वर्षभरानंतरही धोका कायम: रेल्वेचं अपयश प्रवाशांच्या जीवावर बेतणार का?

प्रतिमा मथळा दुरांतो एक्सप्रेसचं इंजिन अजूनही रेल्वेरुळांच्या बाजूलाच पडून आहे.

29 ऑगस्ट 2017चा तो दिवस. मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे आसनगाव-वासिंद यांदरम्यान भूस्खलन झालं नि माती आणि दगड शेजारच्या रेल्वे रुळांवर येऊन पडले. त्याचदरम्यान सकाळी साडेसहाच्या सुमारास या पट्ट्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे नऊ डबे घसरले.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण कल्याण-कसारा यांदरम्यानची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्याचा फटकाही प्रवाशांना बसला होता. हा अपघात झाल्यानंतर हे डबे रूळांवरून बाजूला काढण्यासाठी 12 तासांपेक्षा जास्त वेळ लागला होता.

या दरम्यान 12 मेल-एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या, तर 20 गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला आणि रेल्वेचंही नुकसान झालं होतं.

पण अपघाताला जवळपास अकरा महिने लोटल्यानंतरही या भागातलं काम अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे या पट्ट्यातून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांवर टांगती तलवार आहे.

या अपघाताची चौकशी करण्यासाठी मध्य रेल्वेने एक समिती नेमली होती. या समितीचा अहवाल बीबीसी मराठीने पाहिल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

अहवाल काय सांगतो?

हा अपघात घडल्यानंतर मध्य रेल्वेच्याच अंतर्गत समितीने तपास करून एक अहवाल सादर केला, ज्यामध्ये या अपघातासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांची चूक होती, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

कल्याण-कसारा यांदरम्यान सध्या तिसऱ्या रेल्वेलाईनचं काम सुरू आहे. या तिसऱ्या लाईनसाठी आसनगाव आणि वासिंद यादरम्यान एक टेकडी कापण्यात आली. टेकडी कापताना जमिनीचा उतार किती ठेवायचा, याबाबत RDSOने (Research, Design and Standard Organisation) आखलेल्या नियमांचं पालन करण्यात आलं नाही, असं रेल्वेच्या अंतर्गत समितीच्या अहवालात म्हटलं आहे.

प्रतिमा मथळा नऊ डब्यांची वाताहात झाली होती

हा अपघात होऊन 11 महिने झाल्यानंतर बीबीसी मराठीने प्रत्यक्ष अपघातस्थळी जाऊन बघितले असता, गेल्या वर्षभरात या अपघाताच्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यातही रेल्वेला अपयश आल्याचं दिसलं. त्याचप्रमाणे अपघातात निकामी झालेलं इंजिन, रेल्वेच्या डब्यांमधील अनेक गोष्टी आजही इथे जशाच्या तशाच पडून आहेत.

या अहवालात असं आढळलं की, प्रचंड पाऊस पडल्याने रुळांच्या बाजूला असलेल्या टेकडीच्या उतारावरची माती ढासळली. हा भाग रुळांवर पडल्याने गाडीच्या मार्गात अडथळा आला आणि गाडी रुळांवरून घसरली. या टेकडीचा उतार तीव्र होता म्हणूनच ही टेकडी ढासळली.

प्रतिमा मथळा अपघातानंतर सुमारे 11 महिन्यांनीही बाल्यावस्थेत असलेली रेल्वेची संरक्षक भिंत

टेकड्यांचे उतार तीव्र करताना RDSOच्या नियमावलीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. कल्याण-कसारा यांदरम्यानची तिसरी लाईन बांधताना अयोग्य नियोजन करण्यात आलं आणि अधिकाऱ्यांनी या कामावर देखरेख करताना हेळसांड केली आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे.

या अहवालानुसार हा अपघात 'निसर्गाची गळचेपी' आणि 'रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपयश' या दोन कारणांमुळे झाला आहे.

धोका काय?

11 महिन्यांपूर्वी झालेल्या या अपघाताबाबतचा अहवाल साधारण नऊ महिन्यांपूर्वी रेल्वेकडे मांडण्यात आला. त्यानंतर रेल्वेने योग्य ती कारवाई केल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

बीबीसी मराठीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन बघितले असता, या भागात तिसऱ्या लाईनचं काम अजूनही सुरू असल्याचं आढळलं. रेल्वेने या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचं काम हाती घेतलं आहे. पण ते काम अजून 10 टक्केही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडला, तर पुन्हा एकदा दुरांतो एक्स्प्रेससारखी दुर्घटना घडू शकते.

प्रतिमा मथळा रेल्वेने या अपघातस्थळावरून डबे उचचले असले, तरी डब्यांमधलं सामान अजूनही इथे अस्ताव्यस्त पसरलं आहे.

या अपघाताच्या ठिकाणी दुरांतो एक्सप्रेसचं इंजिन अजूनही पडून आहे. कसाऱ्याकडे जाणाऱ्या रेल्वेलाईनच्या बाजूला पडलेलं हे इंजिन उचलायलाही रेल्वेला वेळ मिळालेला नाही.

"भविष्यात इथे पुन्हा एखादी दुर्घटना घडली, तर या इंजिनामुळे त्या दुर्घटनेची तीव्रता वाढू शकते. तसंच इंजिनामुळे बचावकार्यात अडथळेही येऊ शकतात," उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे नंदकुमार देशमुख सांगतात.

"मुळात तिसऱ्या मार्गाचं नियोजन करताना रेल्वेने अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला आहे. आसनगाव दुर्घटना घडली, म्हणून ही बाब लक्षात तरी आली. पण या मार्गावर अनेक ठिकाणी रेल्वेने टेकड्या कापून किंवा नद्यांवर पूल बांधून काम केलं आहे. या सगळ्याच कामाच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहत आहे," असं देशमुख म्हणाले.

"प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे कधीच तडजोड करत नाही, असं रेल्वेमंत्री अनेकदा बोलतात. पण RDSOच्या नियमांचं उल्लंघन करणं, ही तडजोड नाही काय," असा प्रश्नही देशमुख विचारतात.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेली कारणं

रेल्वेच्या अंतर्गत चौकशी समितीने दिलेल्या अहवालात रेल्वे अधिकाऱ्यांनी अपघातानंतर दिलेल्या कारणांच्या जंत्रीचाही समावेश आहे.

'रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुखांना या तिसऱ्या लाईनच्या डिझाइनमधल्या त्रुटी जाणवल्या होत्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी या त्रुटी दूर करण्यासाठीचं नियोजनही केलं होतं. पण धक्कादायक बाब म्हणजे अशा कोणत्याही नियोजनाची लेखी माहिती किंवा कागदपत्रं रेल्वेकडे उपलब्ध नाहीत,' असं हा अहवाल म्हणतो.

एखाद्या प्रकल्पात काही बदल होत असतील आणि त्यासाठी खर्च होणार असेल, तर त्या बदलांच्या नियोजनाची नोंद रेल्वेकडे असायला हवी. प्रत्यक्षात ही नोंद कुठेच दिसत नाही, हा ठपकाही या अहवालाने ठेवला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या

16 मंत्र्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलं: धनंजय मुंडे

'महाराष्ट्र सरकारच्या अमृतमंथनामधलं विष माझ्या वाट्याला आलं'

विजयसिंह आणि रणजितसिंह मोहिते-पाटील उद्या भाजपमध्ये जाणार

पहिल्या विमान उड्डाणाच्या वर्षी या आजीचा जन्म झाला होता... - व्हीडिओ

चक्रीवादळाने आफ्रिकेत हाहाकार : 180 जण ठार, अनेक बेपत्ता

'आता फक्त मोदी-शाहविरुद्ध प्रचार करा, त्याचा फायदा कुणालाही होवो'

'...तर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार'

'बाळासाहेब हुकुमशाह होते, पण उद्धव ठाकरेंची शिवसेना लोकशाहीवादी'

नायलॉन दोरीने घेतला वाघिणीचा जीव; दीड वर्षं होती जखमी