मालेगाव : अफवेमुळे दोघांना मारहाण, हिंसक जमाव पोलिसांवरही धावला

जमाव Image copyright Pravin Thakre
प्रतिमा मथळा परिस्थिती नियंत्रणात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

मुलं पळवणारी टोळी गावात आल्याची अफवा पसरल्यानं मालेगावमधील आझादनगर भागात दोन जणांना मारहाण करण्यात आली आहे.

या मारहाणीचं वृत्त समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील अनर्थ टळल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त हर्ष पोद्दार यांनी सांगितलं.

मुलं पसरवणारी टोळी गावात आली आहे अशा अफवा जागोजागी पसरत आहेत. अफवेमुळे धुळ्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याच पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये ही घटना घडली आहे.

Image copyright Pravin thakre
प्रतिमा मथळा जमावाने पोलिसांची जीप उलटवली

मारहाण झालेले हे लोक परभणीहून कामाच्या शोधात मालेगावात आले होते.

मालेगावच्या आझादनगर भागात एका कारखान्यात पाच जणांना डांबून ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी दोन पुरुष, दोन महिला तर एक अल्पवयीन मुलगा आहे.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : मुलं पळवणाऱ्या टोळीचा 'तो' व्हीडिओ पाकिस्तानातला

जमावानं पुरुषांना जबर मारहाण केली. जमावानं काही जणांना डांबून ठेवल्याचं वृत्त पोलिसांना समजलं. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहून देखील जमाव शांत होत नव्हता.

जमावानं पोलिसांवर किरकोळ दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यांनी पोलिसांची व्हॅन उलटवली आणि एक चारचाकी जाळण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मारहाण झालेल्या पीडितांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोद्दार यांनी सांगितले.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)