धुळे हत्याकांडाची पुनरावृत्ती : 'रक्तबंबाळ झालेले ते तरुण हात जोडून गयावया करत होते'

व्हॉट्स अप, सोशल मीडिया, कर्नाटक
प्रतिमा मथळा बिदर येथे जमावाने व्हॉट्सअप व्हीडिओवर विश्वास ठेवून तरुणांना मारहाण केली.

हैदराबादमधील मित्रांनी वीकेंडसाठी फिरायला जायचं ठरवलं. पण ही मुशाफिरी जीवावर बेतणारी ठरेल असं त्यांच्या स्वप्नातही आलं नसेल. लहान मुलांना पळवून नेणाऱ्या माणसांबाबतचा एक व्हीडिओ कर्नाटकतल्या बिदर जिल्ह्यातल्या गावात व्हायरल झाला होता. लहान मुलांचं अपहरण करणारी टोळी असल्याच्या गैरसमजातून मोहम्मद आझम या सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या झाली. त्याचे अन्य मित्र या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

मोहम्मद आझम आणि त्याचे मित्र मुरकी गावात लहान मुलांना चॉकलेट वाटत होते. त्यावेळी जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. आझम आणि त्याच्या मित्रांचं पुढे काय झालं? जमावाने का केला हल्ला? हे सगळं जाणून घेण्यासाठी बीबीसीच्या प्रतिनिधी दीप्ती बाथिनी मुरकी गावात पोहोचल्या.

तिथल्या परिस्थितीचा हा ग्राऊंड रिपोर्ट.

वीकेंड ट्रिप ठरली काळरात्र

आझम, सलमान, सलम, नूर, अफरोझ या दोस्तांनी वीकेंडला लाँग ड्राइव्हचा बेत आखला. यासाठी नवी कोरी गाडी काढायचं ठरवलं. राज्यातल्या काही नातेवाईकांना भेटायचं, दोन दिवस निवांत घालवायचे आणि परत यायचं असं त्यांच्या डोक्यात होतं. 13 जुलैला हे सगळे हैदराबादपासून साधारण 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या हंडिकेरा गावात पोहोचले.

हंडिकेरा गाव हिरव्यागार शेतांनी बहरलं आहे. गावात 20 मुस्लीम कुटुंबं आहेत. लिंगायत समाजाच्या दीडशे कुटुंबांसह काही आदिवासी घरं आहेत.

जीवघेण्या हल्ल्यात वाचलेल्या अफरोझने त्या कटू आठवणीबद्दल सांगितलं.

"आम्ही नातेवाईकांच्या घरी पोहोचलो. स्वयंपाकघरात जेवणाची तयारी सुरू झाली. जेवण तयार होईपर्यंत आम्ही शेताकडे जाण्याचा निर्णय घेतला. ते साधारण सहा किलोमीटर अंतरावर आहे. तिकडे जाताना आम्हाला लहान मुलं शाळेतून घरी जाताना दिसली. सलम कतार देशाचा आहे. तो नुकताच तिकडून आला होता. त्याच्याकडे चॉकलेट्स होती. त्याने ती चॉकलेट्स लहान मुलांना वाटली. त्यानंतर आम्ही तलावाच्या दिशेने गेलो. नयनरम्य तलावाच्या परिसरात थांबण्याचा आम्ही निर्णय घेतला. आमच्याकडे फोल्ड होणाऱ्या खुर्च्या होत्या. त्या टाकून आम्ही निवांत बसलो होतो. आम्हाला काही समजण्याच्या आत गावकरी एकत्र जमले. त्यांनी आमच्या गाडीच्या टायरची हवा काढून घेतली. 'तुम्ही लहान मुलांना पळवून नेता' असा आरोप ते करू लागले. आम्ही कोण आहोत आणि कशासाठी हे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मदतीसाठी आम्ही नातेवाईकांना कॉल केला," असं तो म्हणाला.

प्रतिमा मथळा जमावाच्या हल्ल्यातून आझम बचावला.

अफरोझचे काका मोहम्मद याकुब यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र गावकऱ्यांनी त्यांचंही ऐकलं नाही.

"आमच्यात जी झटापट झाली त्याचा व्हीडिओ अमर पाटीलने रेकॉर्ड केला. गावकऱ्यांच्या बरोबरीने तो तिथे उपस्थित होता. त्याने हा व्हीडिओ 'मदर मुरकी' नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला. या ग्रुपचे साधारण दोनशे सदस्य आहेत. तुम्ही लहान मुलं पळवणारे आहेत असं ते सगळे सातत्याने म्हणत होते. त्यांनी गाडीवर दगडफेक केली. त्यानंतर त्यांनी आम्हाला मारायला सुरुवात केली. मारहाण आणि वादावादीत नूरच्या डोक्याला लागलं. मी आणि काही मित्रांनी त्याला जमावापासून दूर केलं आणि त्याला बाइकवरून पाठवून दिलं. आम्हाला काही कळण्याआधी सलम, सलमान आणि आझम गाडीत बसून वेगाने निघून गेले. वाद मिटला असं आम्हाला वाटलं. गाडीतून गेलेल्या मित्रांना घरी भेटू असं आम्हाला वाटलं. मात्र पाच मिनिटांत आमच्या मित्रांची गाडी पुढच्या एका गावात खड्यात पडल्याचं समजलं," असं अफरोझनं सांगितलं.

हंडिकेरातील ती रात्र आमच्यासाठी काळरात्र होती असं अफरोझनं सांगितलं.

"मारहाण झालेल्या अन्य काहीजणांना वाचवण्यासाठी मुरकीला गेलेल्यांच्या जीवाला धोका असल्याचं जाणवलं. माझ्या कुटुंबाला धोका होता. अफरोझला मी लपवलं. माझ्या मुलांना दुसऱ्या एका घरात सुरक्षित ठिकाणी हलवलं," असं याकुब यांनी स्पष्ट केलं.

व्हीडिओ कसा पाठवला?

एकामागोमाग एक वेगाने गोष्टी घडत गेल्या. संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास तो व्हीडिओ ग्रुपवर शेअर करण्यात आला.

"ग्रुपचे सदस्य असल्यानं आम्ही सगळ्यांनी तो व्हीडिओ पाहिला. हंडिकेरा गावातला हा व्हीडिओ असल्याचं स्पष्ट झालं. मुलांना पळवून नेणारी टोळी लाल गाडीतून फिरत आहे आणि आपल्या म्हणजे मुरकी गावच्या दिशेने येत आहे. व्हीडिओ पाहताच दुकानातली माणसं जागेवरून उठली. टेबलं-खुर्च्या घेऊन त्यांनी रस्ता अडवला. गाडी वेगात येत होती. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. एका लोखंडी खांबाला कारने धडक दिली आणि काही फूट पुढे जाऊन एका खड्ड्यात पडली. गाडी न थांबल्याने लोकांचा राग अनावर झाला. त्यांनी चिडून गाडीवर दगडफेक करायला सुरुवात केली. अचानक पाचशेहून अधिक गावकरी जमले. आजूबाजूच्या गावांमधून आणखी माणसं जमू लागली. आता त्यांची संख्या हजारपेक्षा जास्त झाली असेल," असं विजय पाटील यांनी सांगितलं.

विजय हे मुरकी गावात बस स्टॉपच्या इथे चहाची टपरी चालवतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा व्हॉट्सअपद्वारे पसरवण्यात आलेल्या व्हीडिओमुळे जमावाने मारहाणीला सुरुवात केली.

व्हॉट्सअपचा एक मेसेज काय घडवू शकतो हे लक्षात आल्यानंतर विजय शुक्रवारी या ग्रुपमधून बाहेर पडले. गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या व्हीडिओचा अभ्यास केला. खड्यात पडलेल्या गाडीतल्या माणसाला बाहेर काढून जमाव सळ्या काठ्यांनी मारहाण करत असल्याचं व्हीडिओत दिसत होतं. बाकी गावकरी गाडीवर दगडफेक करत होते. निरपराधांना मारहाण करून नका, असं आवाहन पोलीस संतप्त जमावाला करत असल्याचं व्हीडिओत दिसत होतं.

"या घटनेनंतर गावात शुकशुकाट झाला. प्रत्येकाला धक्का बसला होता. कधीही भडका उडू शकतो या भीतीने दुकानं बंद करण्यात आली होती. अटकेच्या भीतीने अर्ध्याहून अधिक गावकऱ्यांनी गाव सोडलं होतं," असं मुरकी गावातल्या राजेंद्र पाटील यांनी सांगितलं.

पोलिसांनाही दुखापत

आठ पोलिसांना या घटनेत जखमी झाले. अनेकांना फ्रॅक्चर झालं तर काहींच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. या गावातले पोलीस सामान्यपणे जमिनीचे वाद, घरगुती भांडणं, दारू पिऊन दंगा करणाऱ्या व्यक्तींसंदर्भातले गुन्हे हाताळतात असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

प्रतिमा मथळा नूर मोहम्मद या मारहाणीतून वाचला.

"मला अजूनही झोप लागत नाही. मला कधीतरी डोळा लागतो, पण भीतीने जाग येते. जबर मारहाण झालेल्या तीन माणसांचे चेहरे आजही माझ्या डोळ्यांसमोरून जात नाही. दोन्ही हात जोडून ते गयावया करत होते. त्यांचे चेहरे रक्ताने माखले होते. इतक्या निर्दयपणे कोणी कसं वागू शकतं याचं मला आश्चर्य वाटलं होतं. त्या माणसांची सुटका करा, शांत व्हा असं आम्ही वारंवार आवाहन केलं. पण ही माणसं लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याचं सांगत त्यांनी मारहाण सुरूच ठेवली," असं मल्लिकार्जुन यांनी सांगितलं.

कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन हे घटनास्थळी सगळ्यात आधी पोहोचले होते. या हल्ल्यात मल्लिकार्जुन यांच्या डाव्या पायाला मार लागला आहे. बिदरमधल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गेल्या आठवड्यातल्या या घटनेनंतर जवळपास 20 व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनने सावधानतेचा उपाय म्हणून ग्रुप डिलीट केले आहेत असं जिल्हा पोलीस अधीक्षक डी. देवीराजा यांनी सांगितलं.

या घटनेसंदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदेशीरपणे एकत्र येणं, सेवेत असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणणं, हत्या या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

"बेकायदेशीरपणे एकत्र येण्याप्रकरणी आम्ही चारजणांना अटक केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण आणि कामात अडथळाप्रकरणी 22जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये व्हॉट्सअप अॅडमिनचा समावेश आहे. ग्रुपमध्ये तो व्हीडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीचाही समावेश आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन स्त्रिया आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मारहाण करणाऱ्या जमावात हे सामील होते," असं देवीराजा यांनी स्पष्ट केलं.

प्रतिमा मथळा मारहाणीत तरुणांना झालेल्या जखमा

संशयितांना पकडण्यासाठी 24 तास लागले. या सर्वांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना औराड कारागृहात पाठवण्यात आलं. या खटल्यासंदर्भात पुढची सुनावणी 27 जुलैला होणार आहे.

घटनेनंतर आम्ही तात्काळ 50 लोकांना ताब्यात घेतलं. प्रत्यक्षदर्शींनी रेकॉर्ड केलेले व्हीडिओ आम्ही मिळवले. प्रत्येक फ्रेमचा अभ्यास करून आम्ही संशयितांना अटक केली. नक्की कोण मारहाण करत आहे हे नीट पाहिलं. 18 जण हल्ला करत असल्याचं उघड झालं. अन्य व्हीडिओंचा आम्ही अभ्यास करत आहोत. घटनेशी आणखी कोणाचा संबंध आहे हे लक्षात आलं तर तात्काळ अटक केली जाईल, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

फेक न्यूजसंदर्भात जागृती

मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीबाबत व्हॉट्सअपवर गेल्या दोन महिन्यांपासून खोट्या बातम्या अर्थात फेक न्यूज पसरत आहेत. बिदर जिल्हा प्रशासनाने फेक न्यूज ओळखण्यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेतला. मुरकी गावातील पोलीस आपल्या फोनमधील व्हीडिओद्वारे फेक न्यूज काय आणि त्या कशा ओळखाव्यात याची माहिती देत आहेत. या सगळ्या प्रयत्नांनंतरही हा दुर्दैवी प्रकार घडला, असं पोलिसांनी सांगितलं.

गावकऱ्यांचं काय म्हणणं?

"आम्हाला प्रचंड राग आला होता. व्हीडिओत जे दिसलं ते खरं आहे असं आम्हाला वाटलं. ज्या पद्धतीने ते गाडीतून जात होते ते पाहून ही लहान मुलांना पळवणारी टोळी असावी असा आमचा समज झाला. आता ती माणसं कोण होती याबाबत आम्ही वर्तमानपत्रांमध्ये वाचल्यावर वाईट वाटलं. माझा भाऊ तुरुंगात आहे. पण तो केवळ बघ्याचं काम करत असावा असं मला वाटतं. काय होतंय ते कळलेच. कायद्याने योग्य ती कारवाई होईलच," असं अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीच्या भावाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

मुरकी गाव

कमल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारं मुरकी हे 5000 वस्तीचं गाव. व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरलेल्या मजकुराला खरं मानून मारहाण करण्याचे प्रकार या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला नाही. या गावाची हद्द महाराष्ट्राला लागून आहे. हे गाव बिदर जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत येतं. इथे तेलंगण, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमा एकत्र येतात.

पंचायत राज मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सगळ्यात मागास जिल्ह्यांमध्ये बिदरचा समावेश होतो. मुरकी गावात बँक, हार्डवेअर शॉप, दोन चहाच्या टपऱ्या आणि अन्य काही दुकानं आहेत. गावातल्या बहुतांश नागरिकांच्या उपजीविकेचं साधन शेती आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)