जेव्हा हिमा दासने पळता पळता कारलाही मागे टाकलं...

  • नितीन श्रीवास्तव
  • बीबीसी प्रतिनिधी

जकार्तामध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताची धावपटू हिमा दासने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावलं आहे.

हा लेख प्रथम 17 जुलैला प्रसिद्ध करण्यात आला होता, जेव्हा हिमाने IAAFच्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स चँपियनशिपमध्ये 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं. ते भारताचं अॅथलेटिक्समधलं पहिलंच सुवर्ण पदक होतं.

ही गोष्ट आहे आसामच्या नौगाव जिल्ह्यातील कांदुलीमारी या गावातील. 8 वर्षांची एक मुलगी एका कारमागे धावत होती. तिचा धावण्याचा वेग इतका जास्त होता की, तिनं या कारला मागे टाकलं.

ही मुलगी कोण आहे माहिती आहे का? भारताची गोल्डन गर्ल हिमा दास.

हिमानं नुकतंच IAAF च्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स चँपियनशिपमध्ये 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

तिच्या या यशामुळे आसाममधील तिचं हे लहानसं गाव सुखावलं आहे.

या गावातील मातीवर आपली लहान पावल उमटवत धावणाऱ्या या मुलीनं आज जगावर तिची पावलं उमटवली आहेत.

हिमाबद्दलच्या बऱ्याच आठवणी हे गावकरी सांगतात. गावकरी सांगतात हिमाच हे यश म्हणजे चमत्कार नसून तिनं लहानपणापासून केलेल्या कष्टांचं फळ आहे.

कांदुलीमारी या गावात बीबीसीने तिच्या आईवडिलांशी आणि गावकऱ्यांशी तिच्याबद्दल जाणून घेतलं.

हिमाचे वडील रणजीत दास यांना बाळाचे पाय पाळण्यातच दिसले होते. ते सांगतात, "लहानपणापासून हिमामध्ये खेळांची क्षमता दिसत होती. खेळात आणि पळण्यात ती विशेष आवड दाखवत होती. तिच्यात चांगलं खेळाडू होण्याची क्षमता आहे, असं तिच्या लहानपणीच लक्षात आलं होतं."

मुलीच्या क्षमता लक्षात आल्यानंतर वडिलांनी मुलीच्या जीवनात बापाच्या जबाबदारीसोबतच प्रशिक्षकाची जबाबदारीही घेतली. तेच हिमाचे पहिले प्रशिक्षक बनले आणि हिमातील क्रीडा गुणांना आकार दिला.

कारलाही मागं टाकणारी हिमा

भारताला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या हिमाची क्षमता तिच्या वडिलांनाचा नाही तर सगळ्या गावाने पाहिली आहे. तिच्या लहानपणीच्या बऱ्याच आठवणी गावकरी सांगतात. एक गावकरी म्हणाले, "हिमा 8 किंवा 9 वर्षांची असेल. ती एक दिवस कारच्या मागे धावत होती. बघता बघता तिनं कारला मागे टाकलं. तिचा धावण्याचा वेग पाहून आम्ही चकितच झालो."

फोटो कॅप्शन,

हिमाचे वडील रणजीत दास

हिमाचे लहानपणीचे मित्र सांगतात तिला क्रिकेट आणि फुटबॉल खेळणं फार आवडत असे. हिमाचे तिन्ही भाऊ क्रिकेट खेळायचे, तेव्हा हिमा बॉलिंग करायची. हिमा फार साहसी असल्याचे लोक सांगतात.

कॉमनवेल्थ स्पर्धेत तिला पदक न मिळाल्याने ती नाराज झाली नाही. हिमा लहान असताना फुटबॉलही खेळायची. दोन दिवसात फुटबॉल शिकल्यानंतर तिनं लगेच गोल केले होते. खेळणं आणि खेळ शिकणं यांची क्षमता तिच्यामध्ये लहानपणापासूनच असल्याचं लोक सांगतात.

हिमाच्या या यशामुळे तिचे आईवडीलच नाही तर संपूर्ण गाव खूष आहे. हिमाच्या आई सांगतात गावात आनंदाचं वातावरण असून हिमाने असंच खेळत राहावं अशी लोकांची इच्छा आहे.

घरी सणासारखं वातावरण

हिमाच्या घरी सणासारखं वातावरण आहे. तिच्या आईवडिलांनी भेटून आनंद व्यक्त करण्यासाठी लोक सतत येत आहे. हिमाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीही आले होते. ते म्हणाले की हिमाचं लक्ष विचलित होता कामा नये जेणे करून ऑलिंपिक आणि इतर स्पर्धांत तिची कामगिरी चांगली होऊ शकेल.

फोटो कॅप्शन,

हिमाचे आई वडील तिच्या गावी परत येण्याची वाट पाहत आहेत.

हिमा अजून घरी परत आलेली नाही. गावकरी ती परत येण्याची वाट पाहत आहेत. मुलीनं गावचं नाव उज्ज्वल केलं, असं लोक सांगत आहेत.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)