#5मोठ्याबातम्या - दूध आंदोलनातून मुंबईची दूधकोंडी करण्याचा प्रयत्न

शेतकरी आंदोलन Image copyright Pravin Thakare
प्रतिमा मथळा संग्रहित छायाचित्र

आजच्या विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. दूध दर आंदोलन : मुंबईची दूध कोंडीची शक्यता

दुधाचे दर वाढवून देण्याच्या मागणाठी स्वाभिमानी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईची दूधकोंडी होण्याची शक्यता असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. मुंबईचा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी प्रति लीटर पाच रुपये वाढवून देण्याची प्रमुख मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे.

संघटनेतर्फे रविवारी मध्यरात्रीपासून आंदोलन पुकारण्यात आलं. रविवारी सांगली जिल्ह्यात पुणे-बंगळुरू महामार्गावर वारणा दूध संघाच्या टँकरमधून रस्त्यावर दूध सोडण्यात आलं.

तर दुसरीकडे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मुंबईला दूध पुरवठा कमी पडू देणार नसल्याचं म्हटलं आहे. दूध उत्पादकांना पोलीस संरक्षण देणार असल्याचंही ते म्हणाले.

Image copyright Pravin Thakare
प्रतिमा मथळा संग्रहित छायाचित्र

2. आम्ही कागदी वाघ नाही : देवेंद्र फडणवीस

वर्तमानपत्रांच्या भरवशावर चालणारा आपला पक्ष नाही. आम्ही कागदी वाघ नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे.

Image copyright PUNIT PARANJPE/GETTY IMAGES

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपच्या पूर्व विदर्भातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "आपला पक्ष मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट असा आहे. वर्तमानपत्रांच्या भरवशावर चालणारा आपला पक्ष नाही.

"आम्ही कागदी वाघ नाही. काही कागदी वाघ आहेत. काही नेते फक्त वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून आणून स्वतःला मोठे नेते समजतात," असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले.

3. नवरदेवाच्या संरक्षणासाठी तब्बल 350 पोलीस

उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील निझामपूर गावात एका दलित नवरदेवाच्या वरातीसाठी तब्बल 350 पोलीसांसह राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.

Image copyright Getty Images

टाइम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. हाथ्रस जिल्ह्यातील 27 वर्षीय संजय जाटव हा दलित तरुण एका सजवलेल्या बग्गीत बसलेला होता. त्याच्या आजूबाजूला पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावलेला होता.

गावातील ठाकूर समुदायाने गावातून वरात काढण्यास विरोध केला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून हे गाव माध्यमांमध्ये चर्चेत आहे.

संजयने 18 वर्षीय शीतल सिंगबरोबर लग्न केलं. वर्षानुवर्ष चालत आलेली वाईट परंपरा मोडून काढण्यासाठीच माझा प्रयत्न होता, असं सांगत आम्ही ठाकूरांच्या विरोधात नसल्याचं संजय म्हणाला.

4. पुणे-मुंबई रस्त्यावर अपघातात 7 जणांचा मृत्यू

जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ रविवारी झालेल्या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले असल्याचं वृत्त झी24 तासनं दिलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक फोटो

लोणावळा परिसरातील दुपारी तीनच्या सुमारास कार्ला फाट्याजवळ हा अपघात झाला. मुंबईच्या दिशेने जाणारी स्विफ्ट तर पुण्याच्या दिशेने येणारी सॅन्ट्रो कार समोरासमोर धडकल्या.

स्विफ्ट कार सॅन्ट्रो कारवर आदळल्यानं स्वीफ्टमधील 5 प्रवासी आणि सॅन्ट्रोमधील दोघं असे एकूण 7 जण जागीच ठार झाले आहेत.

ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

5. एकाच घरात आढळले 6 मृतदेह

झारखंडमधील हजारीबाग शहरातील एका व्यापारी कुटुंबातील सहा लोकांचे मृतदेह एका घरामध्ये आढळून आले. दिल्लीतलं बुराडी सामूहिक आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच हे वृत्त आल्यानं खळबळ उडाली आहे.

बीबीसी हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी या घरातून 6 सुसाइड नोटपण ताब्यात घेतल्या आहेत. सगळे मृतदेह वेगवेगळ्या स्थितीत आढळून आल्यानं पोस्टमार्टम अहवालानंतरच यावर खुलासा होऊ शकेल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांना आढळलेल्या सुसाइड नोटमध्ये ते स्वेच्छेनं आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. पोलिसांतर्फे हस्ताक्षर जुळवण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)