गुजरातमध्ये पाच हजार वर्षांपूर्वी होती स्मार्ट सिटी

  • जय मकवाना
  • बीबीसी गुजराती प्रतिनिधी
धोलाविरा

गुजरातमध्ये भूजपासून 200 किलोमीटर अंतरावर धोलाविरा नावाचं एक गाव आहे. हे गाव तिथल्या आगळ्या-वेगळ्या इतिहासासाठी ओळखलं जातं.

धोलाविरा हे गाव खदीर बेटावर वसलं आहे. 'कोटदा टिंबा' हा परिसर गावाजवळ असल्याने या गावाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

5000 वर्षांपूर्वी धोलाविरा प्रगत आणि भरभराट असलेलं सिंधू संस्कृतीतलं एक आधुनिक शहर होतं.

धोलाविरा - आंतरराष्ट्रीय बंदर

आयआयटी, गांधीनगर आणि आर्किऑलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया' यांनी एकत्रित केलेल्या संशोधनानुसार, ५००० वर्षांपूर्वीच्या या शहरांत पाणी साठवण्याची उत्तम व्यवस्था होती.

'ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार' (GPR) या तंत्रामार्फत इथल्या जमिनीच्या स्कॅनिंगचं काम इथे सुरू आहे.

धरणं, कालवे, विहिरी यांसारख्या पाणी साठवण्याच्या संसाधनांचे अवशेष जमिनीचे स्कॅनिंग करताना या ठिकाणी सापडले आहेत.

सिंधू संस्कृती ही आधुनिक नगररचनेचा उत्तम पुरावा मानली जाते. विशेषतः या काळात बांधण्यात आलेली घरे, सांडपाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था, सार्वजनिक चौक यांच्या बांधणीतून याची हमखास प्रचिती येते.

तसंच, वस्तूंचे वजन, मोजमाप, सिरॅमिक वस्तू, कला आणि कौशल्य याचीही उत्तम उदाहरणं सिंधू संस्कृतीत आढळतात.

धोलाविरा शहर वाळवंटात वसलेलं असूनही त्याकाळातलं समृद्ध आणि सांस्कृतिक, बहुभाषिक शहर होतं.

वाळवंटातली पाणी समस्या सोडवण्यासाठी सिंधू संस्कृतीतले त्या काळातले कुशल अभियंते झटले होते.

याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी डेक्कन कॉलेज ऑफ आर्किऑलॉजीचे कुलगुरू प्रा. वसंत शिंदे यांच्यासोबत बीबीसीनं बातचीत केली.

शिंदे सांगतात, "सिंधू संस्कृतीतल्या लोकांनी वाळवंटात एका आधुनिक शहराची निर्मिती केली. धोलाविरा त्या लोकांसाठी खूप महत्त्वाचं होतं. कारण, या शहरानं पुढे आंतरराष्ट्रीय बंदराची भूमिका बजावली."

जलनियोजन आणि अभियांत्रिकी कौशल्य

प्रा. वसंत शिंदे यांच्या मते, धोलाविरा शहर उभारण्यापूर्वी तेव्हाच्या लोकांनी एक सर्व्हे केला होता. एक व्यावसायिक बंदर उभारण्यासाठी धोलाविराचं स्थान उत्तम असल्याचं या सर्व्हेत लक्षात आलं.

धोलाविरा हे वाळवंटानं वेढलेलं असलं तरी सिंधू संस्कृतीतल्या लोकांनी त्यावरही चांगला उपाय शोधून काढला.

शिंदे सांगतात, "धोलाविराच्या दोन्ही बाजूंना मनसर आणि मनहर अशा दोन नद्या आहेत. या नद्यांना केवळ मान्सूनच्या काळात पाणी असतं. सिंधू संस्कृतीतल्या लोकांनी हे पाणी शहराकडे वळवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या नद्यांवर चेक डॅम्स बांधले. जेव्हा या नद्यांना पाणी किंवा पूर येत असे तेव्हा हे पाणी शहराकडे वळवलं जाई. अशारितीनं त्या लोकांनी वाळवंटात भरभराटीचं वातावरण निर्माण केलं."

हडप्पा संस्कृतीतली तंत्र जर आजही कच्छमध्ये वापरलं गेलं, तर तिथला भाग हिरवागार होऊ शकतो, असंही मत शिंदे यांनी व्यक्त केलं.

गुजरातमधली सिंधू संस्कृतीतली शहरं

जगात 5000 वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती, इजिप्शियन संस्कृती आणि मेसोपोटेमियन संस्कृती या तीन मोठ्या संस्कृती नांदत होत्या.

सिंधू संस्कृतीचा उदय पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम भारतात झाला. पाकिस्तानात असलेलं हडप्पा हे सिंधू संस्कृतीतलं महत्त्वाचं केंद्र होतं. म्हणूनच, या संस्कृतीला 'हडप्पा संस्कृती' या नावानं ओळखलं जातं.

या संस्कृतीची मूळं गुजरातपासून अफगाणिस्तानपर्यंत पसरली होती. हडप्पा, गानेरीवाला, मोहेंजोदारो, राखी गढी, रुपर आणि लोथल ही सिंधू संस्कृतीमधली प्रमुख शहरं होती.

धोलाविरा आणि अहमदाबाद जवळचं लोथल ही सिंधू संस्कृतीतली महत्त्वाची कच्छ भागातली शहरं आहेत.

या संस्कृतीनंच आधुनिक भारतीय संस्कृतीचा पाया घातल्याचं शिंदे यांचं मत आहे.

आर्किऑलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियाकडील माहितीनुसार, इ.स.पू. 1500 ते 3000 हा सिंधू संस्कृतीचा कालावधी आहे. पण, बहुतेक संशोधक या संस्कृतीला यापेक्षाही जास्त कालावधी असल्याचं सांगतात.

ही संस्कृती जवळपास 6000 वर्षं जुनी असल्याचं 'सिंधू संस्कृती' या पुस्तकाचे लेखक डॉ. समर कंडू मानतात. तर, प्रा. शिंदे यांच्या मते ही संस्कृती 5000 वर्षांहून जुनी आहे.

शिंदे सांगतात, "सिंधू संस्कृतीतल्या राखीगढी आणि इतर जागांवर नुकत्याच झालेल्या उत्खननात ही संस्कृती 5500 वर्षांहून जुनी असल्याचे पुरावे आढळले आहेत."

सिंधू संस्कृतीचा अंत कसा झाला यावर अनेक मत-मतांतरं आहेत. आर्यांचा भारतात प्रवेश झाल्यानंतर सिंधू संस्कृतीचा अंत झाल्याचं अनेक संशोधक मानतात.

ब्रिटीश लष्करी अधिकारी आणि पुरातत्त्वज्ञ सर एरिक मार्टीमर व्हिलर यांच्या मतानुसार, मध्य आशियातून आलेल्या आर्यांमुळे या संस्कृतीचा अंत झाला.

पण, प्रा. शिंदे यांना व्हिलर यांचा हा दावा मान्य नाही. शिंदे म्हणतात, "वातावरणातले बदल हे या संस्कृतीच्या ऱ्हासामागचं कारण आहे. त्या काळात केवळ दक्षिण आशियाच नव्हे तर संपूर्ण जगाला वातावरणीय बदलांचा सामना करावा लागला होता. प्राचीन इजिप्शियन संस्कृती आणि मेसोपोटिमियन संस्कृतींवरही या वातावरणीय बदलांचा परिणाम झाला होता."

'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी'नुसार, पाणी हे या संस्कृतीच्या अंताचं प्रमुख कारण होतं. या इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या संशोधनानुसार, त्सुनामीमुळे धोलाविराचं अस्तित्व संपुष्टात आलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)