#5मोठ्याबातम्या : भारताचा पराभव; इंग्लंडविरुद्धची वन डे सीरिज गमावली

जो रूट

पाहू या आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. भारताने वनडे सीरिज गमावली

लीड्समध्ये सुरू असलेल्या वन डे आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतावर विजय मिळवून इंग्लंडनं ही मालिका 2-1ने जिंकली आहे.

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडच्या संघाला 257 धावांचं आव्हान दिलं.

इंग्लंडने 44.3 षटकांत 2 बाद 260 धावा करत भारतावर सहज विजय मिळवला. जो रूटने नाबाद 100 तर कर्णधार इयॉन मॉर्गनने नाबाद 88 धावांची खेळी केली.

रुट आणि मॉर्गन या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १८६ धावांची भागीदारी केली.

दरम्यान, याच सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आणखी एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. कोहलीनं कर्णधार म्हणून ३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

2. झुंडशाही रोखा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

सरकारने उन्मादी झुंडशाहीचा कठोरपणे बिमोड करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी दिला.

लोकमतच्या वृत्तानुसार, लोकशाही व्यवस्था, बहुढंगी संस्कृती आणि सहिष्णू बंधुभावाचा वारसा टिकवायचा असेल, तर झुंडशाही फोफावण्याआधीच तिला नख लावण्याखेरीज अन्य पर्याय नाही, असं न्यायालयानं नमूद केलं.

कायद्याची जरब हा सुजाण समाजाचा पाया असल्याने, जमावांकडून होणारी हिंसा हा स्वतंत्र गुन्हा ठरविणारा कायदा संसदेने करावा आणि त्यात कडक शिक्षेची तरतूद करावी, अशी सूचनाही न्यायालयाने केली.

गोहत्या आणि गोमांस भक्षणाच्या संशयावरून गोरक्षकांकडून विशिष्ट समाजाच्या लोकांना मारहाणीच्या तसंच प्रसंगी हत्येच्या घटना घडल्या होत्या. त्यांना आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या काही याचिका न्यायालयात प्रलंबित होत्या. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अजय खानविलकर, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं झुंडशाहीबद्दल भाष्य करणारं ४५ पानी निकालपत्र दिलं.

3. दूध कोंडीवर तोडगा निघेना

महाराष्ट्रातील दूध कोंडीवर तोडगा काढण्यासाठी दिल्ली आणि नागपूर इथं झालेल्या बैठकी निष्फळ ठरल्या असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

फोटो कॅप्शन,

दूध आंदोलन

दिल्ली इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठक घेतली. या बैठकीत कृषिमंत्री राधामोहन सिंह, अर्थमंत्री पियुष गोयल, उद्योगमंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते.

तर दुसरीकडे नागपूर अधिवेशानदरम्यान विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

केंद्र सरकार 21 जुलैलाला रिजनल क्राँप्रेसिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रिमेंटअंतर्गत थायलंड इथे व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडमधून अतिशय स्वस्तात येणाऱ्या दूध पावडरमुळे देशात 7 ते 10 रुपये दराने दूध मिळू शकेल. सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागल्याचा आरोप राष्ट्रीय किसान महासंघाने केला आहे.

4. तिहेरी तलाकविरोधात लढणाऱ्या महिलेला वाळीत टाकलं

उत्तर प्रदेशातील इमाम मुफ्ती खुर्शीद आलम या धर्मगुरूने निदा खान या महिलेला वाळीत टाकण्याचा फतवा काढल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

निदा खान यांना पतीने तलाक दिल्यानंतर त्यांनी निकाह हलाल, तिहेरी तलाक प्रथा यावर काम सुरू केलं. याचाच राग धर्मगुरूंना आला.

निदा खान सातत्याने इस्लामविरोधात बोलत असतात, त्यामुळे त्या आजारी पडली तरी कोणी औषधं देऊ नये, मृत्यूनंतरही त्यांच्यासाठी कोणीही नमाज पठण करू नये आणि अंत्ययात्रेलाही कोणी जाऊ नये, तिला मुस्लीम दफन भूमीत जागा देऊ नये असा फतवा आलम यांनी जारी केला आहे.

5. काँग्रेस कार्यकारिणीवर थोरात, सातव, रजनी पाटील

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात, रजनी पाटील आणि राजीव सातव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

न्यूज18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची ही पहिलीच मोठी घोषणा आहे. या कार्यकारिणीत एकूण 51 सदस्य आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना महत्त्व असून नव्या कार्यसमितीची बैठक 22 जुलैला होणार आहे. जुन्या कार्यकारिणीतील मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे यांना पुन्हा स्थान देण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)