हेरॉइनचं व्यसन सुटावं म्हणून 24 मित्र त्याच्या मदतीला धावून आले

  • रविंदर सिंग रॉबिन
  • अमृतसर
अंमली पदार्थ विळख्यातील तरुण

फोटो स्रोत, Thinkstock

मी हेरॉइनच्या पूर्णपणे आहारी गेलो होतो. एक दिवस जरी हेरोइन घेतलं नाही तर मला अस्वस्थ वाटू लागायचं. मी राहूच शकत नव्हतो. मग एक दिवस जे घडायला नको ते झाले!

हेरॉइन घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मी आईवरच हात उचलला... ज्या आईनं मला लहानाचं मोठं केलं तिला मी मारलं. मी काय केलं हे मला समजण्यासाठी सकाळ उजाडली. पण ही सकाळ नवी होती, कारण मी ठरवलं या विळख्यातून आता बाहेर पडायचं. आणि माझ्या मदतीला धावून आले 24 मित्र.

ही कहाणी आहे पंजाबमधील.

पंजाबमधील अंमली पदार्थाच्या विळख्याबद्दल बरंच लिहिलं गेलं आहे. याच पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या एका युवकाला बाहेर काढण्यासाठी 24 मित्रांची धडपड सुरू आहे.

या तरुणाला आता सरकारी हॉस्पिटलमधील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.

23 वर्षीय हरविंदरला (नाव बदललेलं) शाळेत असतानाच हेरॉइनची चटक लागली. आणि ही चटक लावणारा माणूस हरविंदरचा मामा होता.

हरविंदरचे आईवडील शेतकरी आहेत. त्याच्या मामाने एकदा त्याला हेरॉइन दिलं. ते घेतलं आणि मग त्याला ते आवडू लागलं. काही दिवसांतच तो या अंमली पदार्थाच्या पूर्ण आहारी गेला. त्याला हेरॉइनची इतकी चटक लागली की रात्रीअपरात्री तो मामाकडे जाऊन हेरॉइन घेऊ लागला.

मामाने सुरुवातीला त्याला हेरॉइन फुकट दिलं. नंतर मात्र तो यासाठी पैसे घेऊ लागला... प्रत्येक डोससाठी 500 रुपये! एक डोस त्याला दिवसभर पुरायचा.

फोटो स्रोत, Ravinder Singh Robin/BBC

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

लहान असतानाच हरविंदर मामाच्या ट्रकवर हेल्पर म्हणून जाऊ लागला होता आणि तो पूर्ण भारतभर फिरला आहे.

"दहावीपर्यंत अशी परिस्थिती झाली होती की मला दररोज हेरॉइन पाहिजेच होतं. त्यासाठी मी चोरीही करू लागलो आणि ट्रकवर जाणंही बंद केलं," हरविंदर सांगत होता.

त्याच्या कामानिमित्त फिरताना तो काही तरुणांच्या संपर्कात आला. तो सांगतो, "ही मुलं चांगली होती. त्यांनी त्यांच्या मानेवर तीन चांदण्या गोंदवल्या होत्या. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ग्रुपचं नाव थ्री स्टार ठेवलं होतं." या थ्री स्टार ग्रुपमध्ये 24 जण आहे.

"थ्री स्टार ग्रुपमधल्या मुलांना जेव्हा समजलं की मी ड्रग्ज घेतो, तेव्हा ते मला बजावू लागले... त्याचे धोके, वाईट परिणाम समजवून सांगू लागले. मी त्यांचा तिरस्कार करू लागलो. मी तेव्हा ट्रकवर जाणं थांबवलं होतं, पूर्णपणे हेरॉइनच्या आहारी गेलो होतो," हरविंदर त्याचा भूतकाळ बीबीसीला सांगितला.

"अखेर ती वाईट वेळ आली. हेरोइन घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मी आईला मारलं. तिला कधी मारलं, का मारलं, हे मलाही कळलं नाही. आईच्या हाताचं हाड मोडलं. हे सगळं मला दुसऱ्या दिवशी सकाळी कळालं. मी जे काही केलं त्याबद्दल मला माझीच घृणा वाटू लागली. या घटनेनंतर मी रडरड रडलो."

"अशा परिस्थितीत ती मुलं माझ्या मदतीला आली. त्यांनी सांगितलं की मला उपचाराची गरज आहे. हे सर्व 24 मित्र एकत्र आले आणि माझी मदत करू लागले. त्यांच्या मदतीमुळंच मी आज उपचाराचा खर्च उचलू शकत आहे. यातून पूर्णपणे बरं होण्याची मला खात्री आहे," हरविंदर सांगत होता.

फोटो स्रोत, Ravinder Singh Robin/BBC

थ्री स्टार ग्रुपचा सदस्य सतनाम सिंग (नाव बदललं आहे) म्हणाला की त्यांच्या ग्रुपमधील कुणी कधीही व्यसन केलेलं नाही.

"आम्ही हरविंदरला दवाखान्यात आणलं. तसंच आता त्याच्या उपचारासाठी मदतही जमा करत आहोत. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही काहीही मदत करायला तयार आहोत."

अमृतसरचे खासदार गुरजीत सिंग औजला आणि उपायुक्त के. एस. संघा यांनीही हरविंदरला मदतीची तयारी दाखवली आहे. औजला म्हणाले, "पंजाबमधील काही तरुण या जाळ्यात सापडले आहेत. हरविंदरला आर्थिक आणि इतर सगळी मदत करायची माझी तयारी आहे."

हे पाहिलं का?

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ: 'नशा सोडली नाही तर आपणही रस्त्यावर मेलेल्या कुत्र्यासारखं पडलो असू'

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)