व्हीडिओ : 'बर्बादियों का जश्न' साजरा करणारी माणसं, जी एकमेकांनाच प्रेरणा देतात

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ: 'मी तंत्रज्ञानात गुंतवणूक केली पण चांगल्या लोकात गुंतवणूक करायला विसरले'

जगातली सगळ्यांत अवघड गोष्ट म्हणजे आपला पराभव मान्य करणं.

पण आता एका संस्थेने एक जागतिक चळवळ सुरू केली आहे. उद्देश हाच की कधीतरी पराभूत झालेल्या लोकांना आपल्या चुकांमधून शिकण्याची संधी द्यावी आणि त्यांना आयुष्यात नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणा मिळावी.

2012 मध्ये मेक्सिकोतल्या एका समूहाने 'Failures' Organisation (पराभूतांची संस्था)' सुरू केली. लोकांनी एकत्र येऊन आपण सुरू केलेले उद्योग-धंदे का तोट्यात जातात, याची चर्चा करणं हा या संस्थेचा हेतू होता.

त्यानंतर दोनच वर्षांत त्यांनी Failure Night / Fun Night या नावाने एक कार्यक्रम सुरू केला.

यामुळे उद्योजकांना आपल्या अपयशाचं दुःख आणि लाज बाजूला सारून त्याविषयी बोलण्याची प्रेरणा मिळाली. आणि त्यांच्या अशा मोकळं बोलण्याने इतरांनाही प्रेरणा मिळाली.

लवकरच ही एक जागतिक चळवळ बनली. आता अशा प्रकारचे कार्यक्रम भारतासकट 79 देशांत होतात.

प्रतिमा मथळा अपयशाने खचून न जाणाऱ्या लोकांना पाहून इतरांना प्रेरणा मिळते, अनिकेत सांगतात.

सुरतचे अनिकेत गुप्ता त्यांच्या काही सहकाऱ्यांसह अशा प्रकारचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करतात. या कार्यक्रमाची कल्पना, त्याचं ब्रॅण्डिंग वापरता यावं आणि त्याच्या आयोजनासाठी मेक्सिकोमधल्या संस्थेला गुप्ता काही फीपण देतात.

असे कार्यक्रम ते सहसा ओपन एअर थिएटरमध्ये भरवतात. तिथे अशा उद्योजकांना बोलवतात ज्यांना आपल्या अपयशाचे अनुभव इतरांना सांगावेसे वाटतील. या कार्यक्रमासाठी आयोजक 300-400 रुपयांचं तिकिटही ठेवू शकतात.

"लोक खरंच येतात आणि त्यांच्या अपयशाच्या कहाण्या सांगतात. एवढं सगळं असूनही खचून न जाणाऱ्या लोकांना पाहून इतर लोकांना प्रेरणा मिळते," असं अनिकेत यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

प्रतिमा मथळा मी चांगल्या माणसांवर खर्च केला नाही म्हणून मला अपयशाला सामोरं जावं लागलं.

प्रत्येक वक्त्याला बोलण्यासाठी आणि पावरपॉईंट प्रेझेंटेशनसाठी जवळपास 10 मिनिटं दिली जातात.

या वक्त्यांपैकीच एक आहे 28 वर्षांच्या मीरा. त्यांनी काही काळापूर्वी एक ऑनलाईन फॅशन स्टोअर सुरू केलं होतं. पण काही काळातच त्यांना हे स्टोअर बंद करावं लागलं, कारण त्यांनी टेक्नोलॉजीत खूप पैसा खर्च केला होता आणि उधारीवर ऑर्डर्स घेतल्या होत्या.

"अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे मला विचार करायला संधी मिळाली आणि मला माझ्या बिझनेस स्ट्रॅटेजी पडताळून पाहायला मिळाल्या," मीरा सांगतात.

"आता मला कळतंय की मी टेक्नोलॉजीवर खूप पैसा खर्च केला, पण चांगल्या माणसांवर खर्च केला नाही. त्यांना मला धरून ठेवता आलं नाही, म्हणून माझं नुकसान झालं. इतरांना या अनुभवातून नक्कीच काही शिकायला मिळेल."

बरबादीयों का जश्न

आपल्या गोष्टी कशाप्रकारे सांगाव्यात, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य वक्त्यांना आहे.

यतीन सांगोई त्यांचे अनुभव गाऊन सांगतात.

संगीत शिक्षक असलेल्या यतीन यांनी एक संगीतशाळा सुरू केली होती. पण त्यांच्या पार्टनरने त्यांना फसवलं आणि त्यांना त्यांचीच शाळा सोडावी लागली. पण संगीत त्यांना अजूनही प्रेरणा देतं.

'बर्बादियों का जश्न मनाता चला गया, हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया'हे देव आनंदचं प्रसिद्ध गाणं गाऊन ते एका कार्यक्रमात व्यक्त होतात, आणि इतर सगळे त्यांना प्रोत्साहन देतात.

"माझ्या पार्टनरमुळे मी सगळं काही गमावलं. ते वर्ष माझ्या आयुष्यातलं सगळ्यांत निराशाजनक वर्ष होतं. पण त्या पडत्या काळात मला या गाण्याने सावरलं," यतीन सांगतात.

प्रतिमा मथळा माझ्या पार्टनरमुळे मी सगळं काही गमावलं. ते वर्ष माझ्या आयुष्यातलं सगळ्यांत निराशाजनक वर्ष होतं, असं यतीन सांगोई सांगतात.

या लोकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे अशी जागा आहे जिथे ते इतरांच्या चुकांमधून शिकू शकतात. आपलं अपयश कसं पचवायचं, हे सुध्दा ते इथे शिकू शकतात.

"एवढ्या मोठ्या गर्दीसमोर कुणीतरी आपलं अपयश मान्य करतंय ही गोष्टच खूप विलक्षण आहे. आयुष्यात फक्त आपणच पराभूत झालेलो नाही, आपल्यासारखेच अनेक लोक आहेत, हे कळल्यावर अनेकांना धीर येतो," असं यतीन सांगतात.

कदाचित समोर बोलणाऱ्या वक्त्यांपेक्षा प्रेक्षकांमध्ये असलेल्यापैकी कुणाची अवस्था आणखीन वाईट असू शकते.

"या कार्यक्रमामुळे मला स्वतःच्या मर्यादा समजून घ्यायला तसंच त्या मान्य करायला मदत होते," असं दीप, जे खास या कार्यक्रमासाठी सुरतला आले होते, त्यांनी बीबीसीला सांगितलं.

प्रतिमा मथळा आपल्या अपयशाविषयी मोकळेपणानं बोलणं हा खूपच मस्त अनुभव आहे. असं केलं की मनात साठलेल्या नकारात्मक भावनांचा निचरा होतो

मागच्या वर्षी ऑक्सफॉर्ड इकोनॉमिक्स आणि IBM यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात असं निदर्शनास आलं होतं की स्टार्ट-अप्स उद्योगांमध्ये भारताचा जगात तिसरा नंबर लागतो. पण त्यापैकी 90 टक्के स्टार्ट-अप्स अपयशी ठरतात.

कुशल मनुष्यबळाचा अभाव, नवीन टेक्नोलॉजी आणि संशोधनाची कमतरता तसंच पैशांचं पाठबळ नसणं, या गोष्टी अपयशाला कारणभूत ठरतात. अशा वेळेस Failure Night सारखे कार्यक्रम मदत करू शकतात.

"आपल्या अपयशाविषयी मोकळेपणानं बोलणं हा खूपच मस्त अनुभव आहे. असं केलं की मनात साठलेल्या नकारात्मक भावनांचा निचरा होतो," असं दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमधल्या मानसशास्त्रतज्ज्ञ रोमा कुमार सांगतात.

"ज्या माणसांशी तुम्ही बोलता त्यांना तुम्ही सहसा ओळखत नसता. त्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते बोलून दाखवलं की काहीतरी कमवल्यासारखं वाटतं. तुम्ही अपयशाला हरवून यशाकडे पहिलं पाऊल टाकता, अशी भावना तयार होते. याचा नक्कीच फायदा होतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)