सोशल - 'बाबासाहेबांचं संविधान आहे तोपर्यंत भारताचा ना पाकिस्तान होणार ना हिंदुस्तान'

शशी थरूर Image copyright TWITTER/SHASHI THAROOR

'भाजप पुन्हा सत्तेत आलं तर भारताचा हिंदू पाकिस्तान होईल,' असं शशी थरूर एका कार्यक्रमात म्हणाले. त्यावर बीबीसी मराठीच्या वाचकांच्या प्रतिक्रिया.

बुधवारी (11जून) तिरुवनंतपुरममध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना थरूर यांनी हे वक्तव्य केलं होतं.

बीबीसी मराठीच्या 'होऊ द्या चर्चा' सदरात वाचकांनी काही विचारपूर्वक आणि मुद्देसूद प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संजय गायकवाड यांनी आपल्या कमेंटमध्ये धार्मिक कट्टरतावादाचा स्पष्टपणे विरोध केला आहे. ते लिहितात, "मला वाटतं, कोणतीही धार्मिक कट्टरता ही राष्ट्राच्या अडचणीचं मूळ आहे. सध्याचं एकंदर वातावरण पाहता हिंदू धर्माची बदनामी फार वेगाने जगभर होत आहे. सर्व जगभर आदर्श असलेल्या हिंदू धर्म, हिंदू जीवनपद्धती फार मौल्यवान अशी गोष्ट आहे. कट्टरता बाजूला सारून आपण आपली मूल्यं जपली पाहिजेत."

Image copyright FACEBOOK

शशी थरूर यांच्या विधानाचा विरोध करत मेघा अशोक गावडे लिहितात, "तथाकथित बौद्धिक सुपिकता असलेल्या खासदाराचे अशा प्रकारचे विचार भारतासारख्या संघराज्यीय राष्ट्राच्या राज्यघटनेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. अशा खासदारांवर कारवाई का होत नाही?" असा सवाल त्यांनी केला आहे.

Image copyright FACEBOOK

शिरीष सरपोतदार यांनी काँग्रेस आणि भाजप सरकारच्या काराकिर्दीची तुलना करत स्वत:च्या बालपणाचं उदाहरण दिलं आहे. "आम्ही लहान असताना (काँग्रेसच्या काळात) जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत जायचो. तिथे सकाळी मैदानात प्रार्थना होत असे. विनोबांची गीताई, पसायदान, सरस्वती स्तवन, गुरू वंदना अशा प्रार्थना सर्व 'जाती' 'धर्माची' मुलं एकमुखाने म्हणायची. तेव्हा कधी कोणी भगवेकरण म्हणून ओरडत नव्हते. आजकाल तेच सगळं भगवं कस झालं? नक्की रंग कोणाचा बदललाय?"

Image copyright FACEBOOK

अमेय बडदरे यांनी मात्र थरूरांच्या भाकिताशी सहमती दाखवली आहे. "सध्याची झुंडशाही आणि आजूबाजूच्या बेजबाबदार वक्तव्यांचा ओघ पाहता थरूर बोलले त्यात तथ्य आहे." पण त्यांना गोविंद माळवे यांनी, "तुम्ही पण काँग्रेसचे दिसताय" असा टोमणा मारला आहे.

Image copyright FACEBOOK

संदीप जाधवांनी भारतीय संविधानावर पुरेपूर विश्वास दाखवत, 'हिंदू पाकिस्तान'ची कल्पना खोडून काढली आहे. त्यांच्या मते, "जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान आहे तोपर्यंत भारताचा ना पाकिस्तान होणार ना हिंदुस्तान होणार"

Image copyright FACEBOOK

याउलट, विकास पवार यांच्या मते, "हिंदू पाकिस्तान तर आजच झाला आहे. 2019 नंतर जर भाजप सत्तेत आल्यास हिंदू तालिबान होईल."

Image copyright FACEBOOK

प्रशांत शिंदे यांनी "परिस्थिती अशीच राहिली तर 2019नंतर लोकशाही व्यवस्थेवर संकट निर्माण होईल", अशी प्रतिक्रिया दिली आहे. "सध्या देशात दिवसेंदिवस असहिष्णुता वाढत आहे. समाजामध्ये RSS आणि भाजप हे धार्मिक, जातीय द्वेष पसरवित आहे. देशातील दलित, अल्पसंख्याक, स्त्रिया असुरक्षित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जनतेला विकासाचे स्वप्न दाखविले होते. भाजप सरकारला जनतेने गोहत्या आणि लव्ह जिहाद थांबवण्यासाठी किंवा राममंदिर बांधण्यासाठी निवडून दिले नाही. जनतेला मोदीकडून विकासाची अपेक्षा होती."

"भाजप आणि मोदी सरकारमधील अलीकडच्या काळातील नेते, मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्यं पाहिली की, एवढे वर्षं त्याच्या पोटात साचलेलं बाहेर येत आहे, असं वाटतं. त्यांना संविधान आणि लोकशाही मान्य नाही. देशात 2019 साली सत्तेत परिवर्तन झालं नाही तर लोकशाही व्यवस्थेवर संकट निर्माण होईल", असं प्रशांत लिहितात.

Image copyright FACEBOOK/BBC

देशभरातून टीकेचा सूर निघाल्यावर शशी थरूर यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत या संदर्भात फेसबुक पोस्ट लिहिली आहे. "भाजप आणि संघाची हिंदुराष्ट्राची संकल्पना ही पाकिस्तानची तंतोतंत प्रतिकृती आहे. जिथे अल्पसंख्य अन्यधर्मीयांना मानानं जगता येत नाही. आपल्याला भारताची प्रतिमा जपायची आहे आणि पाकिस्तानचं हिंदू व्हर्जन होऊ द्यायचं नाही", असं ते लिहितात.

हेही वाचलंत का?

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)