कँसरच्या उपचारादरम्यानचा मोठा प्रश्न : 'डॉक्टर, माझे केस परत येतील ना?'

कॅन्सर
प्रतिमा मथळा मुग्धा देशमुख

अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना कॅन्सर झाल्याची बातमी पसरली आणि त्यांचे अनेक चाहते हळहळले. त्यातच काही दिवसांपूर्वी कॅन्सर उपचारांसाठी केस कापत असल्याचा त्यांचा व्हीडिओही प्रसिद्ध झाला. लांबसडक केस कापायला लागल्यामुळे झालेलं दु:खं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.

कोणत्याही स्त्रीसाठी तिचे केस ही तिच्या सौंदर्याची ओळख असते. पण कॅन्सरच्या उपचारांदरम्यान किमोथेरपीमुळे हे केसच पूर्णपणे गळतात.

हा अनुभव नुसताच वेदनादायी नाही, तर धक्कादायकही असतो. कॅन्सर झालाय, या भावनेपेक्षाही स्वत:ला आरशात विकेशा बघणं, हा धक्का मोठा असतो. दहा वर्षांपूर्वी, वयाच्या 15व्या वर्षीच हाडांचा कॅन्सर झालेल्या श्वेता चावरे यांना आजही तो दिवस आठवतो.

"किमोथेरपी सुरू झाली आणि हळूहळू केस गळायला लागले. कॅन्सरच्या उपचारात माझे केस गळतील, हे कोणीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी तो धक्का होता. मी डॉक्टरांना एकच प्रश्न विचारत होते, डॉक्टर, माझे केस परत येतील ना?" 25 वर्षांच्या श्वेता चावरे आपला अनुभव सांगतात.

मानसिक धक्का मोठा

2008 मध्ये डोंबिवलीला राहणाऱ्या श्वेताची दहावीची परीक्षा नुकतीच संपली होती. त्याच दरम्यान हाडांचा Osteosarcoma नावाचा कॅन्सर झाला.

प्रतिमा मथळा श्वेता चावरे

"तोपर्यंत कॅन्सरबद्दल फक्त ऐकून होते. पण मला या वयात कॅन्सर होईल, असं वाटलं नव्हतं. तो माझ्यासाठी पहिला धक्का होता, श्वेता सांगतात.

"मला सुरुवातीला सांगितलंच नव्हतं की, किमोथेरपीमुळे केस गळतात. माझी ट्रीटमेंट सुरू झाली आणि एक दिवस माझ्या केसांचा पुंजका उशीवर पडलेला दिसला. मी खूप घाबरले. डॉक्टरांनी जेव्हा मला या साईडइफेक्ट्सबद्दल सांगितलं, तेव्हा मी त्यांना तो प्रश्न विचारला होता," श्वेता यांना आजही ते दिवस आठवणं कठीण जातं.

"माझी शाळा नुकतीच संपली होती. मी कॉलेजला जाणार होते. शाळेत केसांबद्दलचे नियम कडक होते. दोन वेण्याच हव्यात, केस बांधलेले हवेत, मोकळे केस चालणार नाहीत, असे अनेक नियम तोपर्यंत होते. कॉलेजमध्ये जाताना मी या सगळ्या बंधनांमधून मुक्त होणार होते. नेमकं त्याच वेळी हे सगळं घडत होतं," श्वेता त्या आठवणींनी दु:खी होतात.

प्रतिमा मथळा कॅन्सरच्या उपचारादरम्यान श्वेता चावरे.

"त्या दिवसांमध्ये मी घरातच बसून असायचे. कॅन्सरमुळे कुठेच बाहेर पडता यायचं नाही. केस गेल्यावर तर मला कोणाला तोंड दाखवायलाही कसंतरीच व्हायचं. कॅन्सर झालाय यापेक्षाही केस गेलेत, हे पचवणं मला मानसिकदृष्ट्या खूप जड जात होतं. पण माझ्या घरच्यांनी आणि मित्रमैत्रिणींनी मला खूप छान पाठिंबा दिला," त्या सांगतात.

प्रतिमा मथळा केस गळल्यामुळे श्वेता नेहमी टोपी घालूनच फिरायच्या

दीड-दोन वर्षांच्या ट्रीटमेंटनंतर श्वेता कॅन्सरमधून बाहेर आल्या. त्यानंतर त्यांनी 12वीचा अभ्यास करून बाहेरूनच परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी ठाण्यातून अॅनिमेशनचं प्रशिक्षण घेतलं. आज त्या अॅनिमेटर म्हणून काम करत आहेत.

केस पूर्ण नाही गेले, पण...

श्वेता यांच्याप्रमाणेच मुग्धा देशमुख यांचीही कहाणी आहे. त्यांना Spindle Cell Sarcoma हा कॅन्सर आहे, हे कळलं तेव्हा त्या 25-26 वर्षांच्या होत्या. मुग्धा यांना किमोथेरपीला सामोरं जावं लागलं नाही, पण त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.

"शस्त्रक्रियेनंतर देण्यात येणारी औषधं एवढी जास्त क्षमतेची असतात की, त्यामुळे तुम्हाला अगदी गळपटून जायला होतं. त्याचे परिणाम किमोथेरपीसारखे नसले, तरी भयानक असतातच. माझे पूर्ण केस गळले नाहीत, तरी सकाळी उठताना केसांचे पुंजके उशीवर दिसायला लागले. मग आत्ता सोनाली बेंद्रेने कापलेत, तसेच मी माझे केस छोटे करून घेतले," मुग्धा सांगतात.

प्रतिमा मथळा शस्त्रक्रियेदरम्यानच्या या जखमेमुळे मुग्धा यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता.

"या कॅन्सरच्या पूर्ण उपचारादरम्यान मी जवळपास तीन महिने घराबाहेर पडले नव्हते. पहिल्यांदा बाहेर पडले, तर माझंच शहर मला अनोळखी वाटलं होतं. माझ्या आत्मविश्वासाच्या चिंधड्या झाल्या होत्या. त्यात केस गळले होते, वजन कमी झालं होतं, मी निस्तेज झाले होते यामुळेही आत्मविश्वास तळाला गेला होता," मुग्धा यांच्या बोलण्यातून अजूनही त्या दिवसांमधली वेदना जाणवते.

मुग्धा यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, त्यांना हाताची हालचाल जेमतेम 25 ते 30 टक्केच करता येईल. पण गमतीची गोष्ट म्हणजे त्याच दरम्यान त्यांनी घरी कुत्रा पाळला.

"या कुत्र्याशी खेळताना सगळ्या वेदनांचा विसर पडत होता. काही दिवसांनी डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी हाताची हालचाल करायला सांगितली, तेव्हा माझ्या हाताची हालचाल अगदी व्यवस्थित होत होती. डॉक्टरही थक्क झाले. हे फक्त माझ्या कुत्र्यामुळे शक्य झालं होतं," मुग्धा सांगतात.

केसच गेलेत ना, येतील परत!

रंजना विघ्ने यांचा अनुभव मात्र पूर्णपणे वेगळा आहे. 15 वर्षांपूर्वी वयाच्या 42व्या वर्षी त्यांना कॅन्सर झाल्याचं कळलं, तेव्हा त्या खूप सकारात्मकतेने या रोगाला सामोऱ्या गेल्या.

"मला स्तनांचा कॅन्सर झाला होता. ती गाठ मोठी होती. त्यामुळे शस्त्रक्रियेआधी किमोथेरपीची तीन सायकल्स झाली. पहिल्या किमोनंतर केस जाणार, हे मला माहीत होतं. म्हणूनच मी किमोच्या आधीच केस कापले. नंतर तर तुळतुळीत गोटा करून घेतला. मी प्राणायाम आणि योगसाधना करत होते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या कणखर कसं राहायचं, हे मी शिकले होते," रंजना यांच्या बोलण्यातून आजही आत्मविश्वास झळकतो.

प्रतिमा मथळा रंजना विघ्ने

"कोणत्याही स्त्रीसाठी तिचे केस महत्त्वाचे असतात, तसे ते माझ्यासाठीही होते. पण केस जाणार, याची मानसिक तयारी मी केली होती. आत्ता केस गेलेत, पण मी बरी झाल्यावर ते परत येतीलच, याची मला खात्री होती. त्या वेळी मी एवढ्या धैर्याने कॅन्सरला कशी सामोरी गेले, याचं मला आता खरंच नवल वाटतं," रंजना म्हणतात.

रंजना विघ्ने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काम करत होत्या. त्या वेळी दोन किमोथेरपीच्या मध्ये त्या ऑफिसलाही जायच्या. बाहेर जाताना त्या वेगवेगळ्या रंगाचे स्कार्फ घालायच्या.

"या स्कार्फवरून गंमत झाली होती. ऑफिसमध्ये एका-दोघांनी गमतीतच 'काय, धर्म बदललास की काय', असं विचारलं होतं. मीसुद्धा हसून 'हो' असंच उत्तर दिलं. त्यांना नंतर माझ्या कॅन्सरबद्दल कळलं, तर ते म्हणाले होते की, माझ्याकडे बघून मला कॅन्सर झाला असेल, असं वाटत नाही. शेवटी एखादी गोष्ट तुम्ही कशी घेता, त्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघता, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात," रंजना सांगतात.

प्रतिमा मथळा कॅन्सरमधून सावरल्यानंतर रंजना यांनी अनेक साहसी खेळ केले.

कॅन्सर बरा झाल्यानंतर रंजना यांनी बँकेच्या परीक्षा दिल्या, त्या जगभरात फिरल्या, गेल्याच वर्षी अमेरिकेत जाऊन त्यांनी स्काय डायव्हिंगही केलं. आता त्या इतर कॅन्सर पेशंटमध्ये कॅन्सरबद्दल जागृती निर्माण करण्याचं काम करतात.

"कॅन्सरच्या उपचारादरम्यान पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकांनाही आधाराची गरज असते. सुदैवाने माझ्या घरून मला खूप छान आधार मिळाला होता. कॅन्सरबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मी आता करते," त्या आत्मविश्वासाने सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)