#5मोठ्याबातम्या : 'काँग्रेसला धर्माच्या आधारावर निवडणुका लढवायच्यात'

निर्मला सीतारामन

फोटो स्रोत, Getty Images

पाहूयात विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर आज प्रसिद्ध झालेल्या पाच महत्वाच्या बातम्या.

1. काँग्रेसला धर्माच्या आधारावर निवडणुका लढवायच्यात- निर्मला सितारामन

निवडणुकांना एक वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला असताना 'काँग्रेस भयंकर खेळ खेळत असून जातीयवादाचं राजकारण करत आहे,' असा आरोप भाजपनं केला आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सरंक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसला धर्माच्या आधारावर निवडणुका लढवायच्या असल्याचा आरोप केला.

2019च्या निवडणुकांपर्यंत अशांतता निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी काँग्रेस जबाबदार राहील. राहुल गांधी यांनी बुधवारी मुस्लीम धर्मातील काही व्यक्तींची घेतलेली भेट कशासाठी होती याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं, असंही सीतारामन म्हणाल्या.

इंकलाबच्या बातमीचा आधार घेत राहुल गांधी यांनी काँग्रेस हा मुस्लीम पक्ष असल्याचं म्हटलं, असाही आरोप सीतारामन यांनी केला.

तुम्ही एकाचवेळी जानवंधारी आणि मुस्लीम राहू शकत नाही. हा लोकांच्या विश्वासाशी खेळ असल्याचं त्या म्हणाल्या.

2. कल्याण-डोंबिवली परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

शुक्रवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसराला 2.8 रिश्टर स्केल तिव्रतेचे भूकंपाचे धक्के बसल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे.

या वृत्तानुसार, कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळ्यासह कल्याणजवळील ग्रामीण भागात हे हादरे बसल्याचं सांगण्यात आलं.

रात्री 9 वाजून 31 मिनिटांच्या सुमारास कल्याण,. डोंबिवली परिसरात अचानक कंपनं जाणवू लागली.

अचानक बसलेल्या या हादऱ्यांनी कल्याणच्या अनेक भागात नागरिक घाबरून घराबाहेर जमा झाले. हे भूकंपाचेच धक्के असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं.

3. सोशल मीडिया हब म्हणजे पाळत ठेवण्यासारखं- सुप्रीम कोर्ट

ऑनलाइन डेटावर देखरेख ठेवण्यासाठी सोशल मीडिया हबची स्थापना करण्याचा निर्णय म्हणजे सतत पाळत ठेवणारी सरकारी व्यवस्थाच असेल अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

सकाळच्या वृत्तानुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सोशल मीडिया हब स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. तृणमूल काँग्रेसचे आमदार महुआ मोइत्रा यांनी याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश दिपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठानं केंद्र सरकारला नोटीस जारी केली.

व्हॉट्सअॅपमध्ये अशाप्रकारची घुसखोरी करणं म्हणजे एक 'सर्व्हिलिअन्स स्टेट' (पाळत ठेवणारे सरकार) तयार करण्यासारखं आहे, अशा शब्दांत केंद्र सरकारला सुनावलं आहे.

4. थर्माकोलवर बंदी कायम- उच्च न्यायालयाचा निर्णय

गणेशोत्सवात थर्माकोलचं मखर आणि सजावटीच्या वस्तूंवरील बंदी उच्च न्यायालयानं कायम ठेवली असल्याचं वृत्त लोकमतनं दिलं आहे.

थर्माकोल फॅब्रिकेटर अ‍ॅण्ड डेकोरेटर असोसिएशननं यासंदर्भात केलेली याचिका न्यायालयानं फेटाळली आहे.

फोटो स्रोत, PRASHANT NANAWARE

फोटो कॅप्शन,

प्लास्टिकला पर्याय असलेल्या वस्तू

थर्माकोलची घाऊक खरेदी खूप आधी करावी लागते. त्यानुसार ही खरेदी झाली असून त्यापासून वस्तूही बनवण्यात आल्या आहेत. बंदीमुळं विक्रेत्यांचं आर्थिक नुकसान होईल, असं याचिकेत म्हटलं होतं.

राज्य सरकारनं या याचिकेला विरोध केला होता. थर्माकोलची विल्हेवाट लावण्यासाठी 23 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. असं सरकारनं न्यायालयात सांगितलं.

असोसिएशननं विक्री केलेलं थर्माकोल पुन्हा जमा करून, गणेशोत्सवानंतर त्याची विल्हेवाट लावण्याचं आश्वासन न्यायालयाला दिलं. पण, न्यायालयानं ते अमान्य केलं.

5. ट्विटरचे 'स्वच्छता अभियान'

ट्विटरनं सक्रिय नसलेली अकाऊंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुमारे तीन लाख, तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे 17 हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत.

एबीपी माझाच्या बातमीनुसार, सक्रिय नसलेली अकाऊंट्स बंद करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेण्यात आला. त्यामुळे जगभरातल्या सेलिब्रिटींना त्याचा फटका बसला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे एक लाख, तर बराक ओबामा यांचे चार लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)