सोशल - 'बुलेट ट्रेनची नाही तर अपघात टाळणाऱ्या सुरक्षित प्रवासी यंत्रणेची गरज'

बुलेट ट्रेन Image copyright Getty Images

'बुलेट ट्रेनपेक्षा सध्या देशाला आधुनिक, सुरक्षित, जलद गतीच्या रेल्वे यंत्रणेची गरज आहे,' असं 'मेट्रोमॅन' ई.श्रीधरन काल म्हणाले. आज मुंबईत झालेल्या रेल्वे पूल दुर्घटनेनंतर श्रीधरन यांच्या वक्तव्याची नव्याने चर्चा सुरू झाली.

मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अंधेरीतील गोखले ब्रिजचा काही भाग कोसळला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. ब्रिजचा भाग थेट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील अंधेरीपासूनची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.

लोकल वाहतूक थांबली त्याचा फटका रस्त्यावरील वाहतुकीलाही बसला. पूर्ण पश्चिम उपनगरांतील वाहतूक उशीरापर्यंत सुरळीत होऊ शकली नव्हती. मुंबईची ही अवस्था कशामुळे होते, याची चर्चा सुरू असतानाच काल कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रोसारख्या प्रकल्पांचे माजी प्रमुख ई. श्रीधरन यांनी इन्फ्रास्ट्रक्चर धोरणाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करणारं वक्तव्य केलं. बुलेट ट्रेन हे श्रीमंतांसाठी असून भारताला सुरक्षित रेल्वे यंत्रणेची खरी गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बुलेट ट्रेनचा प्रवास अत्यंत महागडा असून तो सामान्य माणसांना परवडणारा नाही. ही ट्रेन म्हणजे श्रीमंतांचे चोचले आहेत, असं मत ई. श्रीधरन यांनी व्यक्त केलं आहे.

"भारतीय रेल्वेचे अद्याप आधुनिकीकरण झालेलं नाही असं ते म्हणाले. बायो टॉयलेट सुविधा वगळता रेल्वेच्या सुविधांमध्ये तांत्रिक सुधारणा झाली नाही", असं ते म्हणाले.

Image copyright PUNIT PARANJPE/AFP/GETTY IMAGES

दरम्यान, बीबीसीने नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)चे प्रतिनिधी धनंजय कुमार यांच्याशी ई. श्रीधरन यांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा केली. पण त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

"आमचं टार्गेट व्यापारी वर्ग आहे जे रस्ता किंवा विमानाने अहमदाबाद ते मुंबई प्रवास करतात. या वर्गाला आकर्षित करण्यासाठी आम्ही ही सेवा सुरू करत आहोत," असं धनंजय कुमार यांनी म्हटलं आहे.

"विमानाने प्रवास करण्यासाठीही तेवढाच वेळ जातो. एअरपोर्टला पोहोचेपर्यंतच जवळपास एक- दीड तास लागतात, त्यात ट्रॅफिक जाम आणि फ्लाईटच्या 1 तास आधी तुम्हाला एअरपोर्टवर पोहोचावं लागतं. म्हणजे अहमदाबादवरून मुंबईला जाण्यासाठी जवळपास 4-5 तास लागतात. या बुलेट ट्रेनमुळे तुम्ही हे 4-5 तासा ऐवजी दोन अडीज तासात अहमदाबादला पोहोचाल", असं धनंजय कुमार म्हणाले.

दरम्यान, ई. श्रीधरन यांनी केलेल्या विधानाबाबत वाचकांना काय वाटतं हे ही जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

त्यामध्ये मात्र अनेकांनी बुलेट ट्रेनची नाही तर सुरक्षित प्रवासी यंत्रणेची गरज असल्याचं म्हटलं आहे.

राजेंद्र गाडेकर म्हणतात, "बुलेट ट्रेन 2% अतिश्रीमंतांसाठी बनतेय. 98% जनता ट्रेन आणि आणि बसने फिरते, जी यंत्रणा सध्या मोडकळीस आली आहे. आजचा पूल कोसळला हे त्याचेच उदाहरण."

राजेंद्र यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देत सुरेश कोहारकर सांगतात, "सुरुवातीला या सगळ्या यंत्रणा फक्त २% लोकं वापरतात, पण पुढच्या काही वर्षांत ती सर्वसामान्यांची गरज बनते."

दीपक मेश्राम म्हणतात, "अशा प्रोजेक्टमध्ये अतोनात पैसे घालवण्यापेक्षा सरकारनी आहे त्या रेल्वे व्यवस्थेला सुरक्षित करण्यासाठी आसणारे मनुष्यबळ उभे करावे."

Image copyright Facebook

वैभव प्रमिला प्रकाश तिवरामकर यांनी 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन जे बोलले ते योग्य असल्याचं म्हटलं आहे. ते लिहितात, "मेट्रोचं जाळं पसरवलं तरी चालेल. त्याने लोकलचा ताण कमी होईल, पण सध्या २५ वर्षं तरी भारताला बुलेट ट्रेनची आवश्यकता नाही."

प्रवीणकुमार भनकरी यांनीही ई श्रीधरन यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, "सध्या भारत देशाला बुलेट ट्रेनची आवश्यकता नसून आपल्या भारतीयांची जीवनवाहिनी असलेल्या भारतीय रेल्वेची सुरक्षा आणि वाहक यंत्रणा अधिक सुरक्षित करण्याची गरज आहे."

Image copyright Facebook

"भारतात प्राथमिक गरजा जरी पूर्ण केल्या तरी खूप झालं. भारतात 21 शतकात देखील मुबलक पाणी, वीज आणि रस्ते मिळत नाहीयेत. जे मिळते त्याची क्वालिटी खूपच खराब असते", असं मत अमोल सपकाल यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)