#5मोठ्याबातम्या : मनुस्मृतीच्या अभ्यासानंतरच आंबेडकरांनी लिहिली राज्यघटना : संभाजी भिडेंचा दावा

संभाजी भिडे

फोटो स्रोत, Raju Sanadi

फोटो कॅप्शन,

संभाजी भिडे

पाहू या आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. मनुस्मृतीच्या अभ्यासानंतरच आंबेडकरांनी लिहिली राज्यघटना - संभाजी भिडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचा अभ्यास केल्यानंतरच भारताची राज्यघटना लिहिली असल्याचा दावा संभाजी भिडे यांनी केला आहे.

न्यूज18 लोकमतच्या वृत्तानुसार, चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये संभाजी भिडे यांनी विविध दावे केले. "राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यात आला असून त्या पुतळ्याखाली - मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता असं बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलंय", असा दावा भिडे यांनी मुलाखतीमध्ये केला.

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना देताना मी मनुस्मृतीचा अभ्यास केल्याचं म्हटलं होतं. त्यांनी मनूचं कौतुकही केलं. याचा पुरावासुद्धा मिळेल. मीडियानं ते शोधून काढावा", असं भिडेंनी या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

'तो' विशिष्ट आंबा खाल्ला की पौरुषत्व वाढतं आणि त्यामुळे पुत्रप्ताप्ती होते या विधानावर संभाजी भिडे ठाम आहेत. गरज पडली तर ही गोष्ट मी कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध करेन असंही त्यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं.

2. अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची केली कमी

महाराष्ट्र सरकारतर्फे मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आराखडा बदलण्यात आला असल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

फोटो स्रोत, MAHARASHTRA DGIPR

फोटो कॅप्शन,

मुंबई नजीकच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम आजही दृष्टीपथात नाही.

स्मारकाचा खर्च कमी करण्यासाठी पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 7.5 मीटरनं कमी करण्यात येणार असली तरी तलवारीची उंची वाढवण्यात येणार असल्यानं पुतळ्याची एकूण उंची कमी होणार नाही, असं या बातमीत म्हटलं आहे.

इंडियन एक्स्प्रेसने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, राज्य सरकारच्या प्रस्तावित आराखड्यानुसार पुतळ्याची उंची एकूण 121.2 मीटर होती. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची 83.2 मीटर आणि तलवारीची उंची 38 मीटर होती.

मात्र यावर्षी राज्य सरकारने बांधकाम खर्चात कपात करण्यासाठी पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तलवारीची उंची 38 मीटर ऐवजी 45.5 मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुतळ्याची एकूण उंची कमी होणार नसून 121.2 मीटरच राहणार आहे.

3. मोदींच्या सभेत मंडप कोसळ्यानं 90 जखमी

पश्चिम बंगालमधील मिदनापूर इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत मंडप कोसळ्यानं 90 जण जखमी झाल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

फोटो स्रोत, AFP

मिदनापूर इथली सभा संपल्यानंतर मोदी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. पंतप्रधान मोदी यांचं भाषण सुरू असतानाच हा प्रकार घडला. मोदी यांनी भाषण थांबवत लोकांनी धावपळ करू नये, असं सांगत सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन केलं.

जखमींना रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर पंतप्रधानांचा ताफा तिथे पोहोचला. केंद्र सरकारनं पश्चिम बंगाल सरकारकडून मंडप कोसळल्याच्या घटनेचा अहवाल मागितला आहे.

4. यापुढे गोव्यात कुठेही दारू पिता येणार नाही

पुढील महिन्यापासून गोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना किंवा घाण करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

फोटो स्रोत, Reuters

लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ही घोषणा केली असून त्याबाबतचं नोटिफिकेशन लवकरच काढण्यात येणार आहे.

येत्या 15 ऑगस्टपासून याचा अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं पर्रिकर म्हणाले. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांना जवळपास 2500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

5. वर्षभरात महाराष्ट्रात 13000 बालमृत्यू

महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात 13 हजार 541 बालमृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

गेल्या वर्षभरात झालेल्या एकूण बालमृत्यूंपैकी 65% बालकांचा मृत्यू हा जन्मल्यानंतर महिनाभरातच झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, एप्रिल 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत 13 हजार 541 बालमृत्यू झाले. सर्वाधिक म्हणजे 22 टक्के बालमृत्यू हे कमी वजनाच्या आणि अपुऱ्या वजनाच्या अर्भकांचे झाले. तर न्युमोनिया आणि जंतुसंसर्गामुळे 7 टक्के, अतिसारामुळे 0.32 टक्के, श्वसनाच्या आजारांमुळे 7 टक्के, श्वसनमार्गाच्या विकारामुळे 20 टक्के अर्भकांचा मृत्यू झाल्याचे डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.

या बालमृत्यूपैकी शून्य ते 28 दिवसांमध्ये 65 टक्के, तर 28 दिवस ते एक वर्षाच्या कालावधीत 21 टक्के बालके मृत्यू पडली आणि एक ते पाच वर्षे वयोगटातील बालमृत्यूचे प्रमाण 14 टक्के आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)