मॉब लिंचिंग: कुणाला ठेचून मारण्यापर्यंत जमाव हिंसक का होतोय?

गर्दी Image copyright Getty Images

"मुलं पळवणारी टोळी गावात फिरत आहे, मुलांना बाहेर सोडू नका," अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर फिरू लागतो. जोडीनं कथित अपहरणकर्त्यांचे फोटो, व्हीडिओ ही फिरू लागतात. हे मेसेज खरे आहेत का, याची पडताळणी कुणीच करत नाही.

एकानं पाठवला म्हणून दुसरा आणखी दहा जणांना पाठवतो. यातून गावात एक भीतीचं वातावरण तयार होतं. मनावर स्वार झालेली ही भीती, अस्वस्थता, राग हिंसकही ठरत आहे. लोक कायदा हातात घेऊन कुणी संशयित दिसलं की त्याला थेट ठारच करत आहेत.

धुळ्यातल्या राईनपाडा गावात रविवारी हत्याकांड घडलं. मुलं पळवणारी टोळी समजून जमावानं पाच जणांना ग्रामपंचायतीच्या एका खोलीत डांबलं आणि लोखंडी सळ्या, बांबूनं बेदम मारहाण करून संपवूनच टाकलं. मालेगाव आणि गुजरातमध्येही अशाच अफवांमुळे जमावाकडून लोकांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

देशात अनेक भागांत हा प्रकार याआधी घडला आहे, त्यामागची कारणं, किंवा संशयाचं कारण वेगळं असेल. गोमांस बाळण्याच्या किंवा गाईंची एका ठिकाणाहून दुसरीकडे ने-आण करतानाही काही जणांना कथित गौरक्षकांच्या हिंसक जमावानं यमसदनी धाडलं आहे.

आणि याचे व्हीडिओही आता सोशल मीडियावर सर्रास फिरवले जातात, लोकांच्या मनातल्या भीतीला यामुळे आणखी खतपाणी मिळतंय.

व्हॉट्सअॅप, फेसबुकवरून आलेले मेसेजेस लोकांना इतकं चिथावू शकतात का, जमावाची ही हिंसक मानसिकता काय असते, सोशल मीडियाच्या या धोक्यांवर आपण बोलत का नाही, असे अनेक प्रश्नं या घटनांमधून आपल्यापुढे उभे राहतात.

गर्दीचा मेंदू

गर्दीच्या या मानसिकतेचा एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे या गर्दीचा स्वतःचा एक मेंदू. हा मेंदू या गर्दीतूनच तयार झालेला असतो आणि ही गर्दी त्यानुसार वागत असते.

कोल्हापुरातील मानसशास्त्र तज्ज्ञ डॉ. कल्याणी कुलकर्णी म्हणाल्या, "गर्दीचं एक मानसशास्त्र असतं. गर्दीतल्या लोकांतून नैतिकता निघून गेलेली असते. 10 लोक जसे वागतात, तशीच गर्दीतील इतरांची वर्तणूक होते. अशा प्रकारांमध्ये बॉडी लँग्वेजची मोठी भूमिका असते. अशा वेळी वैयक्तिक अस्तित्व संपलेलं असतं आणि लोकांच्या भावना हायजॅक झालेल्या असतात."

"प्राण्यांना त्यांच्या पिलांबद्दल जास्त सहानुभूती असते. माणूसही शेवटी प्राणीचं आहे. आपली मुलं धोक्यात आहेत, असं वाटलं की तीव्र प्रतिक्रिया निर्माण होते. पण या घटनांत समोर कोण आहे, याचा कोणाताही विचार झालेला नाही. ज्या व्यक्तींचं स्वतःवर नियंत्रण नसतं त्यांच्याकडून अशा प्रकारची प्रतिक्रिया दिसून येते," त्या सांगतात.

देशात अशा घटना वाढत असल्याबद्दल त्या म्हणाल्या, "लोक एखाद्या गोष्टीशी रिलेट करू शकले, सगळ्यांना एखादा समान धागा असला तर लोक एकत्र येतात. पूर्वी हे रचनात्मक कामासाठी झाल्याचंही आपण पाहिलं आहे."

Image copyright AFP
प्रतिमा मथळा कथित गौरक्षकांचं प्रातिनिधिक छायाचित्र

गुजरातमध्येही सोशल मीडियातून पसरणाऱ्या अफवांमुळे मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. अहमदाबादचे मनोविकारतज्ज्ञ डॉ. प्रशांत भिवानी आणि डॉ. मुकुल चोक्सी यांनी याच घटनांमागची कारणं बीबीसी गुजरातीच्या भार्गव परीख यांच्याबरोबर बातचीतदरम्यान सांगितली.

डॉ. भिवनी म्हणाले, "अशा प्रकारच्या व्हायरल मेजेसमुळे काल्पनिक भीती पसरते. त्यामुळे काही शंकास्पद दिसलं तर लोक त्यावर हिंसक होऊन तुटून पडतात. असे लोक सहसा अशिक्षित असतात. त्यांच्या वैयक्तिक जीवनातील राग अशा पद्धतीनं बाहेर पडतो. अस्वस्थेला बळी पडणाऱ्या लोकांच्या हातून अशा घटना घडण्याची शक्यता जास्त असते."

ऑक्टोबर 2016 मध्ये बीबीसी न्यूजवर The myth of the mob: How crowds really work हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखामध्ये जमाव किंवा गर्दीचे तीन प्रकार देण्यात आले आहेत.

1. हिंसक जमाव

जमाव हिंसक बनल्याच्या कितीतरी घटना आपण पाहतो. क्रीडांगणात, राजकीय मिरवणुकीत जमाव हिंसक झाल्याची उदाहरणं आहेत. तर काही वेळा उत्स्फूर्त हिंसक प्रतिक्रिया उमटल्याची उदाहरणं आहेत.

हिंसक घटनांत जमावाचं टार्गेट मात्र ठराविक असल्याचं दिसून आलं आहे. म्हणजेच हा जमाव दिशाहीन नव्हता, त्याला काही तरी कारण होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आंदोलनाचं प्रातिनिधिक छायाचित्र

2. शांत जमाव

जमाव मूलतः हिंसक असतोच, ही कल्पना किल युनिव्हर्सिटीचे प्रा. क्लिफोर्ड स्टॉट यांनी फेटाळली आहे. काही जमाव किंवा गर्दी त्यांना हिंसेसाठी चिथावण्यात येऊनही शांत राहिल्याची उदाहरणं आहेत.

1950 आणि 1960च्या दशकात अमेरिकेत नागरी हक्कांसाठी झालेल्या चळवळीतील आंदोलक शांत असायचे. त्यांना पोलिसांकडून चिथावण्याचे प्रयत्न झाल्यावरही ते शांत राहायचे, कारण अहिंसा हा त्या चळवळीचा भाग होता.

एखाद्या काँसर्टमध्ये आलेली गर्दी हिंसक नसते. हा तर संगीतात तल्लीन होऊन गाण्याचा आनंद लुटणारा अहिंसक जमाव असतो.

3. जमाव नसलेली गर्दी

जमावाची दोन उदाहरणं घ्या - एखादा सामना पाहण्यासाठी मैदानावर आलेल्या लोकांचा गर्दी आणि गजबजलेल्या मेट्रो किंवा लोकलमधून जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी. दोन्हीत काय फरक आहे?

मैदानावर तुम्हाला उस्ताह वाटेल तर रेल्वेच्या गर्दीत तुमची दमछाक झालेली असेल. असं का होतं? याचं कारण म्हणजे, स्टेडिअममध्ये आलेले लोक कुठल्या एका टीमला, प्लेअरला चीअर करत असतात, एका भावनेनं जुळलेले असतात.

तर रेल्वेतील गर्दीत माणसाचा माणसाशी संबंध काहीच नसतो. हीच रेल्वे एखाद्या बोगद्यात बंद पडली तर काय होईल? सहप्रवासी मग एकमेकांशी बोलू लागतात, आपले बिस्किट्स, चिप्स आणि चॉकलेट्स एकमेकांबरोबर शेअर करतात. हे होण्या मागचं कारण म्हणजे ते एकाच गैरसोईचे भाग झालेले असतात.

Image copyright BBC/PravinThakare
प्रतिमा मथळा मुलं पळवणारी टोळी समजून मारहाण होण्याची घटना मालेगावातही घडली आहे.

योग्य प्रशिक्षण नाही

या सगळ्या घटनांतील एक समान धागा दिसून येतो, तो म्हणजे सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा आणि त्यामुळे प्रक्षुब्ध झालेला जमाव. या संदर्भात रिस्पॉन्सिबल नेटिझन या चळवळीचे प्रकल्प संचालक उन्मेष जोशी सांगतात की भारतीयांना तंत्रज्ञानाची नीट ओळख करून दिली जात नाही, त्यामुळे असे प्रकार घडतात.

ते म्हणाले, "90च्या दशकात अचानक TV चॅनल आले. तसंच मोबाईलच्या बाबतीत असंच म्हणता येईल, पण बेसिक काळजी काय घ्यायची, या बद्दल मात्र कुणीच बोलत नाही. इंटरनेटच्या धोक्यांबद्दल इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्याही काही बोलत नाहीत. सरकारी आकडेवारी जर पाहिली तर सायबर क्राईममध्ये 300 पट वाढ झालेली आहे."

धुळ्यातील प्रकार हा सोशल मीडियामुळे होणाऱ्या गुन्ह्यांत येतो, असं सांगून जोशी पुढे म्हणाले, "सायबर क्राईमबद्दल किमान आता चर्चा होत आहे, पण सोशल मीडियाच्या धोक्यांबद्दल कुणीही बोलत नाही."

बीबीसी गुजरातीबरोबर बोलताना डॉ. चोक्सी सांगतात, "एखादा मेसेज शहानिशा न करता पुढे पाठवला जातो. यातून लोकांमध्ये संभ्रम, अस्वस्थता, भीती आणि राग पसरताना दिसतो. प्रसारमाध्यमांवर कुणाचं तरी नियंत्रण असतं, पण सोशल मीडियावर असं कुणाचंच नियंत्रण नसतं, त्यामुळे तिथं अशा अफवा वेगानं पसरतात. विशेषतः जे लोक अस्वस्थ, असुरक्षित आणि अशिक्षित असतात, त्यांच्याकडून असे मेसेज विचार न करता फॉरवर्ड केले जातात."

जमावानं मारहाण करणं, जमावानं ठेचून मारणं अशा घटना देशात वाढत आहेत, असं मत सायकॉलॉजिस्ट प्रसन्न रबडे यांनी व्यक्त केलं. "काही वेळा आपल्या सोयीसाठी या अफवा पसरवल्या जातात. सुरुवातीला हा प्रकार फक्त सावधतेचे इशारे देण्यापुरता होता. सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत," असं ते म्हणाले.

असुरक्षितपणाची भावना आणि अविश्वास याच्या मुळाशी ढासळत चाललेली कुटुंबव्यवस्था हे महत्त्वाचं कारण आहे, असं ते म्हणाले.

'सोशल मीडियावर डोकं वापरा'

मग अशा घटनांना आळा कसा घालणार? सध्यातरी एकच उपाय आहे - सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका.

बेंगळुरूपासून ते धुळेपर्यंत, सर्वत्र पोलीस आणि सायबर क्राईम सेल हाच सल्ला देत आहेत. गरज पडल्यास कुठल्याही संशयाची, शंकेची किंवा अफवेची आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा 100वर डायल करून खात्री करून घ्या.

Image copyright Twitter

आम्ही बीबीसीच्या वाचकांनाही असले प्रकार रोखण्यासाठी काही मार्ग सुचवण्यास सांगितलं होतं.

त्यातले काही प्रामुख्यानं पुढे आलेले सल्ले असे -

सचिन पाटील सांगतात की "अशा अफवा ग्रुप्सच्या माध्यमातून सर्वाधिक पसरतात. त्यामुळे यापुढे ग्रुपवरील कोणतीही पोस्ट adminच्या परवानगीशिवाय स्वीकारली जाऊ नये आणि स्वीकारल्यास त्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी ही ग्रुप adminची असेल असा कायदा करावा."

"व्हॉट्सअॅपवर फक्त जो मेम्बर अफवा पसरवतो त्याचा फक्त पोस्ट टाकण्याचा अधिकार अडमिनला काढून घेता यावा, या उपायानं अफवांवर आळा बसायला मदत होईल," असं निलेश म्हेत्तर यांना वाटतं.

कौस्तुभ जंगम आणि संकेत देशपांडे हे एकसूरात हाच सल्ला देतात - "आपलं डोकं वापरा. मेसेजची शहानिशा करा. तारतम्यानं विचार करा आणि मगच संबधित गोष्ट खरी आहे की नुसती अफवा हे ठरवा. सत्यता पडताळून मगच प्रसारित करावा आणि विनाकारण आलेला संदेश न वाचता प्रसारित करू नये."

निरंजन जक्कल यांनी तर "व्हॉट्सअॅप आणि डेटा 'फुकट' वाटायच बंद करा सर्वांत आधी," असा सल्ला दिला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)