#5मोठ्याबातम्या : मुंबई बुडतेय, सरकार काय करतंय?- सुप्रीम कोर्ट

मुंबई पाऊस Image copyright Getty Images

विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे-

1. मुंबई बुडतेय, सरकार काय करतंय?

मुंबई पाण्याखाली बुडतेय आणि दिल्ली कचऱ्याच्या ढिगाखाली दबतेय पण सरकार काहीही करत नाहीये अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने सरकारला खडे बोल सुनावले. DNA नं या संदर्भात वृत्त दिलं आहे. तसंच घनकचरा व्यवस्थापनाबाबत कोणतंही ठोस प्रतित्रापत्र दाखल न केल्याबद्दल 10 राज्यं आणि 2 केंद्रशासित प्रदेशांना दंड ठोठावला.

या परिस्थितीबाबत असहायता दर्शवत न्यायमूर्ती एम. बी. लोकूर आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठानं सुनावणी दरम्यानं म्हटलं की, जेव्हा कोर्टाचा हस्तक्षेप होतो तेव्हा न्यायाधीशांवर न्यायालयीन सक्रियतेचा आरोप लावला जातो. पण जेव्हा सरकार इतक्या बेजबाबदारपणे वागतं तेव्हा काय करायचं असा सवालही न्यायालयाने केला.

8 एप्रिल 2016ला घनकचरा व्यवस्थापनासंबंधी नियमावली अस्तित्वात आली. मात्र दोन वर्षांनंतरही दोन तृतीयांश राज्यांनी याबाबत नियमांची पूर्तता केली नाही हे धक्कादायक आहे, असंही कोर्टानं सुनावलं.

2. फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपचं नवीन फिचर

द हिंदू ने दिलेल्या बातमीनुसार व्हॉट्सअॅपने आता एक नवीन फिचर आणलं आहे. त्यानुसार एखादा मेसेज हा फॉर्वर्डेड मेसेज आहे की पाठवणाऱ्याने तो स्वत: लिहिला आहे हे कळणार आहे. गेल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कडक पावलं उचलण्याचं आवाहन सरकारनं कंपनीला केलं होतं.

Image copyright AFP

त्यावर उत्तर देताना असं काही फिचर आणता येईल का अशी तपासणी करत असल्याचं कंपनीने सरकारला सांगितलं होतं. अखेर मंगळवारी जगभरातील व्हॉट्सअॅप युजर्ससाठी हे फिचर कंपनीने आणलं आहे.

3. रमझान संपल्यानंतर कट्टरतावाद्यांच्या संख्येत वाढ

रमझान संपल्यावर उठवण्यात आलेल्या शस्त्रसंधीनंतर, कट्टरतावाद्यांच्या भरतीत वाढ झाल्याची आकडेवारी मिळाल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे. जम्मू आणि काश्मीरच्या मल्टी एजन्सी सेंटर (MAC) ने ही आकडेवारी गोळा केली आहे. जून महिन्यात शोपिआन, पुलवामा, अनंतनाग आणि दक्षिण काश्मीरमधील कुलगाम या जिल्ह्यातील 27 युवकांची भरती झाली आहे.

"स्थानिक युवकांनी हातात शस्त्रं घेण्याचं प्रमाण 16 जून नंतर वाढलं आहे. कारण त्या दिवशी ईद होती. ईदनंतर शस्त्रसंधी संपली आणि लष्कराने मोहीम सुरू केली," असं श्रीनगर येथील एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितलं.

4. तुटलेल्या रुळाला बांधलं फडकं

तुटलेल्या रुळाला फडकं बांधून त्यावरून लोकल नेण्याचा प्रकार रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी मुंबईत केला आहे. एबीपी माझा ने ही बातमी दिली आहे. मुंबईच्या हार्बर रेल्वेवर मानखूर्द आणि गोवंडी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आणि रुळाचा तुकडा पडला. मात्र या तड्यांवर उपाय म्हणून फडकं बांधल्याचं समोर आलं आहे. अशा अवस्थेत या रुळावरून तीन लोकल धावल्या. हा प्रकार समोर येताच रेल्वेने रूळ दुरुस्त केला आहे. झालेल्या संपूर्ण प्रकाराबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, रेल्वेनं हा कपडा खूण म्हणून गुंडाळण्यात आला होता, असं स्षष्टीकरण दिलं आहे. गाड्यांचा वेगही दुरूस्ती होईपर्यंत कमी राखण्यात आला होता, असं रेल्वेनं म्हटलं आहे.

5. नाणार प्रकल्प जबरदस्तीने लादणार नाही- मुख्यमंत्री

स्थानिकांवर कुठल्याही प्रकाकचा दबाव आणून नाणार प्रकल्प जबरदस्तीने लादणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

Image copyright Twitter

नाणार प्रकल्पावर काँग्रेसचे सदस्य संजय दत्त, भाई जगताप, अमरनाथ राजूरकर, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आदी सदस्यांनी लक्षवेधी सुचना मांडली होती. त्यावर स्वत: उत्तर देईन असं मुख्यमंत्र्यांनी उपसभापती माणिकराव ठाकरे यांना सांगितलं होतं. उद्योगमंत्र्यानी यावर उत्तर द्यावं अशी विरोधकांची अपेक्षा होती. त्यावरून गोंधळ माजला. अखेर मुख्यमंत्र्यांनीच लक्षवेधीला उत्तर दिलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)