#5मोठ्याबातम्या: काँग्रेस फक्त मुस्लीम पुरुषांचाच पक्ष आहे का?- नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी Image copyright AFP

पाहूयात आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्वाच्या बातम्या.

1. काँग्रेस फक्त मुस्लीम पुरुषांचाच पक्ष आहे का?- नरेंद्र मोदी

'काँग्रेस हा फक्त मुस्लीम पुरुषांचाच पक्ष आहे की महिलांचाही पक्ष आहे,' असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील आजमगडमध्ये पूर्वांचल एक्सप्रेसवेच्या भूमीपूजन कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते.

काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की काँग्रेस मुस्लिमांचा पक्ष आहे, असं मी वृत्तपत्रात वाचलं. पण काँग्रेस फक्त मुस्लीम पुरुषांचा पक्ष आहे की महिलांचाही आहे, असा प्रश्न उपस्थित करत नरेंद्र मोदी यांनी तीन तलाकवरून काँग्रेसवर निशाना साधला.

लोकसभेत काँग्रेसने तीन तलाक कायदा रोखून धरल्याचा आरोपही मोदी यांनी केला. काँग्रेसनं पलटवार करताना ज्या वृत्तपत्रातून मोदी यांनी बातमी वाचली ते वृत्तपत्र कोणाचे आहे? असा प्रश्न केला.

2. खड्ड्यांनी घेतले 3,597 बळी

2017 या वर्षांत देशभरात 3,597 लोकांना खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

Image copyright twitter

दिवसाला सरासरी दहा लोकांचा जीव खड्ड्यांमुळे गेला. 2016च्या तुलनेत 2017मध्ये यात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सर्वाधिक मृत्यू हे उत्तरप्रदेशात नोंदले गेले. त्या खालोखाल महाराष्ट्रात वर्षभरात 726 लोकांना खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला. आधीच्या तुलनेत हा आकडा दुप्पटीने वाढला आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी बघितल्यास हे प्रमाण इतर घटनांपेक्षा जास्त असल्याचं लक्षात येतं.

देशात नक्षली आणि कट्टरवाद्यांच्या हल्ल्यात 803 लोकांचा मृत्यू झाला. राज्य सरकारांनी केंद्राला दिलेल्या माहितीनंतर हे चित्र स्पष्ट झालं आहे.

3. राम मंदिर आमच्या अजेंड्यावर नाही - भाजप

राम मंदिराचा विषय आमच्या अजेंड्यावर नाही, असा खुलासा भारतीय जनता पक्षाला करावा लागला आहे.

Image copyright Getty Images

लोकमतच्या वृत्तानुसार, पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांआधी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, असं वक्तव्य भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी केल्यानं खळबळ माजताच, शाह यांनी तसं म्हटलं नव्हते असंही भाजपनं स्पष्ट केलं आहे.

हैदराबादमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत शाह यांनी तसं विधान केल्याची माहिती भाजपा नेते पी. शेखर यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. शाह यांच्या वक्तव्यामुळे वाद सुरू होताच, भाजपनं बचावात्मक पवित्रा घेतला.

दरम्यान, नोटबंदी एका क्षणात केली, मग राम मंदिर का नाही करीत, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. भाजप हा फसव्या घोषणा करणारा पक्ष आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

4. धोनी ठरला दसहजारी मनसबदार

महेंद्रसिंह धोनी याने वनडे क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा खेळाडू ठरला असल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे.

Image copyright Getty Images

दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम करणारा एकूण बारावा तर चौथा भारतीय खेळाडू आहे. याआधी गांगुली, तेंडुलकर आणि द्रविड यांनी 10,000 धावा केल्या होत्या. श्रीलंकेचा कुमार संगकारा याच्यानंतर 10,000 धावा पूर्ण करणारा धोनी हा केवळ दुसरा विकेटकीपर आहे.

दरम्यान, भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वन-डे क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतावर इंग्लंडनं 86 धावांनी मात केली. याच मॅचमध्ये धोनीनं 300 कॅचेसचाही विक्रम नावावर केला.

5. दूध दरावरून आंदोलन होणारच- राजू शेट्टी

दूधाच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही, खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे.

न्यूज18 लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 16 तारखेपासून मुंबईला दूधपुरवठा रोखण्यासाठीच आंदोलन घोषित केलं आहे. शेतकऱ्यांना लिटरमागे 5 रुपयांची दरवाढ देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आंदोलनाच्या दोन दिवस आधीच पुण्यातल्या प्राईड हॉटेलमध्ये खाजगी आणि सहकारी दूध संघाच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली होती. त्यात शेतकऱ्यांना लिटर मागे तीन रुपये वाढवून देण्याचा निर्णय झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)