महाराष्ट्रात आता आहेत 69 टक्के मराठी आणि 13 टक्के हिंदी भाषिक

  • आरती कुलकर्णी
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
Marathi alphabet

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

देशभरात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा तिसरा क्रमांक लागतो.

'मराठी असे आमुचि मायबोली' असं अभिमानानं म्हणणाऱ्यांची संख्या अलीकडेच वाढली आहे. कारण भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार, भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक तिसरा आहे. यावेळी मराठीनं तेलुगू भाषेला मागे टाकत तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे तर हा अभिमान जास्तच वाटतो आहे. या आकडेवारीतून आलेल्या निष्कर्षांबद्दल आम्ही भाषातज्ज्ञांना विचारलं. त्यातून भारतातल्या भाषांबद्दलची महत्त्वाची आणि रंजक माहिती समोर आली आहे.

भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्या मते, "मराठीचा क्रमांक तिसरा आहे याचा अर्थ भारतात मोठ्या प्रमाणावर मराठी बोलली जाते, असा आहे पण तरीही याची कारणं समजून घ्यायला हवीत. मराठी आणि तेलुगू भाषिकांमध्ये 19 लाखांचाच फरक आहे. त्यामुळे तेलुगूला मराठीनं मागे टाकलं, असं म्हणता येणार नाही. ही मराठीची प्रगती नाही आणि अधोगतीही नाही, पण मराठी ठळक प्रमाणात अस्तित्वात आहे, असं म्हणता येईल."

पहिल्या क्रमांकावर हिंदी आणि दुसऱ्या क्रमांकावर बंगाली या भाषा कायम आहेत.

उर्दूभाषिकांचं प्रमाण घटलं

महाराष्ट्रात मराठी, हिंदी या भाषांपाठोपाठ उर्दूचा क्रमांक येतो. महाराष्ट्रात 7 टक्के लोक उर्दू बोलतात, असं ही आकडेवारी सांगते.

देशभरात उर्दू बोलणाऱ्यांची संख्या 2001च्या प्रमाणात घटली आहे. 2001मध्ये 5.01 टक्के लोक उर्दू बोलत होते. ते प्रमाण या अहवालात 4.74 वर आलं आहे. महाराष्ट्रातले आदिवासी बांधव आणि उर्दू भाषिकांनी राजकीय दबावापोटी आपली मातृभाषा मराठी दाखवली असण्याची शक्यता आहे, असं गणेश देवी यांना वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मराठी भाषेसोबत जपल्या जाणाऱ्या परंपरांचे रंगढंग

हे सर्वेक्षण मातृभाषा या निकषावर आधारित आहे. मातृभाषा म्हणजे 'त्या व्यक्तीने आईकडून शिकलेली भाषा' अशी व्याख्या करण्यात आली आहे. त्या व्यक्तीच्या आईचा तिच्या बालपणातच मृत्यू झाला असेल तर मग तिच्या घरात बोलली जाणारी भाषा मातृभाषा म्हणून धरली जाते. या निकषांनुसार सगळ्या भाषांची क्रमवारी ठरवण्यात आली आहे.

डॉ. प्रकाश परब सांगतात, "महाराष्ट्रात शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांच्या चांगल्या संधी असल्यानं इथल्या लोकांना दुसऱ्या देशांत स्थलांतर करावं लागत नाही. आयटी किंवा उच्च शिक्षणासाठी मराठी लोक दुसऱ्या देशात स्थलांतर करतात. पण शेती, उद्योग किंवा आणखी व्यवसायांसाठी सामान्य मराठी माणसांना स्थलांतर करावं लागत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातली मराठी भाषिकांची संख्या घटलेली नाही."

महाराष्ट्रात 13 टक्के हिंदी भाषिक

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

महाराष्ट्रामध्ये 69 टक्के लोक मराठी भाषा तर 13 टक्के लोक हिंदी बोलतात, असं ही आकडेवारी सांगते. ही आकडेवारी मुख्यत: मुंबईमुळे आली आहे, असं भाषासमाजविज्ञान तज्ज्ञ डॉ. प्रकाश परब यांना वाटतं. मुंबईमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून हिंदी भाषिक येऊन स्थिरावले आहेत. बाहेरच्या प्रदेशातून मुंबईत येऊन स्थायिक झाले आणि पुढच्या दोनतीन पिढ्या मुंबईतच गेल्या, असेही अनेक जण आहेत.

गणेश देवी यांच्या मते, "हिंदीची वाढ महाराष्ट्र, भारतातच नाही तर जगभर झाली आहे. जगभरातल्या 60 देशांनी हिंदी भाषेला तिथली अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. हिंदी भाषेच्या या वृद्धीमध्ये हिंदी सिनेमाचा वाटा मोठा आहे. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्रात हिंदी ही दुसऱ्या क्रमाकांची भाषा आहे. मराठी आणि हिंदीमध्ये 70 टक्के शब्द समान आहेत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे."

या सर्वेक्षणात 41 टक्के लोकांनी आपली भाषा हिंदी आहे, असं म्हटलं. म्हणजे भारतात सुमारे 60 टक्के लोक हिंदी सोडून इतर भाषा बोलतात.

भारतात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, झारखंड या 10 राज्यांमध्ये हिंदी बोलली जाते. त्यासोबतच मध्य प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान या राज्यांमध्ये स्वतंत्रपणे बोलल्या जाणाऱ्या भाषा या हिंदीच्या पोटभाषा म्हणून दाखवण्यात आल्या आहेत. अवधी, बगाती, बंजारी, भोजपुरी, गढवाली या भाषांना स्वतंत्र स्थान असलं तरी त्या भाषा हिंदीच्या पोटभाषा म्हणून दाखवल्याने हिंदीभाषिकांचं प्रमाण वाढलं आहे, असं गणेश देवी यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

महाराष्ट्रात इंग्रजी ही अनेकांची माध्यम भाषा बनली आहे.

महाराष्ट्रात बहुसंख्य इंग्रजी भाषिक

भारतामध्ये 2 लाख 60 हजार लोकांनी आपली पहिली भाषा म्हणून इंग्रजीची नोंद केली आहे.

यामध्ये 1 लाख 6 हजार लोक महाराष्ट्रामध्ये आहेत, असं या आकडेवारीत म्हटलं आहे. याआधीचे अहवाल बघितले तर इंग्रजी बोलणाऱ्यांचं प्रमाण कोलकाता, चेन्नई, मुंबई अशा महानगरांमध्येच दिसतं. हाच पॅटर्न याही जनगणनेत दिसला, त्यामुळेच या अहवालात इंग्रजीबद्दलची माहिती वस्तुस्थितीला धरून नाही, अशी टीका गणेश देवी यांनी केली आहे.

त्यांच्या मते, महाराष्ट्र आणि देशभरात, तुमच्यासाठी दुसऱ्या क्रमांकाची भाषा कोणती? हा प्रश्न विचारला असता तर इंग्रजीचं खरं प्रमाण आपल्याला कळू शकलं असतं. मातृभाषा कोणतीही असली तरी भारतात इंग्रजीमध्ये प्राविण्य असणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. ते नाकारण्यात काहीच शहाणपण नाही, असं त्यांना वाटतं.

डॉ. प्रकाश परब यांनीही याच मुद्द्यावर भर दिला. आपण मराठीचा उल्लेख जरी मातृभाषा म्हणून करत असलो तरी व्यवहाराची भाषा आणि ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीचा वापर आपण सर्रास करतो. मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरला तरी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याकडेच पालकांचा कल असतो. त्यामुळेच मराठीची वाढ होतेय, हे चित्र फसवं आहे, असं त्यांना वाटतं.

फोटो स्रोत, Vikram Raghuvanshi

फोटो कॅप्शन,

मातृभाषा आणि माध्यम भाषा शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात.

कर्नाटक सरकारनं शालेय शिक्षणात कन्नडची सक्ती केली. त्यावर तुम्हाला कन्नडची सक्ती करता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला. त्यासोबतच माध्यम भाषा म्हणून इंग्रजी असू शकते, असंही म्हटलं, या निर्णयाचा दाखला ते देतात.

ते म्हणतात, "एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भाषा संक्रमित होते. यावर नजर टाकली तर एखाद्या पिढीच्या मागची पिढी आपल्याला त्या भाषेत जास्त पारंगत दिसते. याचप्रमाणे मराठी भाषिकांची संख्या जास्त दिसत असली तरी मराठीच्या गुणवत्तेमध्ये किती फरक पडला आहे हेही पाहावं लागेल."

तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार वाढला आहे याबद्दल ते समाधान व्यक्त करतात.

संस्कृतचं प्रमाण नगण्य

पूर्ण देशभरात संस्कृत ही भाषा सगळ्यात कमी प्रमाणात बोलली जाते. देशभरात संस्कृत बोलणारे अवघे 24 हजार 821 लोक आहेत, असं या अहवालात समोर आलं आहे. संस्कृतचा क्रमांक बोडो, मणिपुरी, कोकणी, डोगरी या भाषांच्याही खाली लागतो. पण संस्कृतची ही स्थिती हास्यास्पद आहे, असं म्हणता येणार नाही, असं गणेश देवी यांना वाटतं.

भारतात 22 शेड्युल्ड भाषा मानल्या गेल्या आहेत. त्यात संस्कृतचा समावेश असावा का, असा प्रश्न विचारला जातो. पण संस्कृतच्या बाबतीत फक्त संख्येचा निकष लावता येणार नाही. कारण संस्कृत ही आपल्याकडच्या हिंदी, बंगाली, काश्मिरी, नेपाळी, आसामी, ओरिया, मैथिली, मराठी अशा अनेक भाषांची मूळ भाषा आहे हे विसरून चालणार नाही, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

भारतामध्ये सुमारे 850 स्वतंत्र भाषा आहेत तर बोलीभाषांची संख्या 1369 पर्यंत पोहोचते. यातल्या अनेक भाषा लयाला गेल्या तसंच काही भाषा मुख्य भाषेच्या प्रवाहात सामील झाल्या. या सगळ्या सामाजिक प्रक्रियेमध्ये मराठी भाषेचं स्थान टिकून आहे ही चांगली गोष्ट आहे, अशी टिप्पणी गणेश देवी करतात.

हेही पाहिलंत का?

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : बीबीसी रेडिओवर मराठीतून पहिल्या बातम्या 1942 मध्ये प्रसारित झाल्या होत्या.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)