गुजरातसाठी रात्री 8 वाजताची वेळ आता वेगळी असेल

बीबीसी गुजराती

रात्री 8 वाजताची वेळ आता गुजरातसाठी अनोखी असेल.

बीबीसी न्यूज गुजरातीचं टीव्ही बुलेटिन सोमवारपासून (16 जुलै) सुरू होत आहे. बीबीसी न्यूज गुजरातने गुजरातच्या GSTV या टीव्ही चॅनेलबरोबर रोज अर्ध्या तासाच्या बातमीपत्रासाठी टायअप केला आहे.

गुजराती लोकांना त्यांची संध्याकाळ अतिशय प्रिय आहे. अर्थात बाहेरच्या लोकांना हे ऐकायला कदाचित विचित्रही वाटू शकतं वाटेल कारण जगात अनेकांसाठी संध्याकाळ म्हणजे त्यांची आवडत्या वाईनचा ग्लास घेऊन बसण्याचं एक निमित्त असतं. पण या 'ड्राय स्टेट'मध्ये संध्याकाळचं एक खास महत्त्वा आहे.

गुजराती लोकांसाठी संध्याकाळ म्हणजे आपल्या प्रियजनांबरोबर फरसाण आणि कडक चहा घेऊन गप्पा मारण्याचं निमित्त असतं. कोलकात्यासारखी कॉफीचा अड्डा जमवून 'मन्ना डे'ची परंपरा गुजरातमध्ये नाही.

पण 'चाय पे चर्चा' कशी करायची हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. आता नवीन विषय आणि नवीन रंगाढंगांसह ही चर्चा आणखी कडक होणार आहे. या चर्चेत आणखी नवीन शब्द असतील, हृद्य संवाद असतील, उत्तम बातम्या असतील आणि अर्थातच नवा दृष्टिकोन असेल.

गुजराती लोकांसाठी हे बुलेटिन तयार करण्यात आलं आहे. आजपासून हे बातमीपत्र सुरू होईल. तीस मिनिटांचं हे बातमीपत्र बीबीसी समाचार नावानं ओळखलं जाईल. GSTV या चॅनेलवर दररोज रात्री 8 वाजता हे बुलेटिन सादर केलं जाणार आहे.

गुजरात : विविधतेची आणि विरोधाभासाची भूमी

एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला वाळवंट अशी गुजरातची विविधांगी भूमी आहे.

हिंदू-इस्लामिक-जैन वास्तुरचनेमुळे अहमदाबाद शहराला हेरिटेज शहराचा दर्जा मिळाला आहे. तसंच अनेक समुदाय एकत्र राहत असल्यामुळे शहर कायम गजबजलेलं असतं.

एका बाजूला महिलांची यशस्वी चळवळ इथंच उभी राहिली आहे तर दुसऱ्या बाजूला अत्यंत बिघडलेलं लिंग गुणोत्तरही याच राज्यात आढळतं. इथल्या काही खेड्यांत तर हे लिंग गुणोत्तर 1000 पुरुषांमागे 400 महिला इतकं कमी आहे.

पॉप संगीताचा राजा फ्रेडी मर्क्युरी उर्फ फारुख बुलसारा यांनी समलैंगिकांसाठी एक गाणं तयार केलं ते याच भूमीत. पण याच राज्यात मानवेंद्र सिंग गोहील या राजाला आपली लैंगिक ओळख उघड केल्यामुळे सत्ता गमवावी लागली.

प्रतिमा मथळा लक्ष्मी विलास पॅलेस वडोदरा

बीबीसी गुजराती वेबसाईट आणि बातमीपत्र हे सर्व विरोधाभास समजून घेऊन जबाबदार पत्रकारितेच्या माध्यमातून या विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करेल.

दुभंगलेला समाज, लिंगभेद, वैचारिक फतवे, राजकीय अस्थिरता, लादलेली नैतिकता आणि तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जगातील आणि भारतातील महत्त्वाच्या बातम्या बीबीसी गुजराती आपल्यासमोर आणत आहे.

कवाडं खुली होणार

बीबीसी गुजरातीच्या व्यासपीठामुळे नि:पक्ष, प्रभावी पत्रकारितेचं एक नवीन युग सुरू होणार आहे.

बीबीसी समाचार बीबीसीच्या जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरील उत्तमोत्तम बातम्या आपल्यासमोर घेऊन येईल. बातमीपत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या तर असतीलच, पण त्याबरोबर खेळ, करमणूक, आरोग्य, शिक्षण, स्त्रियांच्या आवडीचे आणि ट्रेंडिग विषयही असतील.

आमचा प्रवास

2 ऑक्टोबर 2017ला आम्ही बीबीसी न्यूज गुजरातीची वेबसाईट तीन अन्य भाषांबरोबर सुरू झाली. तसंच काही टीव्ही कार्यक्रमही सुरू झाले. बीबीसीचे हिंदी, तामिळ, बंगाली, उर्दू आणि इंग्रजी या भाषांत ही सेवा आधीच आहे.

नवीन भाषांत ही सेवा सुरू झाल्यामुळे बीबीसीची सेवा आता 9 भाषांत उपलब्ध झाली आहे.

Image copyright IndiaPictures
प्रतिमा मथळा मोहनदास गांधी विद्यालय

गुजरातींसाठी बीबीसी हे सगळ्यात विश्वासार्ह प्रसारमाध्यम आहे.

मागच्या वर्षीपर्यंत गुजराती लोकांना विश्वासार्ह बातम्या हव्या असल्या तरी बीबीसीच्या बातम्या हिंदी रेडिओ किंवा इंग्लिश टीव्हीच्या माध्यमातून मिळायच्या. पण आता बीबीसीची सेवा गुजरातीत आल्यामुळे ही परंपरा आम्ही पुढे नेणार आहोत.

गुजरातला महात्मा गांधी, झवीरचंद मेघानी, दादाभाई नौरोजी, इंदुलाल याज्ञिक, हाजी मोहम्मद अल्लारखां यांसारख्या उत्तम पत्रकारांची आणि विचारवंतांची परंपरा लाभली आहे. दहा महिन्यांच्या या प्रवासात बीबीसी गुजरातीने तरुणांना केंद्रस्थानी ठेऊन स्वत:चा असा एक प्रेक्षकवर्ग तयार केला आहे.

रात्री आठ वाजता काय होतं?

घड्याळात रात्रीचे आठ वाजले की गुजरातच्या वेगवेगळ्या शहरात वेगळं वातावरण असतं.

राजधानी गांधीनगरमध्ये कामाचा वेग कमी झालेला असतो. हिऱ्यांचं शहर असलेलं सुरत उजळून निघालेलं असतं. आणंदमधील दूध सहकारी संस्थांमधील स्त्रिया कामावरून घरी परतल्या असतात. वडोदरा आणि राजकोटमधील नोकरदार लोक आपापल्या घरी परतलेले असतात आणि गरमागरम जेवणाचा आस्वाद घेत असतात. खवय्यांच नंदनवन असलेल्या अहमदाबादमधील माणेक चौक परिसरात गर्दी व्हायला सुरुवात झालेली असते.

गुजरात हे अतिशय व्यस्त, उत्साहाने भारलेलं, आशादायी राज्य आहे. आज रात्री जेव्हा घड्याळात आठ वाजता लोक बीबीसी समाचार पाहण्यासाठी GSTV सुरू करतील त्यानंतर ते अधिक माहितीगार, उत्साहपूर्ण, प्रेरणेनं ओतप्रोत भरलेले आणि सजग असतील अशी आशा आहे.

तर पाहा बीबीसी समचार आज रात्री 8 वाजता GSTV वर!

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics