धुळे हत्याकांड : 'माझा नवरा शिवाजी महाराजांसारखा दिसायचा, राजा सारखाच निघून गेला'

नर्मदा भोसले Image copyright PravinThakare
प्रतिमा मथळा नर्मदा भोसले

मुलं चोरणारी टोळी समजून जमावानं केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील राईनपाडा परिसरात ही घटना घडली. हे पाचही जण सोलापूरचे आहेत. या घटनेनंतर राईनपाडा येथे कर्फ्युसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारत शंकर भोसले (45), दादाराव शंकर भोसले (36), राजू भोसले (47), अगणू श्रीमंत हिंगोळे (20), भारत शंकर मावळे (45) या पाच जणांचा मारहाणीत मृत्यू झाला. ते सोलापूरमधल्या मंगळवेढे येथे राहणारे होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी सांगितलं की, "दुपारी 1 वाजता STच्या बसमधून पाच लोक गावात उतरले. त्यांच्याविषयी शंका आल्यानं लोकांनी त्यांची चौकशी सुरू केली. त्यांनी योग्य उत्तरं दिली नाहीत म्हणून जमावानं त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. नंतर पाचही लोकांना एका खोलीत बंद करून बांबू आणि दगडांनी मारहाण केली."

Image copyright PravinThakare
प्रतिमा मथळा मारहाणीत मृत्यू झालेले दादाराव भोसले.

"घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनाही जमावाने मारहाण केली. त्यांनी नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली आणि साक्री पोलीस ठाण्यातून जादा कुमक पाठवण्यात आली," असंही एम. रामकुमार म्हणाले.

पोलिसांनी त्या पाचही लोकांना रुग्णालयात दाखल केलं, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

याप्रकरणी 23 लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात उपस्थित असल्याचीही माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

मृतदेह घेण्यास नकार

"आम्हाला ही घटना काल चार वाजता समजली, आज आम्ही इथं आलो तर आम्हाला मृतदेह घेऊन जाण्यास सांगितलं गेलं, पण आम्हाला शासनाकडून काही मदत अपेक्षित आहे,"असं मारुती भोसले यांनी म्हटलं आहे.

Image copyright BBC/PravinThakare
प्रतिमा मथळा सरपंच मारुती भोसले

मृत व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय मंगळवेढा तालुक्यातल्या ज्या माणेगावातले आहेत त्या माणेगावचे मारुती भोसले सरपंच आहेत.

"मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत आणि पाल्यांना शासकीय नोकरी मिळावी ही अपेक्षा आहे, आम्ही आमच्या समाजाच्या लोकांशी बोलून हा निर्णय घेतला असून आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही," असं ते पुढे म्हणाले.

दरम्यान, सोमवारी दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली आहे.

हत्या झालेले गोसावी समाजाचे

हत्या झालेले पाचही जण हे नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे आहेत.

"भिक्षा मागण्यासाठी ही मंडळी या गावात गेली होती, पहिल्यांदाच असं काही घडलं आहे. नंदुरबार, धुळे, साक्री, वणी, सटाण्यात आम्ही फिरून आता परत गावाकडे जात होतो," असं जगन्नाथ गोसावी यांनी सांगितलं आहे.

Image copyright BBC/PravinThakare

जगन्नाथ आणि त्यांच्या गावातली काही गोसावी समाजाची मंडळी भिक्षा मागण्यासाठी सध्या उत्तर महाराष्ट्रात फिरत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे सर्वजण सोलापुरातल्या मंगळवेढा तालुक्यातून आले आहेत. साक्री तालुक्यात त्यांनी तंबू उभारले आहेत.

"माझा नवरा शिवाजी महाराजांसारखा दिसायचा, राजा सारखा निघून गेला. सकाळी 9 वाजता सगळे इथून गेले, 11 वाजता असं झालं. आम्ही फोन लावला, पण तो बंद होता. नंतर एका माणसानं फोन उचलला. तो दुसऱ्यांना काहीतरी सांगत होता," नर्मदा भोसले सांगत होत्या. त्यांच्या पतीचा आणि दिराचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

अफवांचं पीक

राज्याच्या काही भागात सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांना पीक आलं आहे. मुलं चोरणारी टोळी गावागावात फिरत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरली आहे.

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात या अफवांचं प्रमाण वाढलं आहे. या अफवा रोखण्यासाठी पोलिसांकडून पत्रकं सुद्धा वाटण्यात आली होती, पण अफवा पसरणं सुरूच आहे.

धुळ्यात घडलेली ही घटना काही राज्यातली पहिलीच घटना नाही. गेल्याच आठवड्यात नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात मुलं चोरण्याच्या आरोपाखाली जमावानं 3 जणांना मारलं होतं. त्यांची इनोव्हा कार सुद्धा जाळण्यात आली होती.

Image copyright Pravin Thakre
प्रतिमा मथळा याच खोलीत त्या पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आली.

गावकऱ्यांचा विरोध

घटनेनंतर गावात दाखल झालेल्या पोलिसांना विरोधाचा सामना करावा लागला, त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक रामकुमार यांनी अतिरिक्त कुमक गावात तैनात केली आहे.

रविवारी या गावात आठवडी बाजार भरतो, त्यामुळे मारणाऱ्यांची संख्या जास्त होती असं सांगितलं जात आहे.

"हे प्रकरण खूपच गंभीर आहे, दोषींवर कडक कारवाई केली जाईल," असं धुळ्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी म्हटलं आहे.

हे पाहिलं का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : मुलं पळवणाऱ्या टोळीचा 'तो' व्हीडिओ पाकिस्तानातला

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)