#5मोठ्या बातम्या : बुलेट ट्रेन तर श्रीमंतांचे चोचले : 'मेट्रोमॅन' ई. श्रीधरन यांची टीका

बुलेट ट्रेन

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या अशा :

1. बुलेट ट्रेन हे श्रीमंतांचे चोचले: . श्रीधरन यांचे मत

बुलेट ट्रेनचा प्रवास अत्यंत महागडा असून तो सामान्य माणसांना परवडणारा नाही. ही ट्रेन म्हणजे श्रीमंतांचे चोचले आहेत, असं मत कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रोसारख्या प्रकल्पांचे माजी प्रमुख ई. श्रीधरन यांनी व्यक्त केलं आहे.

बुलेट ट्रेनपेक्षा सध्या देशाला आधुनिक, सुरक्षित, जलदगतीच्या रेल्वेगाड्या व यंत्रणेची गरज आहे असं ते म्हणाले. ही बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे.

भारतीय रेल्वेचे अद्याप आधुनिकीकरण झालेल नाही असे ते म्हणाले. बायो टॉयलेट सुविधा वगळता रेल्वेच्या सुविधांमध्ये तांत्रिक सुधारणा झाली नाही असं ते म्हणाले.

2. दूध आणि मर्सिडीजला एक कर शक्य नाही : नरेंद्र मोदी

Image copyright Getty Images

वस्तू आणि सेवाकर (GST) या करपद्धतीला लागू करून केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. 'मर्सिडिज कार आणि दूध यांच्यावर सारखाच कर लावला जाऊ शकत नाही,' असे सांगून 'जीएसटी'च्या एकसमान दराची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळल्याचे वृत्त स्वराज्य या पत्रिकेने दिले आहे.

तामिळनाडू येथून प्रकाशित होणाऱ्या स्वराज्य या नियतकालिकाने घेतलेल्या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांवर चर्चा केली आहे. जीएसटीअंतर्गत एकसमान कर ठेवण्यात आला असता तर गोष्टी अधिक सुलभ झाल्या असत्या पण आपण अन्नपदार्थांना सरसकट करातून सूट देऊ शकत नाही असं ते म्हणाले.

3. साहित्य संमेलनाची निवडणूक बंद, सर्वसहमतीने संमेलनाध्यक्ष ठरणार

आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक घेतली जाणार नाही, असा ठराव नागपूर येथे झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणूक घेण्यात येत होती. यापुढे संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही अशी घटनादुरुस्ती घेण्यात आली आहे. 92व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्थळ वर्धा किंवा यवतमाळ हे असेल असं देखील ठरलं आहे.

4. उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 47 ठार

उत्तराखंडमधील पौडी गढवाल राज्यातील नैनीडांडा भागात एक बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात 47 जण ठार झाल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. या अपघात 11 जण जखमी झाले असून जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

एनडीआरएफचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले आहे. बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली आहे. जखमींना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात नेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बसची क्षमता 28 प्रवाशांची होती पण त्या बसमध्ये एकूण 58 जण बसले होते.

5. ट्रोल झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी घेतला पोल

Image copyright MeaIndia

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विटरवर ट्रोल्सनी त्रस्त केलं आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळून सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर एक पोल सुरू केला आहे, असं वृत्त द हिंदूनं दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुषमा स्वराज आणि त्यांचे पती स्वराज कौशल यांच्याविरोधात ट्विटरवर मोहीम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मला असे ट्वीट येत आहेत. अशा प्रकारचे ट्वीट तुम्हाला मान्य आहेत का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यांच्या पोलला 1.14 लाख जणांनी प्रतिसाद दिला असून त्यापैकी 57 टक्के लोकांनी नकारात्मक प्रतिसाद दिला आहे तर 43 टक्के लोकांनी ट्रोलिंगचं समर्थन केलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)