला या स्पर्धेसाठी अव्वल मानांकन मिळालं आहे.

2. फेडरर-नदालमधल्या लढतीचा नवा अध्याय

रॉजर फेडरर आणि राफेल नदालमधली चुरस कुठल्याही स्पर्धेची रंगत आणखी वाढवणारी ठरते. या दोघांमधली २००८ सालच्या विम्बल्डन विजेतेपदासाठीची ऐतिहासिक लढाई कोण विसरेल?

Image copyright Getty Images

पावसाच्या व्यत्ययांमुळे तब्बल सात तास लांबलेली ती लढाई अखेर नदालनं 6-4 6-4 6-7 (5-7) 6-7 (8-10) 9-7 अशी जिंकली होती आणि सेंटर कोर्टवर संधीप्रकाश ओसरताना पाच वेळच्या विम्बल्डन विजेत्या फेडररचं साम्राज्य संपुष्टात आणलं हेतं.

अमेरिकेचे दिग्गज टेनिसपटू जॉन मॅकेन्रो यांनी त्या लढतीचं वर्णन "the greatest match ever played" अशा शब्दांत केलं होतं. नदालनं तर आपल्या कारकीर्दीला मोठं वळण देणारा क्षण असं त्या सामन्याचं वर्णन केलं आहे.

त्या ऐतिहासिक लढतीनंतर फेडरर आणि नदाल आजवर एकदाही विम्बल्डनमध्ये आमने-सामने आलेले नाहीत.

मात्र २०१७ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपनपासून म्हणजे गेल्या दीड वर्षांत सहा ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी तीन फेडररनं आणि तीन नदालनं जिंकल्या आहेत आणि आपल्यातल्या चुरशीचा नवा आध्याय लिहिला आहे. पुरुष एकेरीच्या जागतिक क्रमवारीचं अव्वल स्थानही दोघं आलटूनपालटून भूषवताना दिसले.

त्यामुळेच यंदा अव्वल मानांकित फेडरर आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नदालमध्ये फायनलची पर्वणी मिळेल अशी अपेक्षा टेनिस चाहते करत आहेत.

3. ऑलिम्पियाची आई

मुलगी ऑलिम्पियाच्या जन्मानंतर सेरेना विल्यम्सचं हे पहिलंच विम्बल्डन असणार आहे.

सात वेळची माजी विम्बल्डन विजेती सेरेना विल्यम्स मातृत्त्वाचा भार सांभाळत यंदा फ्रेन्च ओपनमधून ग्रँड स्लॅम टेनिस कोर्टवर परतली. पण चौथ्या फेरीतून तिनं दुखापतीमुळे माघार घेतली होती.

Image copyright Getty Images

आता विश्रांतीनंतर सेरेना ग्रास कोर्टवर उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. विम्बल्डनमध्ये दाखल होताच सेरेनानं सेंटर कोर्ट गाठलं होतं आणि लेकीसोबतचा हा व्हीडियो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

'ओपन' युगात म्हणजे व्यावसायिक टेनिसच्या इतिहासात एकेरीत सर्वाधिक २३ विजेतीपदं मिळवणाऱ्या सेरेनाला आणखी एक विक्रम खुणावत आहे. मार्गारेट कोर्टचा एकेरीत सर्वाधिक २४ ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम आहे.

4. महिला टेनिसमधली चुरस

सेरेनाची आजवरची कामगिरी पाहता तिला जागतिक क्रमवारीत १८३व्या स्थानी घसरण झाल्यावरही विम्बल्डनसाठी २५वं मानांकन मिळालं आहे. पण सेरेनाशिवाय महिला टेनिसमध्ये विजेतेपदासाठी पुढच्या पिढीच्या काही खेळाडूंच्या कामगिरीवरही टेनिस चाहते लक्ष ठेवून आहेत.

गतवेळची विजेती गार्बिनी मुगुरुझा, अव्वल मानांकित आणि फ्रेंच ओपन विजेती सिमोना हालेप, २०११ आणि २०१४ सालची माजी विजेती पेत्रा क्विटोव्हा तसंच माजी वर्ल्ड नंबर वन कॅरोलिन वोझ्नियाकी आणि अमेरिकन स्टार स्लोएन स्टीफन्स या तिशीच्या आतल्या खेळाडूंमध्ये वेगळीच चुरस रंगण्याची अपेक्षा आहे.

5. पिछाडीवर पडलेले 'डार्क हॉर्स'

महिला एकेरीत व्हीनस विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा तसंच पुरुष एकेरीत नोवाक जोकोविच यांना विसरून कसं चालेल?

वयाच्या 39व्या वर्षीही व्हीनस खेळत आहे, हे एक आश्चर्य. गेल्या वर्षी तिनं दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांत उपविजेतीपदं मिळवली हे दुसरं आश्चर्य.

Image copyright PA

पण व्हीनसची जादू यंदा कायम राहील का? हा प्रश्नच आहे. कारण यंदा ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये तिला पहिल्या फेरीतच पराभव स्वीकारावा लागला होता.

दुसरीकडे रशियाच्या मारिया शारापोव्हाला कडवा संघर्ष करावा लागत आहे. डोपिंग प्रकरणी बंदीचा कालावधी संपल्यापासून शारापोव्हा तीन ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये खेळली आहे, पण एकदाही ती उपांत्य फेरीत पोहोचू शकलेली नाही.

कोपराच्या शस्त्रक्रियेनंतर नोवाक जोकोविचचीही काहीशी अशीच गत झाली आहे. तर हिप सर्जरीमुळं ऑस्ट्रेलियन आणि फ्रेन्च ओपनला मुकणारा अँडी मरे जागतिक क्रमवारीत 156व्या स्थानी फेकला गेला आहे. अँडीनं यंदाच्या विम्बल्डननमधून माघार घेतली आहे.

विम्बल्डनच्या हिरवळीवर या खेळाडूंना नवं चैतन्य मिळालं, तर ते अजूनही एखादा चमत्कार घडवू शकतात असा विश्वास त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे.

हेही वाचलंत का?

हे पाहिलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन हे एकाच वर्षी जिंकणं कठीण का आहे?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics