एक असं अॅप जे देतं विकलांगांनाही डेटिंगची संधी

इनक्लोव्ह, विकलांगता Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इनक्लोव्हतर्फे आयोजित उपक्रमातील एक दृश्य

विकलांग व्यक्तींच्या गरजा, अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी खास अॅप तयार करण्यात आलं आहे. विकलांग व्यक्तींना समाजात सहजतेने वावरता यावं, त्यांना मनाजोगता जोडीदार मिळावा या हेतूने अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपचं नाव इनक्लोव्ह (Inclov). इनक्लोव्ह अॅप विकलांगांना डेटिंगची संधी देतं. इनक्लोव्हतर्फे देशभरात विविध ठिकाणी अनौपचारिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

भारताची लोकसंख्या अवाढव्य अशी आहे. या लोकसंख्येत विकलांग व्यक्ती बऱ्याच आहेत. मात्र घरातून बाहेर पडल्यानंतर साध्या साध्या गोष्टींमध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्यांचं अस्तित्व जाणवतच नाही.

मनातलं सांगण्याकरता कोणाला दारुची आवश्यकता आहे?

राजधानी दिल्लीतल्या उच्चभ्रूंचा वावर असलेल्या 'किट्टी स्यू' नाइटक्लबमध्ये गमती गमतीत हा प्रश्न विचारण्यात आला.

थोड्याच वेळात अवघडलेपण दूर झालं आणि उपस्थित सगळ्यांनी मनमोकळेपणी आपल्या भावना व्यक्त केल्या. इंटरनेटवर आपण काय सर्फिंग करतो याची कबुली काही जणांनी दिली. काहींनी प्राण्यांचे आवाज काढून दाखवत नैपुण्याची झलक सादर केली.

थोड्याच वेळानंतर डीजेने ठेका वाढवला आणि बॉलीवूड तसंच इंग्रजी पॉप गाण्यांवर मंडळी थिरकू लागली. व्हीलचेअर आणि क्रचेस एरव्ही वावरताना अडथळा ठरतात पण इथे तसं झालं नाही. डान्स फ्लोअर सर्वांसाठी खुला होता.

इनक्लोव्ह अॅपची निर्मिती करणाऱ्या मंडळींचा सोशल स्पेस हा उपक्रम 'इन्क्लुसिव्ह लव्ह' या सूत्रावर आधारित आहे. विकलांग व्यक्तींसाठी हे अॅप तयार करण्यात आलं आहे. मात्र विकलांगता नसणारी माणसंही या अॅपचा वापर करू शकतात.

'किट्टी स्यू' अर्थात नाइटक्लबला भेट देण्याची अनेकांसाठी ही पहिलीच वेळ होती.

कोलकाता शहरात फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी मित्रमैत्रिणींबरोबर पबमध्ये जायचं होतं. पण जाता आलं नाही. तुमच्या व्हीलचेअरमुळे पबमधल्या अन्य लोकांना अवघडल्यासारखं वाटू शकतं असं पबवाल्यांनी सांगितलं, असं 34 वर्षीय मनीष राज यांनी स्पष्ट केलं. सोशल स्पेस सारख्या उपक्रमाला जाण्याची त्यांची ही सातवी किंवा आठवी वेळ असेल असं त्यांनी सांगितलं. अगदी सहजतेने त्यांनी हे सांगितलं.

कुठल्याही स्वरूपाची विकलांगता असणाऱ्या व्यक्ती आपल्या देशात लहानपणापासूनच बाहेर जाणं कमी करतात किंवा टाळतात. त्यांना बाहेर जायचं नसतं असं नाही पण साध्या सोप्या गोष्टी मिळवणं किंवा करणं अत्यंत त्रासदायक ठरू शकतं असं शंकर श्रीनिवासन यांनी सांगितलं. शंकर आणि त्यांची कॉलेज मैत्रीण कल्याणी खोना यांनी एकत्र येऊन इनक्लोव्ह हे अॅप सुरू केलं आहे.

Image copyright Inclov
प्रतिमा मथळा इनक्लोव्हच्या एका सेशनमधलं दृश्य

आपल्या देशात सार्वजनिक व्यवस्था विकलांगांसाठी अनुकूल नाहीत. पायाभूत यंत्रणा, दृष्टिकोन, धोरणं अशा सगळ्याच आघाड्यांवर अनास्था जाणवते. विकलांगता असणारी मुलंमुली आहेत असे पालक त्यांना घेऊन बाहेर पडत नाहीत. त्यांच्याकडे कलंक आणि शरमेची बाब म्हणून पाहिलं जातं.

घराबाहेरच्या जगात त्यांचं नसणं याचा अर्थच सामाजिक जीवनात त्यांना स्थान नाही असा होतो. अनेकांना त्यांच्याशी कसं बोलावं असं वाटतं. विकलांग व्यक्ती आसपास असल्या की काहीजणांना अवघडल्यासारखं वाटतं. बऱ्याचदा उपस्थित असूनही त्यांची साधी दखलही घेतली जात नाही.

शंकर आणि कल्याणी यांना 'मॅचमेकिंग स्पेस' अर्थात वधू-वर सूचक केंद्र स्वरुपाचं काहीतरी सुरू करायचं होतं. यातूनच इनक्लोव्हचा जन्म झाला. विकलांग व्यक्तींकरता वधू-वर सूचक स्वरुपाचं काहीच नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

सुरुवातीला त्यांनी 'वाँटेड अंब्रेला' नावाची ऑफलाइन एजन्सी सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. याचं रुपांतर पुढे साइटमध्ये झालं आणि थोड्याच दिवसात मोबाइल अॅपमध्ये स्थित्यंतर झालं.

"भारतात साधारण 8 कोटी विकलांग नागरिक आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच पोहोचता येईल हे आमच्या लक्षात आलं", असं शंकर यांनी सांगितलं. मात्र त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि ते तंत्रस्नेहीही नव्हते. शंकर आणि कल्याणी यांनी क्राऊडफंडिगच्या माध्यमातून पैसा उभा केला. अप डेव्हलप करण्यासाठी त्यांनी 615,000 रुपये जमा केले.

प्रतिमा मथळा विकलांगतेमुळे मनीष राज यांना वाईट अनुभव आला होता.

विकलांगता असणाऱ्या अनेकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. अॅपकडून त्यांच्या नक्की काय अपेक्षा आहेत यासाठी मुलाखती घेण्यात आल्या. जानेवारी 2016 मध्ये हे अॅप लाँच करण्यात आलं. 100 व्हेरिफाइड प्रोफाइलसह हे अॅप सुरू झालं आणि बघता बघता ऑनलाइन समाजच तयार झाला.

लवकरच शंकर यांच्या एक गोष्ट लक्षात आली. अॅपवर प्रोफाइल असणारी मंडळी एकमेकांशी व्हॉट्सअप आणि तत्सम मेसेजिंगच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क करत होते. मात्र प्रत्यक्ष भेटणं होत नव्हतं.

"प्रत्यक्ष भेटण्यात खूप साऱ्या अडचणी असल्याचं आम्हाला जाणवलं. सुरक्षितता हा अर्थातच प्रमुख मुद्दा होता. पायाभूत सुविधा, इंटरप्रिटर, कलंक असल्याची भावना अशा अनेक गोष्टी आहेत", असं शंकर आणि कल्याणी यांना जाणवलं.

इनक्लोव्ह अॅपवर नोंदणीकृत असणाऱ्या व्यक्तींसाठी या दोघांनी व्यासपीठ पुरवण्याचं ठरवलं. दिल्लीत गुडगावमधल्या कॅफेत अॅपवरच्या नोंदणीकृत व्यक्तींची अनौपचारिक भेट झाली. त्यावेळी साधारण पाच माणसं होती.

हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर इनक्लोव्हतर्फे देशभरात 50 ठिकाणी अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता, जयपूर अशा शहरांमध्ये उपक्रम राबवण्यात आला. दिल्लीतल्या किट्टी स्यू या नाइटक्लबमध्ये आयोजित उपक्रमाला पन्नासहून अधिक माणसं उपस्थित होती.

"विकलांग माणसांना मनमोकळेपणानं वावरता यावं असं वातावरण तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांना एकमेकांशी बोलता यावं याची काळजी घेतली. असे उपक्रम होतात, अशा ठिकाणी जाता येतं हे त्यांना माहिती करून देण्याचा आमचा प्रयत्न होता. पुढच्यावेळी एकमेकांना भेटण्यासाठी त्यांना इनक्लोव्हची आवश्यकता नाही", असं शंकर म्हणाले.

Image copyright Inclove
प्रतिमा मथळा इन्क्लोव्ह कार्यक्रमादरम्यानची धमालमस्ती

कार्यक्रमाचं स्वरूप दरवेळी बदलतं. हॉटेल्स, कॅफे, समुद्रकिनारे, कराओके, कॉमेडी क्लब्स अशा विविधांगी ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जातो.

अशा स्वरुपाच्या कार्यक्रमांमुळे हॉटेल्स, कॅफेंना विकलांग व्यक्तींच्या गरजा काय असतात याची जाणीव झाली. किट्टी स्यू नाइटक्लबने त्यांच्या सर्व आऊटलेटमध्ये विकलांगांना सहजपणे वावरता यावं अशी रचना केली आहे. विकलांग व्यक्तींना गरज लागल्यास कशी मदत करावी याचं प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

इनक्लोव्हमुळे आयुष्यात बदल झाल्याचं अनेकांनी सांगितलं. माझं व्यक्तिमत्व दिलखुलास आहे. इनक्लोव्हमुळे अनेक जिवलग मित्रमैत्रिणी मिळाल्याचं 27वर्षीय क्रितिका बाली यांनी सांगितलं. इनक्लोव्हतर्फे आयोजित होणाऱ्या उपक्रमांना उपस्थित राहायला आवडेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'अॅपच्या माध्यमातून एकत्र येण्याची संधी मिळते हे चांगलंच आहे. पण यापुढे जाऊन विकलांग व्यक्तींचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी काय करता येईल यावर विचार व्हायला हवा. या अॅपमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास विकलांग व्यक्तींना स्थान मिळत नाही. त्यामध्ये बदल व्हायला हवा', असं 26 वर्षीय श्रेय मारवाह यांनी सांगितलं.

Image copyright Inclove
प्रतिमा मथळा एकमेकांशी गप्पा मारताना

ते पुढे म्हणाले, आताच्या स्वरुपात इनक्लोव्हला मर्यादा आहेत. विकलांग व्यक्तींना अन्य व्यक्तींबरोबर संपर्क कसा वाढवता येईल याचा विचार व्हायला हवा. जेव्हा आता मी चालू लागतो तेव्हा लोक मला परग्रहावरून आल्यासारखं बघतात. आम्हाला सामाजिक मान्यता कशी मिळेत यावर काम व्हायला हवं. सगळ्यांचा जनसंग्रह उपयोगात आणून विकलांगसंदर्भातील धोरणांमध्ये कसा बदल आणता येईल यावरही काम होऊ शकतं'.

मात्र इनक्लोव्ह हे व्यासपीठ एकमेकांशी संपर्क करण्यासाठी आहे, चळवळीसाठी नाही हे शंकर यांनी स्पष्ट केलं.

उपाय हा आमचा विचार आहे. सरकारविरोधात जाणं ही आमची भूमिका नाही. लोकांचा दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे. आम्ही आयोजित करत असलेल्या उपक्रमांतून दृष्टिकोन बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं.

विकलांगांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या निपुण मल्होत्रा यांना हे पटत नाही.

'आपल्या देशात हेच निराशाजनक आहे. विकलांग व्यक्तीला त्याच्या हक्कांसाठी संघर्ष का करावा लागतो? देशात कुठल्याही स्वरुपाचे अल्पसंख्याक असाल तर तुम्हाला चळवळवादी व्हावे लागते. कारण तुमच्यासाठी दुसरं कोणी काहीच करणार नसतं. हे चित्र बदलणं आवश्यक आहे. अनेकदा तर चहा-कॉफी प्यायला एकत्र येणंही पुरेसं ठरू शकतं', असं निपुण यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)