IITची परीक्षा दरवर्षी दोनदा घेण्यात अडचण काय?

IIT, JEE, एज्युकेशन
प्रतिमा मथळा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर

पुढच्या वर्षीपासून IIT JEE Mains परीक्षा दरवर्षी दोनदा घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे या परीक्षेचं आयोजन करण्यात येईल.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. दोनदा परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा संधी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होईल.

आतापर्यंतच्या संरचनेप्रमाणे विद्यार्थी तीन वर्षात तीन वेळा मेन्सची परीक्षा देऊ शकत होते. दोनवेळा JEE advance परीक्षा देऊ शकतात. पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना सहा वेळा परीक्षा देण्याची संधी मिळू शकते.

पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना परीक्षेची पहिली संधी जानेवारीत तर दुसरी एप्रिलमध्ये मिळणार आहे. मात्र JEE Advance परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहे.

परीक्षेसाठी विशिष्ट अशा तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. JEE Mainsची परीक्षा 15 दिवस चालेल. विद्यार्थी आपल्या सोयीनुसार परीक्षा देऊ शकतील.

JEE Mainsची परीक्षा जानेवारी 2019 मध्ये होणार आहे. यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सप्टेंबर 2018 पासून सुरू होणार आहे. परीक्षेचा निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील.

नव्या प्रक्रियेतील अडचणी काय आहेत?

सरकारच्या नव्या घोषणेसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीवर याचा किती परिणाम पडेल?

'वर्षातून दोनदा परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना जास्त संधी मिळणार आहेत. साहजिक त्यांच्यावरचा दबाव कमी होईल कारण वर्ष फुकट जाण्याची भीती उरणार नाही', असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे संचालक विनित जोशी यांनी सांगितलं.

जानेवारीत IITची परीक्षा होईल आणि त्याच महिन्यात निकालही हाती येतील. जर एखादा विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नाही तर पुढच्या महिन्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी मानसिकदृष्ट्या तो तयार असेल का?

याचं उत्तर देताना विनीत जोशी यांनी सांगितलं, 'वर्षातून दोनदा परीक्षा देणं अनिवार्य नाही. मात्र ज्यांना इच्छा आहे ते देऊ शकतात. एखाद्या विषयाचा पेपर चांगला गेला नाही तर पुढच्या परीक्षेत चांगल्या तयारीनिशी नव्याने पेपर देऊ शकतो.

विद्यार्थ्यांचं मत काय?

याच वर्षी JEE Mains परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रिन्स कुमार हे विनित जोशी यांच्या मताशी सहमत नाही. प्रिन्स यांच्या मते, पहिल्यांदा परीक्षेत नापास झाल्याचं कळल्यावर दुसऱ्यांदा परीक्षेची तयारी करण्याकरता किमान 15 दिवस लागतात. पहिल्यांदा परीक्षेत नापास झाल्यावर विद्यार्थी खचून जातो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

रोपिन भंडारी यांनी नवा मुद्दा मांडला. ते म्हणाले, 'कोचिंग क्लासवाल्यांचं उखळ पांढरं होणार आहे. सिलॅबस भराभर पूर्ण करण्याची त्यांची घाई उडाली आहे. अख्खं वर्षभर त्यांच्यांकडे विद्यार्थ्यांचे जत्थे येत राहतील'.

जागा वाढतील का?

वर्षातून दोनदा JEE Mainsची परीक्षा घेण्यामागे विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करणं हा सरकारचा हेतू आहे. मात्र प्रिन्स आणि रोपिन यांना हा मुद्दा मान्य नाही.

जागा तेवढ्याच राहणार असतील तर विद्यार्थ्यांवरचा दबाव कमी नव्हे तर वाढण्याची शक्यता आहे. परीक्षेसाठीचा कटऑफ वाढेल आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांमधली स्पर्धा वाढीस लागेल.

Image copyright PTI
प्रतिमा मथळा परीक्षा दोनदा होणार असली तरी जागा तेवढ्याच राहणार आहेत.

सध्या देशभरातील 23 IIT मिळून 12000 जागा आहेत. दरवर्षी साधारण: 15 लाख विद्यार्थी JEE परीक्षा देतात.

'सरकारने याप्रकरणी चांगला पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना याचा फायदाच होईल. वर्षातून दोनदा परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगला पर्याय आहे. IIT ब्रँडसाठीही ही चांगली गोष्ट आहे. आता विद्यार्थी अधिक गंभीरतेने परीक्षेची तयारी करतील. अन्य कुणाशी तुलना किंवा स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करतील', असं IIT कानपूरमधील प्राध्यापक धीरज सांगी यांनी सांगितलं.

सर्वसामान्य मार्ग काय?

'सरकारच्या या निर्णयाने अन्य काही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. परीक्षेच्या प्रश्नांचं सामान्यीकरण कसं होईल? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एक परीक्षा अनेकदा आयोजित करण्यात आली तर प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी वेगवेगळी राहील', असं प्राध्यापक सांगी यांनी सांगितलं.

एक पेपर कठीण तर एक सोपा असू शकतो. कठीण पेपरमध्ये कमी गुण मिळालेले विद्यार्थी, सोप्या पेपरात अधिक गुण मिळालेले विद्यार्थी यांना समान समजलं जाईल. याला नॉर्मलायझेशन अर्थात सामान्यीकरण म्हटलं जातं.

Image copyright PTI
प्रतिमा मथळा विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोनदा परीक्षा सोयीची ठरणार आहे.

जगभरात जिथे जिथे एक परीक्षा अनेकदा आयोजित होते तिथे नॉर्मलायझेशन प्रक्रिया राबवली जाते. आताही IITमध्ये प्रश्नपत्रिकांचे अनेक सेट तयार केले जातात. मात्र CBSE गुणांमध्ये नॉर्मलायझेशन करत नाही.

'JEE Mains परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा आयोजित करण्यात आली तर नॉर्मलायझेशनचा प्रश्न ऐरणीवर येईलच. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला अनेक तज्ज्ञांची आवश्यकता भासेल. त्यांची नियुक्ती केव्हा आणि कशी होणार यावर चर्चा होणं गरजेचं आहे', असं प्राध्यापक सांगी यांनी सांगितलं.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी या मुद्यांचं निराकरण करण्यात किती यशस्वी होते आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना हाती घेण्यात येतात यासाठी पुढच्या वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)