हल्ला झालेल्या स्वामी अग्निवेश यांच्या विषयी या 7 गोष्टी माहीत आहेत?

स्वामी अग्निवेश Image copyright Getty Images

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे एकेकाळचे सहकारी स्वामी अग्निवेश यांना मारहाण होण्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. आर्य समाजाचे नेते, नक्षलवाद्याशी चर्चेत भाग, बिग बॉसमध्ये सहभागी अशा विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेल्या स्वामी अग्निवेश यांच्याबद्दल जाणून घ्यावेत असे 7 मुद्दे पुढील प्रमाणे.

नेमकी घटना काय?

झारखंडमध्ये पाकुड या ठिकाणी काही जणांनी स्वामी अग्निवेश यांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि नंतर त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. ही मारहाण भाजपच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचा आरोप स्वामी अग्निवेश यांचे समर्थक करत आहेत. हा हल्ला सरकार प्रायोजित होता असाही त्यांचा आरोप आहे.

Image copyright Ravi prakash

स्वामी अग्निवेश यांचे सहकारी आणि बंधुआ मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मनोहर मानव यांनी बीबीसी हिंदीला मुलाखत दिली. ते म्हणाले, "हे एक प्रकारचं मॉब लिंचिंग आहे. आम्ही पोलिसांना मदत मागितली तेव्हा कुणीही वेळेवर पोहचलं नाही. हल्लेखोर हे भाजपचे होते."

स्वामी अग्निवेश या ठिकाणी कोणता कार्यक्रम घेणार आहेत याबाबत आम्हाला आधी कोणतीही माहिती मिळाली नव्हती. जेव्हा आम्हाला हल्ल्याबद्दल कळलं तेव्हा आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो, असं पाकुडच्या पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रसन्ना मिश्रा यांनी या मारहाणीत भाजपचा सहभाग असल्याचे आरोप फेटाळले आहेत.

Image copyright Ravi prakash

स्वामी अग्निवेश यांच्याबद्दलचे 7 मुद्दे

1. आर्य समाजाचे नेते

स्वामी अग्निवेश यांचं मूळ नाव वेपा श्याम राव हे आहे. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशात झाला. आर्य समाजाची दीक्षा घेऊन त्यांनी संन्यास घेतला. आर्य समाजामार्फत त्यांनी विविध सामाजिक चळवळीमध्ये भाग घेतला आहे. ते काही काळ आर्य समाज परिषदेचे अध्यक्ष देखील राहिले. सामाजिक सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875मध्ये आर्य समाजाची स्थापना केली होती, असं स्वामी अग्निवेश यांच्या वेबसाइटवर म्हटलं आहे.

Image copyright Ravi prakash

2. राजकारणात सहभाग

सामाजिक कार्यातून ते राजकारणाकडे वळले आणि 1977मध्ये हरियाणा विधानसभेवर निवडून गेले. नंतर ते शिक्षण मंत्री झाले.

3. वेठबिगारी विरोधात आंदोलन

1981 साली त्यांनी मजुरांची वेठबिगारीतून सुटका व्हावी यासाठी बंधुआ मुक्ती मोर्चाची स्थापना केली होती. कायदेशीररीत्या भारतातून 1976 सालीच वेठबिगारीची पद्धत संपुष्टात आली होती पण काही राज्यात ही पद्धत होती. त्याविरोधात त्यांनी जनजागृती आणि आंदोलन सुरू केलं होतं. 1986 साली बाल मजुरी प्रतिबंध कायदा मंजूर झाला होता. त्यावेळी बंधुआ मुक्ती मोर्चानं दिलेल्या शिफारसींची दखल घेण्यात आली होती.

4. नक्षलवाद्यांसोबत चर्चा करण्यासाठी मध्यस्थी

2010 मध्ये तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी स्वामी अग्निवेश यांना मध्यस्थ म्हणून निवडलं होतं. नक्षलवादी आणि केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या वेळी स्वामी अग्विवेश यांना नक्षलवाद्यांना शांततेचं आवाहन करावं असं पत्र चिदंबरम यांनी लिहिलं होतं.

5. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभाग

अण्णा हजारेंनी केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात स्वामी अग्निवेश यांनी सहभाग घेतला होता. अण्णा हजारे यांच्यासोबत मतभेद झाल्यावर ते वेगळे झाले. नंतर अण्णा हजारेंची माफी मागून आपण त्यांच्यासोबत पुन्हा काम करायला तयार आहोत असं त्यांनी म्हटलं होतं. पण अण्णा हजारेंनी त्यांचं काही ऐकलं नाही.

6. बिग बॉसमध्ये सहभाग

रॉयटर्स वृत्तसंस्थेनी दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. स्वामी अग्विनेश हे प्रसिद्धिसाठी बिग बॉसमध्ये गेले अशी टीका त्यांच्यावर होत होती. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले होते की बिग बॉसच्या माध्यमातून देखील सामाजिक प्रश्न मांडता येतात. तीन दिवस बिग बॉसमध्ये राहिल्यानंतर ते बाहेर आले.

7. अमरनाथ यात्रेवरून वाद

बीबीसी हिंदीनं दिलेल्या वृत्तानुसार, अमरनाथ यात्रेला नेमकं कोणते लोक जातात असं विधान त्यांनी 2011मध्ये केलं होतं. त्या विधानावरून गदारोळ निर्माण झाला होता. त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले होते. लोकांच्या भावना दुखावल्या जातील असं विधान करण्याआधी तुम्ही विचार करायला हवा होता. असं न्यायालयाने म्हटलं होतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)