धुळ्यात हत्या झालेल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजातला मी पहिला PhD धारक आहे आणि...

धुळे हत्याकांड Image copyright Pravin Thakare
प्रतिमा मथळा नर्मदा भोसले

"गाव कौन सा? नाम क्या? कितने आदमी? कितनी औरतें? यहाँ किसलीये आए हो? दिन में घर देखते हो और रात में डाका डालते हो? ये हाथ में घडी कहाँ से आई? पकडो इनको, मारो. गले में मंगलसूत्र सोने का है? ये कहाँ से चुराया?" असं म्हणत गावातली पाच-सात माणसं अंगावर आली.

मध्य प्रदेशातल्या एका गावात आम्ही भिक्षा मागण्यासाठी गेलो होतो आणि हा प्रसंग आमच्यावर ओढवला होता. फक्त बोलून न थांबता त्यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

आमच्या सोबतची बायका-पोरं रडारड करू लागली, आक्रोश करू लागली. त्यानं गावातील आणखी काही लोक जमा झाले. कुणी मारण्याची, जीवे मारण्याची, कुणी मुखियाकडे नेण्याची तर कुणी पोलिसात नेण्याची भाषा करत होते. आमच्याबरोबर भटकंतीला दोन-तीन बिऱ्हाडं होती, पंधरा-वीस लोक तरी होते. एकमेकाला आधार देत जमावातल्या जाणत्याला-समजदाराला हेरण्याचं शास्त्र काहींना अवगत होतं.

'आम्ही चोर नाही, आम्हाला पोलिसांच्या हवाली करा, आम्ही चोर नाही, आमच्याकडे हा आमच्या गावाच्या पोलीस पाटलाचा दाखला आहे, आम्ही देवाचे भक्त, देवासाठी चंदा-वर्गणी मागतो, हा आमचा पत्ता, आम्ही अमक्या गावावरून आलो आहोत, अमक्या गावाला चाललो आहोत,' असं म्हणत त्या जमावाला व्याकुळतेनं पटविण्याचा प्रयत्न केला.

बराच मार बसल्यानंतर त्याला काही अंशी यश आलं. गावकऱ्यांनी आम्हाला बिऱ्हाडासह हजर केलं. चौकीत सुरुवातीला आम्हा सर्व भटक्यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात आला आणि नंतर आमच्याकडे असलेल्या पुराव्याची शाहनिशा करून बारा-तेरा तासांनी काही समज देऊन सोडण्यात आलं.

या ठिकाणावरून निघाल्यानंतर चार दिवस आम्ही चालतच होतो, पण कोणत्याच गावात आम्हाला राहण्या-थांबण्यास परवानगी देण्यात आली नाही. चोर समजण्यात आलं, माणसं समजण्यात आलंच नाही. वेळ आली होती, पण काळ आला नव्हता.

ते अगदीच माझं शाळेत जाण्याचं वय असेल. आम्ही नाथपंथी डवरी गोसावी असल्यानं आई-वडिलांसह भिक्षेसाठी सतत भटकंती सुरू असायची.

आम्हा भावंडाना नंतर वडिलांनी बोर्डिंग स्कूलमध्ये टाकल्यानंतरही गेल्या 35-40 वर्षांत यासारख्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं.

Image copyright Pravin Thakare
प्रतिमा मथळा अशा तंबूंमध्ये डवरी गोसावी समाजातील व्यक्ती राहतात

धुळ्यात जमावानं मुलं चोरी करण्याच्या संशयावरून बेदम मारहाण केल्यानं नाथपंथी डवरी गोसावी समाजातल्या पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली अन् माझ्या आयुष्यात आलेले हे सगळे कठीण प्रसंग डोळ्यासमोर तरळले.

भीतीचं वातावरण

मुलं उचलून नेणारी माणसं गावगावात फिरत आहेत, अशी अफवा संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर वेगवेगळ्या माध्यमातून पसरवली जात आहे. राईनपाडा गावातील जमावानं अशाच अफवांना बळी पडून सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा तालुक्यातल्या पाच जणांना अमानुषपणे मारलं.

मानवी देहाची विटंबना करत मारलं, क्रौर्याची सीमा राखली नाही. हिंस्त्र जमावाचा विवेक लुप्त झाला होता. विचारपूस करून संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देण्याची तसदीही जमाव घेत नाही. जमाव जीवावर उठून आपल्यासारख्याच माणसांच्या देहाची विटंबना करतो. हे सारं धक्कादायक आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या बारा तालुक्यात आमच्या समाजाचं मोठ्या संख्येनं वास्तव्य आहे. या घटनेनं नाथपंथी डवरी गोसावी समाजात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जगावं कसं हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

अनेक वर्षांपासून देशभरात विविध ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी ही मंडळी फिरत आहेत. मात्र अशी घटना घडल्यानं आता भीती निर्माण झाली असून प्रत्येक जण आपले नातेवाईक कुठे आहेत, कसे आहेत, याचा मागोवा घेत आहेत.

Image copyright Pravin Thakare
प्रतिमा मथळा राईनपाडाच्या याच खोलीत त्या पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आली.

अर्थात या समाजावरील अत्याचाराची ही काही पहिलीच घटना नाही. या अगोदर औरंगाबाद, अहमदनगर, नांदेड, अकोला आणि महाराष्ट्राबाहेर घडल्या आहेत.

अशा अनेक ठिकाणी संशयावरून नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या लोकांना चोर समजून, लुटारू समजून, मुलांना पकडून विकणारी टोळी समजून, भानामती करणारे, जादूटोणा करणारे असा आरोप करून अत्याचार करण्यात आले आहेत.

राईनपाडा गावातली ही बातमी कळताच आपली मंडळी जी बाहेरगावी भिक्षुकीसाठी गेली त्यांना लवकरात लवकर आपल्या गावी परत येण्याविषयीचे निरोप पाठवले गेले.

समाजातील अनेक जण कपडे आणि कपाळी भस्म गुलाल लाऊन वेषांतर करून अनेक गावोगावी फिरत होते. त्यांना सध्यातरी बाहेर फिरायला जाऊ नये अशी विनंती करण्यात येऊ लागली आहे.

शिवकाळापासून इतिहास

महाराष्ट्रात या नाथपंथी डवरी गोसावी समाजाची लोकसंख्या अंदाजे पाच लाखांच्या आसपास आहे. यांची आडनावं, नावं आणि दिसणं-पेहराव महाराष्ट्रातल्या मराठी समाजाप्रमाणेच असतो.

साधारणतः शिवकाळापासून या समाजाचा इतिहास तपासता येतो. देवाची सेवा करणे, देवळाची साफसफाई करणे, दुय्यम दर्जाची धार्मिक कामं करणे, असं जरी या समाजाचं स्वरूप असलं तरी या कामात यांना स्थिरता नव्हती.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - धुळे हत्याकांड: 'लोक त्या 5 जणांना रॉडने मारत होते'

याच कामाचं भांडवल करून भीक मागणं हा या समाजाचा पारंपारिक व्यवसाय आहे. मग ते भीक कशाही साधनाचा वापर करून मागत असतात.

ओरिसामधील पाच पाय, तीन शिंगे, दोन वसंडी अशा प्राण्यांसोबत भिक मागणे, नंदी बैलावर भीक मागणे, भविष्य सांगून भीक मागणे, अंगठीच्या खड्यावर भीक मागणे. हे सगळे व्यवसाय सततच्या स्थलांतराचे असतात.

या समाजाची अवस्था अतिशय बिकट आहे. सांगायला गाव नाही, राहायला घर नाही, ७/१२ दाखवायला जमीन नाही, शिधा मिळवण्यासाठी रेशनकार्ड नाही, मतदान करण्यासाठी ओळखपत्र नाही, शिक्षणाची परंपरा नाही, त्यामुळे शिक्षण नाही की सरकारी नोकरी नाही.

गेल्या ३०-४० वर्षांत या समाजाचे काही लोक भिक्षा सोडून अजूनही दुसरे दुय्यम दर्जाचे व्यवसाय करू लागले आहेत. भंगार गोळा करणे, कागद-काच-पत्रा-प्लास्टिक कचऱ्याच्या कुंडीतून काढून ते विकून उदरनिर्वाह करणे, म्हशी पाळणे, गॅस-स्टोव्ह दुरुस्ती करणे असे व्यवसाय करत आहेत.

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांत या समाजाचं शिक्षणातलं प्रमाण हे ०.०५ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. मी स्वत: या नाथपंथी डवरी गोसावी समाजातला पहिला पीएचडी धारक आहे. एवढ्या वर्षानंतर एक व्यक्ती पहिल्यांदा डॉक्टरेट मिळवते, यावरून या समाजातल्या शैक्षणिक मागासलेपणाचा अंदाज येऊ शकेल.

Image copyright Pravin thakarey
प्रतिमा मथळा धुळ्यातल्या राईनपाडा गावात पसरलेला शुकशुकाट

संपूर्ण महाराष्ट्रात ७०० ते ८०० पेक्षा अधिक लोक सरकारी नोकरीत नसतील. स्त्रियांचं शिक्षणातलं प्रमाण नगण्य आहे. उदरनिर्वाहाचं दुसरं साधन नसल्यामुळे हा समाज भिक्षा मागत असला तरी आता उदरनिर्वाहाची दुसरी साधनं शोधावी लागतील. भिक्षेकरी बांधवांकडे इतर समाजातील मंडळी भोंदू, लुटारू आणि चोर या भावनेतून पाहायला लागलेले आहेत.

भिक्षा मागणे बंद करा!

त्यामुळे भिक्षेकरी बांधवांनो, आता भिक्षा मागणं बंद करावं लागेल. भिक्षेकरी बांधवांनी वेळीच सावध होऊन आणि काळाची पाऊलं ओळखून परावलंबित्वाची कास सोडून स्वावलंबनाची कास धरणं हिताचं ठरणार आहे.

भिक्षा मागण्याच्या व्यवसायात कधी जिवघेणा हल्ला होईल आणि त्यामध्ये स्वतःचा जीव जाईल, हे सांगता येणार नाही. एकवेळ कष्ट करून पोट भरणं हे प्रगतीचं लक्षण ठरू शकतं. पण भिक्षा मागून पोट भरणे हे खऱ्या प्रगतीचं लक्षण ठरत नाही, ते अधोगतीचंच लक्षण ठरत असतं.

कधीकधी धाडसी निर्णय घ्यावे लागतात, रस्त्यावर उतरून किंवा मिळेल त्या मार्गानं झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून क्रांती केल्याशिवाय पर्याय नसतो. जुने जातीचे व्यवसाय सोडल्याशिवाय नव्या संधीची द्वारं दिसणार नाहीत.

Image copyright Pravin Thakre
प्रतिमा मथळा डवरी गोसावी समाजाचे प्रश्न विविधांगी आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाला मेलेली ढोरे ओढून नेण्याचा आणि ती न खाण्याचा सल्ला दिला. त्यानं होणारी आर्थिक झळ समाजाला सोसायला लावली. पण जातीच्या चिकटलेल्या खुणा पुसण्याचा प्रयत्न केला. त्याला यश आलं. हाच कित्ता गिरवावा लागेल.

सोबतच सरकारकडे आपला न्याय्य हक्क मागावा लागेल. मी तर म्हणेन सरकारनं या समाजाची सक्तीनं भीक बंद करावी. खास बाब म्हणून शासकीय-निम शासकीय विभागात नोकरी देण्याचे प्रयत्न करावेत. त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्या-त्या प्रकारची मदत करावी. या गटासाठी असलेल्या वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढवावा.

जातीचा दाखला, प्रमाणित दाखला, रेशनकार्ड, मतदान कार्ड, अधार कार्ड मिळण्याची व्यवस्था करावी. आश्रम शाळा उभाराव्यात, त्या सदृढ असाव्यात, त्यातलं अन्न खाण्यायोग्य असावं. हे झालं तरच पुन्हा एकदा राईनपाडा होण्यापासून आपण रोखू शकू.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)