#5मोठ्याबातम्या : 'गे' असणं म्हणजे विकृती नाही - सुप्रीम कोर्ट

गे Image copyright Getty Images

विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पाहूया.

1. 'गे' असणं म्हणजे विकृती नाही - सुप्रीम कोर्ट

इंडियन एक्स्प्रेसनं दिेलेल्या बातमीनुसार, एखादी व्यक्ती समलिंगी असणं ही विविधता आहे, ती विकृती नाही असं सुप्रीम कोर्टानं गुरुवारी स्पष्ट केलं.

LGBT म्हणजेच समलैंगिक असणाऱ्यांबद्दल बाळगल्या जाणाऱ्या पूर्वग्रहदूषित हेतूंमुळे त्यांना व्यवस्थित आरोग्य सुविधा मिळत नाहीत. असं निरीक्षण न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी नोंदवलं.

भारतीय दंड विधानाच्या 377व्या कलामानुसार, समलिंगी असणं हा गुन्हा असावा की नाही याबाबतच्या काही याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. यातील एका याचिकेच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं हे निरिक्षण नोंदवलं आहे.

2. लष्कराचे 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड बंद होणार

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार, देशात 250 वर्षांपूर्वी पहिल्या आर्मी कॅन्टोन्मेंट बोर्डाची म्हणजे लष्कराचा अंमल असलेल्या परिसराची (कँप) निर्मिती झाली. वाढत-वाढत ही संख्या 62 वर गेली.

मात्र, संरक्षण खात्याच्या अर्थसंकल्पावर या कॅन्टोन्मेंट बोर्डांचा भार पडत आहे. हा भार कमी करण्यासाठी देशातील सर्व 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड बंद करण्याचा निर्णय लष्करानं घेतला आहे.

Image copyright Getty Images

या कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या अंतर्गत लष्करी तळ आणि सभोवतालचा नागरी परिसर येतो. या नागरी परिसराचं नियोजनही या बोर्डाकडे असतं.

मात्र, केवळ लष्करी तळांवर आपलं नियंत्रण कायम ठेऊन त्याअंतर्गत येणारा नागरी परिसर स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचं लष्करानं संरक्षण खात्याला कळवलं आहे.

3. लडाखमध्ये फक्त चिनी मोबाईल कंपन्यांचं नेटवर्क

द हिंदूमधील बातमीनुसार, लेह-लडाख या भारतीय प्रदेशांलगतच चीनची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. या सीमावर्ती भागात भारतीय टेलिकॉम सेवांऐवजी चिनी टेलिकॉम सेवांचं नेटवर्क येत असल्याची बाब पुढे आली आहे.

'बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट'(BADP) या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी बैठक झाली. यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये लेह-लडाखमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याचा मुद्दा चर्चेला आला.

यावेळी लेहच्या उपायुक्त अवनी लवासा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमावर्ती भागात चिनी मोबाईल सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचं मोबाईलला नेटवर्क येतं. तर, भारतीय मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचं नेटवर्क येत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

4. संभाजी भिंडेंविरोधात याचिका

महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'चे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.

आंब्यांबाबत केलेलं वक्तव्य आणि 'संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षाही मनु श्रेष्ठ होते', या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले होते.

Image copyright Getty Images

भिडे यांच्या या विधानांमुळे राज्यघटना आणि कायद्याचं उल्लंघन झालं असल्यानं त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा विनंतीची याचिका संजय भालेराव यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत गुरुवारी केली आहे.

5. अध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांचं निधन

दै. दिव्यमराठीनं दिलेल्या बातमीनुसार, साधू वासवानी मिशनचे प्रमुख आणि सिंधी समाजाचे धार्मिक गुरू दादा जशन वासवानी (वय ९९) यांनी गुरुवारी सकाळी नऊ वाजता अखेरचा श्वास घेतला.

वयोमानानुसार, शरीर साथ देत नसल्यानं त्यांना तीन आठवड्यांपूर्वी रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. मात्र, प्रकृती उपचारांना साथ देत नसल्यानं बुधवारी सायंकाळीच त्यांना रुग्णालयातून साधू वासवानी मिशनमध्ये आणण्यात आलं होतं.

मात्र, गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)