नागपुरातून अरब राष्ट्रांत बोकड पाठवायचे की नाही? वाचा दोन्ही बाजू

बकऱ्या Image copyright Getty Images

"बोकडांची निर्यात थांबवा, असं मत जैन समाजाचे प्रतिनिधी मांडत आहेत. पण मेंढपाळांनी बोकडाचं करायचं काय? बोकड काही दूध देत नाहीत. काही लोकांना प्राण्यांची काळजी आहे, पण माणसांची नाही," असं मत भाजप खासदार डॉ. विकास महात्मे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

नागपूरहून संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) शारजाला 2000 बोकडांची विमानानं निर्यात केली जाणार होती. पण जैन समाजाच्या विरोधामुळे ती होऊ शकली नाही. त्यानंतर सोशल मीडियातून या घटनेच्या बाजूनं आणि विरोधात मतं व्यक्त केली जात आहेत.

भाजपच्या नेत्या शायना एन.सी. आणि मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निवेदन देऊन ही निर्यात रोखण्याची मागणी केली होती. तसंच सरकारनं उचलेलं हे पाऊल भाजपच्या विचारधारेच्या विरोधात असल्याचं शायना एन.सी. यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या संदेशात लिहिलं आहे.

बोकडांची निर्यात थांबवल्यामुळे मेंढपाळ आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, असा रोष व्यक्त केला जात आहे तर आमच्या धार्मिक भावनांचा आदर करावा, असं मत जैन समाजाचे प्रतिनिधी व्यक्त करत आहेत. दरम्यान, या प्रश्नावर काय तोडगा काढला जात आहे याचा बीबीसी मराठीनं वेध घेतला.

"प्रश्न फक्त 2,000 बोकडांचा नाही तर विदर्भातील शेतकऱ्यांना दिशा दाखवून नैराश्याच्या बाहेर आणण्याचा एक मार्ग आम्ही दाखवला होता. नागपूरमध्ये 46,000 मेंढ्या आणि 1,00,000 बकऱ्या आहेत. नागपूरहून बोकडांची आणि नर मेंढ्यांची निर्यात केली असती तर त्याचा फायदा पशुपालकांना झाला असता. हाच विचार आम्ही केला होता. पण जैन समाजानं विरोध केल्यामुळे ही निर्यात स्थगित करण्यात आली," अशी माहिती डॉ. महात्मे यांनी दिली.

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जैन समाजाशी चर्चा करण्यात येईल आणि त्यांना हा प्रश्न योग्यरित्या समजावून सांगण्यात येईल, असं ते पुढे म्हणाले.

'विरोध शेतकऱ्यांना नाही तर पशुंच्या कत्तलीला'

दिगंबर जैन समितीच्या अध्यक्ष डॉ. रिचा जैन यांनी शेतकऱ्यांना किंवा मेंढपाळांना विरोध नसल्याचं बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

त्या पुढे म्हणाल्या, "अहिंसा परमोधर्म ही भगवान महावीरांची शिकवण आहे. जर एखादी मुंगी मरते तर जैन समाजातील व्यक्ती हळहळतो. त्यावेळी 1 लाख पशुंची कत्तल केली जाईल हे ऐकल्यावर समाजातल्या लोकांना हे पटलं नाही त्यामुळेच आम्ही सरकारला निवेदन दिलं."

"जर चर्चेनं तोडगा निघत असेल तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आमचा विरोध शेतकऱ्यांना तर जीवहत्येला आहे," असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Getty Images

बोकडांच्या निर्यातीला होणारा विरोध अयोग्य असल्याचं डॉ. महात्मे यांना वाटतं.

ते सांगतात, "बोकडांच्या निर्यातीला होणारा विरोध अयोग्य आहे. मुंबईहून जहाजानं बोकडांची निर्यात केली जाते. त्या निर्यातीचा फायदा मुंबईजवळच्या पशुपालकांना होतो. नागपूर आणि परिसरातल्या पशुपालकांना याचा फायदा होत नव्हता. जैन समाजाचा विरोध मुंबईहून जाणाऱ्या बोकडांना नाही तर नागपूरहून जाणाऱ्या बोकडांना आहे."

बकरीचं दूध विकणं हा उत्तम पर्याय

बोकडांची निर्यात थांबवल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्याला काय पर्याय आहे? असं विचारलं असता डॉ. जैन म्हणाल्या, "बकरीचं दूध हे पौष्टिक असतं. ते विकून रोजगार निर्माण होऊ शकतो. त्या दुधात औषधी गुण असतात. बकरीचं दूध गरोदर बायकांना दिलं तर त्यांना पोषक आहार मिळू शकतो. तेव्हा बकऱ्यांना मारायचा हट्ट कशासाठी असा प्रश्न जैन यांनी उपस्थित केला. मेंढ्यांची लोकर विकूनही पैसे मिळतात."

दूध आणि लोकर विक्रीत नफा नाही

दूध विक्री हा पर्याय ठरू शकतो असं मत डॉ. जैन व्यक्त करत असल्या तरी त्यांच्या मताशी डॉ. महात्मे सहमत नाहीत ते म्हणतात, "विदर्भात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर स्वरुपाचा आहे. त्यामुळे त्यांनी शेतीबरोबर जोडधंदा केल्यास त्यांची आर्थिक सुधारणा होईल असा विचार शासन देखील करत होतं. जोडधंदा म्हणून पशुपालन करायचं असेल तर छोट्या शेतकऱ्यांना बकऱ्या किंवा कोंबड्या पाळाव्या लागतात. त्यांचा वापर मटनासाठी केला गेला तर ते फायदेशीर ठरतं."

Image copyright Getty Images

"बकरीचं दूध अल्प प्रमाणात मिळतं, तसंच मेंढ्या पाळून लोकरीचं उत्पादन काढलं तरी ते देखील फायदेशीर नाही. त्यातूनच बोकडांच्या निर्यातीची संकल्पना समोर आली. पण याला विरोध झाला. लोकांना बोकडांची काळजी आहे, पण माणसांची नाही. ही दुःखद गोष्ट आहे," असं खासदार डॉ. महात्मे सांगतात.

'मेंढपाळांकडे दुसरा पर्याय काय?'

एकवेळ शेतकऱ्यांकडे तरी दुसरा पर्याय उपलब्ध होऊ शकतो पण मेंढपाळांकडे दुसरा पर्याय काय आहे, असा प्रश्न खासदार डॉ. महात्मे विचारतात.

"मेंढपाळांची स्थिती खूप बिकट आहे. त्यांच्या जवळ दुसरा पर्याय देखील नसतो. जैन समाजाचे प्रतिनिधी म्हणतात त्यांनी दुसरा पर्याय निवडावा. पण रातोरात व्यवसाय बंद झाल्यावर कोणता पर्याय ते निवडतील? मेंढपाळ समाजात शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प आहे. जोपर्यंत त्यांची शैक्षणिक-आर्थिक स्थिती बदलत नाही तोपर्यंत त्यांना हा व्यवसाय सोडता येणार नाही."

'जैन समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर'

"लोकशाहीमध्ये सर्व समाजाच्या भावनांचा आदर झाला पाहिजे. आम्ही जैन समाजाच्या भावनांचा आदर करतो. मी स्वतः शाकाहारी आहे. अनेक लोक धार्मिक कारण नसलं तरी स्वतःच्या प्रकृतीचा विचार करून मांसाहार वर्ज्य करतात."

"नागपूरहून होणाऱ्या बोकडांच्या निर्यातीमुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावत असतील तर रोज मासे, अंडी, मटन खाल्लं जातं त्याचं काय? जर बोकडांची निर्यात झाली नाही तर पशुपालकांना मिळेल त्या भावात आपलं पशुधन विकावं लागेल. आम्ही जैन समाजाच्या भावना समजतो त्यांनी पण मेंढपाळ आणि शेतकऱ्यांची स्थिती समजून घ्यायला हवी," अशी विनंती महात्मे यांनी केली.

जैन समाज चर्चेसाठी तयार

दोन्ही पक्षांच्या भूमिकांमुळे कोंडी निर्माण झाली आहे. भविष्यात चर्चेनं यावर तोडगा निघावा असं डॉ. महात्मे यांना वाटतं तसंच चर्चा करण्याची तयारी डॉ. जैन यांनी दाखवली आहे.

"हा प्रश्न चर्चेनं सुटणार असेल तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्या निमित्तानं सर्व नेते मंडळी नागपुरात आहे. त्यांच्या सहकार्यानं एकत्र येऊन चर्चा करण्यास आमची काही हरकत नाही. जैन समाजातील ज्येष्ठ मंडळी या चर्चेत सहभागी होईल," असं डॉ. जैन म्हणाल्या.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)