तुम्ही सतत स्कार्फ बांधून फिरत असाल तर जरा हे वाचा

महिला Image copyright Reuters

तुम्हाला माहीत आहे का?

1. फक्त 5% भारतीय महिलांमध्ये व्हिटॅमिन डी चं प्रणाम योग्य आहे.

2. 26% महिलांमध्ये व्हिटॅमिन डी चं प्रमाण पुरेसं आहे.

3. भारतातील 69% महिलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे.

AIIMS (All India Institute Of Medical Science) म्हणजे एम्स, सफदरजंग आणि फोर्टिस या हॉस्पिटलमधल्या तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

व्हिटॅमिन डी चा संबंध सूर्यकिरणांशी आहे. सूर्यकिरणांतून मिळणारं व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. शिवाय शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमतेसाठी हे व्हिटॅमिन आवश्यक आहे.

बहुतांश भारतीय महिला घरीच असतात आणि घरातील कामांत व्यग्र असतात. त्यामुळे त्यांना सूर्यप्रकाश कमी मिळतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय महिलांचा पोशाख हा संपूर्ण शरीर झाकणारा असतो. त्यामुळे भारतीय महिलांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. भारतीय महिलांत व्हिटॅमिन डी कमी असण्याचं हेही एक कारण आहे.

महिलांमध्ये होणारे हार्मोनमधील बदल हे व्हिटॅमिन डी कमी असण्याचं तिसरं कारण आहे. मेनोपॉज नंतर आणि स्तनपान देणाऱ्या महिलांत ही समस्या प्रामुख्यानं आढळते.

डॉ. मोहसीन वली सांगतात, "फक्त सूर्यप्रकाश पुरेसा न मिळणं हे एकमेव कारण यामागे नाही. भारतीयांच्या खाण्यात रिफाईंड तेलाचं प्रमाण जास्त आहे. रिफाईंड तेलामुळे शरीरात कॉलेस्टेरॉलचे मोलेक्युल्स कमी प्रमाणात तयार होतात. शरीरात व्हिटॅमिन डी च्या निर्मितीमध्ये या कणांचा मोठा वाटा असतो." वली हे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे फिजिशियन आहेत.

Image copyright Thinkstock

ते म्हणाले, "जेवणात रिफाईंड तेल कमी होईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तूप आणि कच्च्या तेलाचं जेवणातलं प्रमाण वाढवता येऊ शकतं."

रिफाईंड तेलात ट्रान्सफॅट जास्त असतात. हे ट्रान्सफॅट शरीरातील चांगलं कोलस्टेरॉल कमी करून वाईट कोलेस्टेरॉल वाढवतात. यातून दुसरे आजारही संभवतात.

व्हिटॅमिन डी चं योग्य प्रमाण किती?

व्हिटॅमिन डी चं शरीरातील योग्य प्रमाण हे 75 नॅनोग्रॅम असावं लागतं. जर हे प्रमाण 50 ते 75 नॅनोग्रॅम इतकं असेल तर हे प्रमाण अपुरं मानलं जातं.

तर हेच प्रमाण 50 नॅनोग्रॅमपेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात व्हिटॅमिन डी चं प्रमाण कमी असल्याचं द्योतक आहे.

डॉ. वली यांच्या मते भारतात व्हिटॅमिन डी चं प्रमाण कमी असणं याला साथीच्या रोगाची उपमा द्यायला हवी, कारण भारतातील 95% महिला या कमतरतेनं ग्रासल्या आहेत. पुरुषांतही समस्या असली तरी हे प्रमाण महिलांच्या तुलनेत कमी असल्याचं त्यांनी सांगितलं.

बहुतांश भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डी चं प्रमाण 5 ते 30 नॅनोग्रॅम इतकं दिसून येतं.

काय परिणाम होतात?

डॉक्टरांच्या मते व्हिटॅमिन डी ची जर शरीरात कमतरता असेल तर त्याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. यामुळे शरीरात कॅल्शियम ग्रहण करण्याची क्षमता मात्र कमी होते. त्यामुळे दुसरे आजार सुरू होतात. त्यामुळे हाडं, स्नायू आणि सांध्याचे आजार उद्भवतात. सर्वांत जास्त धोका हाडं फ्रॅक्चर होण्याचा असतो.

भारतात झालेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की भारतात ज्या महिलांत व्हिटॅमिन डी चं प्रमाण कमी आहे त्यांना मधुमेहाचा धोका अधिक असल्याचं दिसून आलं आहे. हा वयोगट 20 ते 60 च्या दरम्यान आहे. जवळपास 800 महिलांच्या पाहणीतून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर या विषयावर बरंच संशोधन झालं आहे. ब्रिटनमधल्या न्यूरॉलॉजी या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिसर्च पेपरमध्ये व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे वृद्ध लोकांत वेडेपणाचा धोका वाढतो असं म्हटलं आहे. 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 1650 लोकांची पाहणी करून हा निष्कर्ष काढण्यात आला होता.

Image copyright BIOPHOTOASSOCIATES/SPL

युनिव्हर्सिटी ऑफ एकेस्टर मेडिकल स्कूलमध्येही अशाच प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

डेव्हिड लेव्हलिन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनात असं दिसून आलं की 1169 लोकांत व्हिटॅमिन डी चं प्रमाण चांगलं होतं. त्यात 10 पैकी एकाच व्यक्तीत वेडेपणाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तर 70 व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन डी चं प्रमाण फारच कमी होतं. त्यांच्यात 5 पैकी एका व्यक्तीत वेडेपणाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

AIIMS च्या अस्थिरोग विभागातले डॉक्टर सी. एस. यादव यांच्या मते निव्वळ खाद्यपदार्थांतून व्हिटॅमिन डी ची भरपाई करणं कठीण असतं, कारण अंड्याचा पिवळा बलक आणि काही प्रकारच्या माशांमध्ये व्हिटॅमिन डी असतं. त्यामुळे व्हिटॅमिन डी चं प्रमाण वाढवण्याचा उपाय म्हणजे उन्हात कमी कपडे घालून फिरणं किंवा व्हिटॅमिन डी चे सप्लिमेंट घेणं.

कमी कपडे आणि व्हिटॅमिन-डी चा संबंध काय?

यादव सांगतात, "सर्वसाधारणपणे लोक पूर्ण बाह्यांचे शर्ट, कोट, पॅंट घालतात, तर महिला साडी, सलवार-कमिज असे कपडे परिधान करून उन्हात वावरतात. अशावेळी फक्त चेहराच उघडा असतो आणि उन्हाच्या संपर्कात येतो. शरीराचा जास्त भाग उघडा राहिला तर शरीराला अधिक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळतं."

आता प्रश्न असा पडतो की किती वेळ उन्हात राहायला हवं?

डॉक्टर म्हणतात या संदर्भात कोणताही फॉर्म्युला नाही. दररोज 1 तास उन्हात फिरल्यानं चांगला लाभ मिळू शकतो असंही डॉक्टर सांगतात.

सर्वसाधारणपणे सकाळ आणि संध्याकाळी उन्हात फिरणं चांगलं मानतात. तर डॉ. यादव यांच्या मते कोणत्याही वेळी सूर्यप्रकाश अंगावर घेणं फायद्याचं ठरू शकतं.

तोंडावाटे व्हिटॅमिन डी घेणं फायद्याचं ठरतं. 8 आठवडे व्हिटॅमिन डी चे सप्लिमेंट घेणं फायद्याचं ठरतं.

भारताची भौगोलिक स्थिती बघता इथं वर्षभर सूर्यप्रकाश मिळतो. तरीही भारतात जर ही समस्या असेल तर हे गंभीरच मानलं पाहिजे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)