मुंबईची टायटॅनिक : 40 फुटांची लाट उसळली आणि 700 लोकांसह 'रामदास' बुडाली

रामदास बोट, जलसमाधी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक चित्र रामदास बोट

टायटॅनिकची गोष्ट माहिती असलेल्या आजच्या पिढीला मुंबईजवळची रामदास बोट दुर्घटना माहिती आहे? आजपासून 71 वर्षांपूर्वी मुंबईच्या भाऊच्या धक्क्याहून निघालेली रामदास बोट बुडाली आणि 690 प्रवाशांना जलसमाधी मिळाली.

टायटॅनिक अपघाताच्या निम्मे प्रवासी या अपघातात मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेच्या स्मृतिदिनानिमित्त या आठवणींचा अभ्यास करणाऱ्या दिग्दर्शकानं मांडलेला आठवणपट.

एस.एस. रामदास बोट आणि तिचा अपघात या घटनेशी माझा परिचय खरंतर माझ्या बाबांमुळे झाला. बाबा मिल कामगार त्यामुळे घरात आर्थिक दुर्बलता होती, घरात रेडिओ होता पण टीव्ही नव्हता. मग रोज रात्री जेवणानंतर बाबांच्या मांडीवर डोकं ठेऊन नियमित त्यांनी एक गोष्ट ऐकवायची आणि मगच मी झोपायचं हा शिरस्ता होता.

बाबांनी सांगितलेल्या असंख्य गोष्टींपैकी एक म्हणजे एस.एस. रामदास या प्रवासी बोटीच्या अपघाताची गोष्ट.

'स-सासूचा' नावाचा पहिला सिनेमा केला आणि मग मी एस.एस. रामदासची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. 2007 ते 2016 पर्यंत जवळ-जवळ दहा वर्ष मी रामदासची माहिती गोळा करण्यात खर्ची घातली. यात शास्त्रज्ञ खाजगीवाले सर यांची खूप मोलाची मदत झाली. अलिबागच्या बारकू शेट मुकादम यांच्या भेटीपासून सुरू झालेला प्रवास दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास गेलेल्या दिवंगत अब्दुल कैस यांच्या मुलाखतीनंतर संपला.

Image copyright Kishor Belekar
प्रतिमा मथळा बारकू शेठ मुकादम

रामदास बोट एका नावाजलेल्या कारखान्यात आकारास आली. स्कॉटलंडच्या ज्या स्वान अँड हंटर कंपनीने 'क्वीन एलिझाबेथ' ही आलिशान बोट बांधली होती. त्याच कारखान्याने 179 फूट लांब आणि 29 फूट रुंद, 1000 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेली अशी देखणी 'रामदास' बोट 1936 मध्ये जन्मास घातली. जन्मानंतर काही वर्षांनी तिची मालकी इंडियन कोऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनीकडे आली.

देशात ज्यावेळी स्वदेशीच्या चळवळी जोर धरू लागल्या होत्या, त्यावेळी काही स्वाभिमानी देशभक्तांनी, देशाभिमानाच्या भावनेतून सहकाराच्या तत्त्वावर इंडियन कोऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनी काढली.

ब्रिटिश कंपनीच्या विरोधात उभं राहून या कंपनीने कोकण गोवा किनारपट्टीवर सुखकर बोट सेवा सुरू केली. याच कंपनीला पुढे लोक आपलेपणाने माझी आगबोट कंपनी असं संबोधायचे. लोकांच्या भावनांचा आदर करून, देवदेवतांची, संतांची नावं बोटीला दिली जायची. जयंती, तुकाराम, रामदास, सेंट अँथनी, सेंट फ्रान्सिस, सेंट झेव्हियर ही त्यातली काही नावं.

जयंती आणि तुकाराम यांना मिळाली होती जलसमाधी

एस.एस. रामदास बोटीच्या अपघाताची माहिती मिळवत असतानाच आणखी दोन भारतीय बोटींच्या अपघाताची माहिती हाती लागली. फार कमी लोकांना या अपघातांविषयी ठाऊक आहे. रामदास बुडण्याआधी म्हणजेच 11 नोव्हेंबर 1927 रोजी सायंकाळी 7.20 वाजता एस.एस. जयंती आणि एस.एस. तुकाराम नावाच्या दोन प्रवासी बोटी एकाच दिवशी, एकाच वेळी, एकाच मार्गात, एका पाठोपाठ बुडाल्या. जयंती बोटीतले खलाशी आणि इतर प्रवासी अशा सर्व 96 लोकांना जलसमाधी मिळाली. तुकाराम बोटीवरील 143 पैकी 96 प्रवाशांना जीवनदान मिळाले.

जयंती आणि तुकाराम बुडाल्यानंतर बरोबर 20 वर्षांनी रामदास बोट बुडाली. रामदास बुडाली त्यावेळी तिच्यात 48 खलाशी, 4 अधिकारी, हॉटेलचे 18 कर्मचारी आणि अधिकृत उतारू 673 होते. 35 फुकटे प्रवासी होते. म्हणजेच एकूण 778 प्रवासी त्यावेळी रामदास बोटीमधून प्रवास करत होते.

Image copyright Kishor Belekar
प्रतिमा मथळा अपघाताच्या बातम्यांनी खळबळ उडाली

रामदास 17 जुलै 1947ला सकाळी 8 वाजता भाऊच्या धक्क्याहून रेवसला जायला निघाली. गटारी अमावस्येच्या निमित्ताने सुट्या होत्या आणि म्हणूनच बरीचशी मंडळी घरच्यांना भेटण्यासाठी निघाली होती. रामदासवर पंढरपूरची वारी करून आलेली वारकरी मंडळी होती. कोळी बांधव होते. काही आपल्या मळ्यातला भाजीपाला विकून, गाडगी मडकी मुंबईत विकून पुन्हा घराकडे निघालेली अशी व्यवसाय करणारी मंडळी होती.

वरच्या डेकवर इंग्रज अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांसहित प्रवास करत होते. मी या अपघाताबद्दल जाणून घेण्यासाठी भेटलो अलिबागच्या बारकू शेट मुकादम यांना. त्यांचं आताचं वय 90 आहे. रामदास बोट बुडाली, तेव्हा ते फक्त 10 वर्षांचे होते. माणगावचे अब्दुल कैस अपघातावेळी 12 वर्षांचे होते. मोहन निकम यांचे वडील इन्स्पेक्टर निकम यांनाही भेटलो. बोटीवर अनेक गरोदर महिलाही होत्या.

Image copyright Kishor Belekar
प्रतिमा मथळा रामदास बोटीच्या दुर्घटनेतून वाचलेले अब्दुल कैस

सगळे प्रवासी चढल्याची खात्री झाली आणि बोटीचा धीरगंभीर भोंगा झाला. व्हार्फ सुपरिडेंटने शिट्टी फुंकली. हमालांच्या टोळीने शिडी काढायला सुरुवात केली. तेवढ्यातही काही प्रवासी चपळतेने बोटीत घुसलेच.

अलिबागच्या बारकू शेट मुकादम यांना भेटलो त्यावेळी ते बोलत होते. त्या धावत बोट पकडलेल्या माणसांना मृत्यूच्या देवतेने बोटीतून हात देऊन बोटीत घेतले असणार बहुधा.

नांगर वर उचलला गेला. बोटीच्या मागच्या बाजूस खूप सारे फेसाळणारे पाणी उधळले. सुकाणूवाल्या खलाशाने सुकाणू फिरवलं आणि बोट समुद्राकडे निघाली. पाऊस पडत होता पण डेकला झाकलेल्या ताडपत्रीमुळे तो विशेष जाणवत नव्हता. आणखी अर्ध्या तासाने सगळे रेवसला पोहोचणार होते. बरेच लोक एकमेकांना ओळखणारे होते. कारण ते नेहमीचे अपडाऊन करायचे.

Image copyright Kishor Belekar

बोट काही प्रमाणात हिंदकळत होती. पण साऱ्यांना या हिंदकळण्याचा अनुभव होता. कारण मुंबईचा किनारा सोडून बोट पूर्णपणे अरबी समुद्रात लागेपर्यंत असे हिंदोळे घेते. बोटीतलं वातावरण बरंचसं खेळीमेळीचं होतं. लोकांच्या गप्पा रंगल्या होत्या. काहींच्या गप्पांमध्ये याआधीच्या बुडालेल्या जयंती आणि तुकाराम बोटींचे विषय होते. ही माहिती अपघातातून वाचलेल्या इन्स्पेक्टर निकम यांच्या बोलण्यातून मिळाली.

रामदास मुंबईच्या बंदरापासून समुद्रात 13 किलोमीटरपर्यंत गेली असेल तोच लाटांचा, पावसाचा आणि वादळाचा जोर वाढला. डेकवर पाणी साचू लागलं. गप्पा मारणाऱ्या लोकांमध्ये एका क्षणाची शांतता जाणवली. बोट एका बाजूला कलंडून पाणी आत शिरलं आणि बोटीतले सगळे ओरडू लागले. बोटीवर असणाऱ्या तुटपुंज्या लाईफ सेव्हिंग जॅकेटसाठी सगळे धडपडू लागले. काही मिनिटांपूर्वी एकमेकांशी प्रेमाने बोलणारे आता एकमेकांच्या उरावर बसले होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक चित्र

कॅप्टन शेख सुलेमान आणि चीफ ऑफिसर आदमभाई सगळ्यांना ओरडून शांत राहाण्याचे सुचवत होते, पण त्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. जे पाहू शकत होते त्यांनी बोट एक बाजूला कलंडलेली पाहिली आणि समुद्रात उडया मारल्या. काहींनी लाईफ जॅकेट मिळवून बोट सोडली. बोटीवर हाहाकार होता.

वारकऱ्यांनी विठ्ठलाचा धावा करायला सुरुवात केली. रामदास काश्याच्या खडकापासून काही अंतरावर पोहोचली आणि त्याचवेळी समुद्रात एक मोठी लाट उसळली आणि रामदास पूर्णपणे एका बाजूला कलंडली. प्रवासी पावसापासून सुरक्षित रहावे यासाठी लावलेल्या ताडपत्र्यांमध्ये माणसं आणि गरोदर बायका अडकल्या. काही कळायच्या आत पुन्हा एकदा मोठी चाळीस फूट उंचीची लाट समुद्रातून उसळली आणि रामदास समुद्रात दिसेनाशी झाली.

17 जुलैला रामदास बुडाली आणि त्यानंतर 1 महिन्यानं म्हणजेच 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यप्राप्तीच्या महिनाभर आधी घडलेल्या या दुर्घटनेचे पडसाद मुंबई आणि उत्तर कोकण किनारपट्टीवर पुढले कितीतरी महिने राहिले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा टायटॅनिक बोटीचे संग्रहित छायाचित्र

भारतातील नौकानयनाच्या आतापर्यंतच्या अपघातातील हा सगळ्यात मोठा अपघात. मुंबई बंदरापासून तशी हाकेच्या अंतरावर असलेली बोट सकाळी 9च्या सुमारास बुडाली आणि ती बुडाल्याची बातमी सायंकाळी 5पर्यंत तरी मिळाली नव्हती.

अलिबागचे 10 वर्षांचे वय असलेले बारकू शेट मुकादम लाईफ सेव्हिंग जॅकेटच्या मदतीने मुंबई बंदरास लागले आणि रामदास बुडाल्याची माहिती मुंबईत वाऱ्यासारखी परसली.

भाऊच्या धक्क्यावर अख्खी मुंबई जमा झाली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहऱ्यावर भीती. पुढले कितीतरी महिने ही माणसं भाऊच्या धक्क्यावर आणि रेवसच्या बंदरावर नित्यनियमाने जात होती कारण घरातल्या प्रियजनांची अजूनही खबरबात नव्हती ना त्यांची मृत शरीर त्यांना सापडली होती.

रामदास बुडून 71 वर्षं झाली. आजही मी डोळे बंद करून त्या दुर्दैवी दुर्घटनेचा विचार करतो. त्यावेळी तो संपूर्ण घटनाक्रम डोळ्यासमोर उभा राहातो. मला ठाऊक आहे रामदास हा सिनेमा करणं सोपं नाही पण अशक्य तर मुळीच नाही. रामदास बोटीवरील सिनेमा हा खऱ्या अर्थानं त्यात मृत्यू पावलेल्या लोकांसाठी श्रद्धांजली ठरेल.

हे वाचलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
मुंबई : माहीम बीचसाठी 'हे' नवरा-बायको ठरले स्वच्छतादूत

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)