सोनाली बेंद्रेची भावनिक पोस्ट, 'कॅन्सरशी संघर्ष अजून संपलेला नाही...'

  • ऋजुता लुकतुके
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
सोनाली बेंद्रे, कॅन्सर, किमोथेरपी, रेडिएशन

फोटो स्रोत, Twitter/SonaliBendre

बॉलिवुड अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या एका ट्वीटने मीडियामध्ये खळबळ माजली होती. आपल्याला 'हायग्रेड' आणि 'मेटॅस्टेसाईज्ड' कॅन्सर झाल्याचं या सविस्तर ट्वीटमध्ये तिने स्पष्ट केलं होतं. कॅन्सर झाल्याचं तिलाही अचानक कळलं होतं.

आता न्यूयॉर्कमधून उपचार घेऊन ती मायदेशी परतली आहे. घरी परतत असल्याचा मोठा आनंद तिनं व्यक्त केला आहे. त्यासाठी तिनं न्यूयॉर्कहून निघण्याआधी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि आपण परतत असल्याची वार्ता दिली.

घरच्यांना भेटण्यासाठई आतुर असल्याचं तिनं त्यात लिहिलं आहे. तिनं तिच्या मित्रमैत्रिणींचे आभार सुद्धा मानले आहेत.

याच पोस्ट मध्ये तिनं लिहिलं आहे की, "हा संघर्ष अजून संपलेला नाही... पण मी खूश आहे, या सुखद मध्यांतराची मी वाट पाहत होते."

या आधी जेव्हा तिला कॅन्सरचं निदान झालं होतं तेव्हा तिनं ट्वीटवर काय लिहिलं होतं ते पाहू या.

फोटो स्रोत, TWEETER

फोटो कॅप्शन,

सोनालीने ट्विटरद्वारे आपल्याला झालेल्या कॅन्सरची माहिती दिली

''कधीकधी अगदी अनपेक्षितपणे आयुष्य तुम्हाला मोठ्या संकटात टाकतं. अगदी अलीकडेच मला हायग्रेड आणि मेटॅस्टेसाईझ्ड कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. असं काही होईल असं वाटलंच नव्हतं. सतत जाणवणाऱ्या वेदनांमुळे काही चाचण्या करून घेतल्या आणि त्यातून कॅन्सरचं दुखणं समोर आलं. माझे कुटुंबीय आणि जवळचे मित्र मदतीसाठी धावून आले. या सगळ्यांची मी व्यक्तिश: ऋणी आहे.

"लवकरात लवकर उपचार सुरू करणं हा एकमेव उपाय आहे. आणि आम्ही तेच केलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. आम्ही आशावादी आहोत. कॅन्सरविरुद्ध लढा देण्याचा निर्धार मी केला आहे. या काळात मला भरपूर प्रेम आणि आधार मिळाला, त्याबद्दल मी कायम ऋणी राहीन. माझे कुटुंबीय आणि मित्र यांच्या जोरावर मी कॅन्सरला निकराचा लढा देणार आहे. ''

सोनाली बेंद्रेला कुठला कॅन्सर झाला आहे?

खरं तर सोनालीच्या ट्वीटमधले हायग्रेड आणि मेटॅस्टेसाईज्ड हे शब्द आजाराचं गांभीर्य सांगणारे त्यामुळे घाबरवणारे आहेत.

पण, ट्वीटमध्ये सोनालीला नेमका कुठे कॅन्सर झाला आहे आणि तो कुठपर्यंत पसरला याविषयी माहिती दिलेली नाही.

फोटो स्रोत, SONALI BENDRE/FACEBOOK

फोटो कॅप्शन,

कॅन्सर उघड होईपर्यंत सोनाली जाहिराती आणि टीव्ही शोमध्ये व्यग्र होत्या

त्यामुळे तिच्या कॅन्सरची नेमकी स्टेज आता सांगता येणार नाही, असं मुंबईतले रेडिएशन आँकॉलॉजिस्ट डॉ. प्रसाद दांडेकर यांनी सांगितलं.

त्याचवेळी मेटॅस्टेसाईज्ड या शब्दाचा अर्थंही त्यांनी स्पष्ट केला. ''कॅन्सरच्या गाठी शरीराच्या एका अवयवात तयार होतात. आणि त्यापासून आणखी छोट्या गाठी तयार होऊन रक्तातून त्या इतर अवयवांपर्यंत जातात. थोडक्यात कॅन्सर एका अवयवापासून दुसऱ्या अवयवापर्यंत पसरतो.''

"कधीकधी स्तनात निर्माण झालेल्या गाठी फुप्फुसात पोहोचतात. साधारणत: कॅन्सरच्या चार स्टेज पैकी तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजचा हा कॅन्सर असू शकतो", अशी शक्यता डॉ. दांडेकर यांनी व्यक्त केली आहे.

वरच्या स्टेजच्या कॅन्सरवर उपचार काय?

कॅन्सरचा उगम कुठे झाला? तो कधी, कुठल्या स्टेजला लक्षात आला? त्याचं स्वरुप काय आहे? या गोष्टींवर त्याचे उपचार अवलंबून असतात, असं तज्ज्ञ सांगतात.

सोनाली बेंद्रे यांनी न्यूयॉर्कमध्ये उपचारांना सुरुवात केली आहे. पण, तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये उपचारांच्या काय शक्यता असू शकतात यावर टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरमधले ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आशुतोष तोंडारे यांच्याशी आम्ही संपर्क साधला.

''कॅन्सरवरचा सगळ्यांत पहिला उपाय जिथे कॅन्सर झाला आहे त्या गाठी आणि पेशी काढून टाकणे म्हणजे शस्त्रक्रिया हा आहे. पण, शरीरातल्या एकाच भागात कॅन्सरच्या पेशी असतील तर ते शक्य होईल."

फोटो स्रोत, SONALI BENDRE/FACEBOOK

फोटो कॅप्शन,

आरोग्यदायी जीवनशैलीबद्दल सोनाली बेंद्रे नेहमी बोलायच्या.

"मेटॅस्टेसाईज्ड कॅन्सरमध्ये ती शक्यता जवळपास नाही. इथं सगळ्यात चांगला उपाय हा किमोथेरपी आणि कॅन्सर पसरण्याचा धोका कमी करण्यासाठी पाण्याबरोबर घ्यायच्या गोळ्या, इंजेक्शन्स हा आहे.

गोळ्यांमधली औषधं रक्तावाटे शरीरात सर्वत्र जातात. त्यामुळे कॅन्सरच्या पेशी मारण्याला मदत मिळते. काही वेळा कॅन्सरची तीव्रता कमी करण्यासाठी रेडिएशन उपयोगी पडतं.

पण, त्यासाठी कॅन्सर कुठल्या भागात आहे याची माहिती आवश्यक आहे. हाडांमध्ये झालेल्या कॅन्सरवर तो पसरणारा असला तरी रेडिएशन उपयोगी पडतं,'' डॉ. तोंडारे यांनी सांगितलं.

हायग्रेड कॅन्सरमध्ये जीव वाचण्याची शक्यता किती?

डॉ. दांडेकरांच्या मते, "कॅन्सरचा उगम आणि स्वरुप यावरून अंदाज बांधता येऊ शकेल. अगदी तिसऱ्या ते चौथ्या स्टेजच्या कॅन्सरचे रुग्णही 10 ते 15 वर्षं जगू शकतात. किंवा काही ठिकाणी फक्त काही महिन्यांचं आयुष्य रुग्णांच्या वाट्याला येतं. फुप्फुसात कॅन्सर झाला असेल तर वाचण्याची शक्यता कमी असते. पण, इतर अवयवांत झालेल्या कॅन्सरमधून बाहेर पडता येतं,'' डॉ. दांडेकर यांनी समजावून सांगितलं.

डॉ. आशुतोष यांनीही डॉ. दांडेकरांचीच री ओढली. ''कॅन्सरचा उगम कुठे झाला आणि रुग्णाची शारीरिक अवस्था कशी आहे यावर उपचार आणि जगणं वाचणंही अवलंबून असतं. वृद्धांमध्ये स्तनांचा कॅन्सरही जीवघेणा ठरू शकतो", डॉ. आशुतोष यांनी सांगितलं.

न्यूयॉर्कमध्ये उपचार घेण्याविषयी...

भारतातही अलीकडे मुंबईतलं टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा ऑल इंडिया मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट अशा ठिकाणी अद्ययावत उपचार मिळू लागले आहेत.

सेलिब्रिटीज मात्र अशा उपचारांसाठी बाहेरच्या देशात जाताना आपल्याला दिसतात.

''भारतात कुठल्याही कॅन्सरवर उपचार शक्य आहेत हे खरंच. एखादी उपचार प्रणाली उपलब्ध नसेल तर बाहेरून मागवून ती रुग्णाला देता येते. पण, टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये वर्षाला 40 ते 45 हजार नवीन केसची नोंदणी होते. तिथली गर्दी पाहता शक्य असेल तर कुणीही परेदशी जाणं पसंत करेल.'' डॉ. दांडेकरांच्या मते गुप्तता आणि खाजगीपणा जपणं हेच न्यूयॉर्कला जाण्याचं मुख्य कारण आहे.

फोटो स्रोत, SONALI BENDRE/FACEBOOK

फोटो कॅप्शन,

सोशल मीडियावर कॅन्सरची बातमी देताना सोनाली यांनी आपल्या पतीबरोबरचा हा फोटो टाकला आहे.

''कारण, बऱ्याचदा रुग्णांना आपल्याला काय झालं आहे हे सांगायचं नसतं. भारतात बातमी पसरतेच. पण, ती गुप्तता परदेशातल्या रुग्णालयात राखली जाते.

तसा करारच उपचारांपूर्वी रुग्ण आणि हॉस्पिटल दरम्यान झालेला असतो.'' दांडेकर यांनी आपला मुद्दा आणखी स्पष्ट केला.

भारतात सर्व प्रकारचे कॅन्सर उपचार उपलब्ध असल्याचं डॉ. आशुतोष यांनीही मान्य केलं. शिवाय इथं होणारा खर्चही परदेशात जाण्यापेक्षा कमी असेल.

पण, त्याचबरोबर कॅन्सर उपचारांचे साईड इफेक्ट्सकडे त्यांनी लक्ष वेधलं.

''किमो आणि रेडिएशनमुळे रुग्णांना इतरही समस्यांना सामोरं जावं लागतं. मळमळणं, उलट्या त्याचबरोबर केस गळणं असे त्रास सतत होतात. अशा वेळी सोनाली बेंद्रेसारख्या सेलिब्रिटी अभिनेत्रीला लोकांसमोर जाणं अवघड जाणार. यासाठीच त्यांनी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला असावा.'' डॉ. आशुतोष यांनी आपला मुद्दा मांडला.

मागच्याच महिन्यात अभिनेते इरफान खान यांनी मेंदूत गाठ झाल्याची बातमी उघड केली होती. त्यानंतर सोनाली बेंद्रे यांनी कॅन्सरची बातमी दिली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)