अविश्वास प्रस्ताव : मोदी सरकारच्या बाजूने 325 मतं - पाहा दिवसभरात काय काय घडलं

पंतप्रधान मोदी लोकसभेत बोलताना Image copyright loksabha
प्रतिमा मथळा पंतप्रधान मोदी लोकसभेत बोलताना

तेलुगू देसम पक्षानं नरेंद्र मोदी सरकारविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेत असंमत झाला आहे. सरकारच्या बाजूने 325 तर विरोधकांना फक्त 126 मतं मिळाली आहेत. या मतदानाच्या वेळी लोकसभेत 451 खासदार उपस्थित होते.

याआधी जवळपास 12 तास चाललेल्या कामकाजात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं तर पंतप्रधान मोदींनी त्याला तगडं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

लोकसभेत सध्या भाजपचे 273 खासदार आहेत तर बहुमताचा आकडा 272 आहे. आकडेवारी पाहता या प्रस्तावाचा कौल जवळजवळ आधीच निश्चित मानला जात होता. पण दिवसभर चाललेल्या या चर्चेत राहुल गांधींनी आपल्या भाषणादरम्यान अचानक मोदींजवळ जाऊन मिठी मारली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

पाहा दिवसभरात काय काय घडलं -


11.11 वाजता - अविश्वास प्रस्ताव खारीज

मोदी सरकारच्या बाजूने 325 तर विरोधकांना फक्त 126 मतं, त्यामुळे सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव खारीज

Image copyright LokSabha TV

11.01 - लोकसभेत मतदान सुरू

TDPच्या उत्तरानंतर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी आवाजी मतदान घेतलं. आणि मतदान यंत्राद्वारे मतविभाजन घेण्यात येणार आहे.

Image copyright RSTV
प्रतिमा मथळा लोकसभा सभापती सुमित्रा महाजन
Image copyright YouTube / RSTV
प्रतिमा मथळा लोकसभेत आवाजी मतदान होताना

रात्री 10.52 - तेलुगू देसम पार्टी प्रत्युत्तर देणार?

मोदींच्या तासभराच्या भाषणानंतर अविश्वास प्रस्ताव दाखल करणारे TDP खासदार श्रीनिवास के. सी नेनी यांनी उभं राहून मोदींच्या भाषणाची उपहासात्मक प्रशंसा केली.

Image copyright RajyaSabha TV
प्रतिमा मथळा TDP खासदार श्रीनिवास के. सी नेनी

"मोदींची अॅक्टिंग इतकी जोरदार होती, की ते कदाचित जगातले सर्वांत मोठे अॅक्टर असावेत. 2014च्या आधीही असाच माहोल होता - नुसती भाषणबाजी आणि आश्वासनं, कुठलीच कामं नाही."


रात्री 10.50 - रामचंद्र गुहांना मोदींचं भाषण रटाळ वाटलं

"पंतप्रधान मोदी अमोघ वक्तृत्वासाठी प्रसिद्ध होते. पण अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने त्यांनी केलेलं भाषण अगदीच नीरस आणि कंटाळवाणं आहे. सचिन तेंडुलकरने जेफ्री बॉयकॉटसारखं खेळायचं ठरवल्यावर जसं वाटेल ना, हे अगदी तसंच आहे."


रात्री 10.40 - सीताराम येचुरींचं ट्वीट

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी मोदींच्या भाषणाला विचित्र म्हटलं आहे. "पहिल्यांदाच मी अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणाऱ्या पंतप्रधानांना वास्तवाशी नाळ तुटलेलं पाहिलं. ते आज जे काही बोलत आहेत, त्याचं विरोधकांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबरोबर काही घेणंदेणं नाही."


रात्री 9.20 ते 10.30 - मोदींचं लोकसभेत उत्तर

- "सर्वांनी या प्रस्तावाला फेटाळून लावावं," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. "नकारात्मक राजकारण काही लोकांना घेरलं आहे, त्यांचा चेहरा समोर आला आहे."

- "राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे."

- "लोकशाही जनता भाग्यविधाता असते."

- काँग्रेसनं त्यांच्या स्वार्थासाठी हा अविश्वास प्रस्ताव आणला आहे. पण काँग्रेसला स्वतःवर अविश्वास आहे, ते अविश्वासानं घेरले आहेत. काँग्रेसला देशातल्या लोकांवर विश्वास नाही."

- "आधीच्या सरकारांनी गरिबांसाठी बँका उघडल्या नाहीत."

तेलुगू देसमच्या खासदारांचा गोंधळ, सभापतींसमोरील हौदात घोषणाबाजी. पण पंतप्रधानांनी भाषण सुरूच ठेवलं.

- "काँग्रेसनं 2024मध्ये पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणावा, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. स्थिर जनादेशाला अस्थिर केलं जात आहे."

चीनी राजदूतांना भेटण्याच्या मुद्द्यावरून 'प्रत्येक ठिकाणी बालिशपणा करणार का?' असा सवाल मोदींनी राहुल गांधींना विचारला.

- "शिव्या द्यायच्या असतील तर मोदी हजर आहेत, देशाच्या जवानांना शिव्या देऊ नका," असं मोदी म्हणाले.

- "मी काय कामदार, नामदारांना डोळे दाखवणार? ज्यांनी ज्यांनी काँग्रेसला डोळे दाखवले, ज्यांनी त्यांच्याशी नजर भिडवली, त्यांना काँग्रेसने बाजूला सारलं आहे," असं म्हणत मोदींनी शरद पवारांसह अनेक नेत्यांच्या नावांचा पाढा वाचला.

- "तुम्ही म्हटलं की मी चौकीदार आहे आणि भागीदार. मी चौकीदार आहे आणि भागीदार पण आहे, पण मी ठेकेदार आणि सौदागर नाही."

- "काँग्रेसनं दलित, वंचित, शोषितांना ब्लॅकमेल करून राजकारण केलं."

- "काँग्रेस स्वतः बुडत आहे, त्यांच्याबरोबर जाणाऱ्याचं सुद्धा तेच होणार आहे."

- "तेलुगू देसम आणि YSR काँगेसच्या भांडणात लोकसभेचा वापर केला जात आहे," असं मोदी म्हणाले.


रात्री 9 - पंतपप्रधान हिंदू-मुस्लीमांचे नाही, देशाचे - फारूख अब्दुल्ला

- हिंदु-मुस्लिमांनी एकमेकांची गळेभेट घेतली नाही तर देश टिकणार नाही.


रात्री 8.50 - भाजपला मुस्लीममुक्त भारत हवा आहे? - औवेसी

- औवेसी यांनी नरेंद्र मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.


रात्री 8.11 - अच्छे दिन कब आयेंगे - भगवंत मान

- भगवंत मान हे पंजाबमधल्या संगरूरचे खासदार आहेत. देशात विभाजनाचं राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला


संध्याकाळी 7.58 - भाजपनं आंध्र प्रदेशची फसवणूक केली

तेलुगू देसमच्या राममोहन नायडू यांनी मोदी सरकारवर आंध्र प्रदेशची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे


संध्याकाळी 7.13 - लोकशाही धोक्यात

- तृणमुल काँग्रेसच्या त्रिनेश त्रिवेदी यांनी लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप केला.

- देशात लोकशाही धोक्यात आहे हे मी नाही म्हणत, सुप्रीम कोर्टातल्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे.


संध्याकाळी 6.00 वाजता - कामकाजाची वेळ संध्याकाळी 7 पर्यंत वाढवली

लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी कामकाजाची वेळ संध्याकाळी 7 पर्यंत वाढवली.

- काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाषण सुरू केलं.

- भाजपनं अजूनही लोकपाल कायद्यात बदल करून लोकपालाची नियुक्ती केली नाही.

- काँग्रेसनं जर भाजपसारखा कारभार केला असता तर देशात लोकशाही वाचली नसती.

- खर्गेंनी आपल्या भाषणात संघाचं नाव घेतल्यावरून भाजप खासदारांनी आक्षेप नोंदवला आहे.

दरम्यान, अमूलने आपल्या खास शैलीत आजचा मोदी मिठीचा क्षण टिपला -


संध्याकाळी 4.30 - राजनाथ सिंह यांनी वाचला सरकारच्या कामांची यादी वाचली

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत सरकारच्या यशाचा पाढा वाचून दाखवला. "भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेचं म्हटलं आहे. चार वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर 9व्या स्थानी होती. आता आपला देश चौथ्या स्थानी आहे. 2030 पर्यंत जगातल्या सर्वोत्तम तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होऊ शकतो. जगभरातल्या गुंतवणुकदारांसाठी भारत गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय ठरत आहे. GDPचा वाढीचा दर महागाई दराच्या वर आहे," असं ते म्हणाले.


दुपारी 3.45 - 'भाजप हक्कभंग प्रस्ताव आणणार'

"राहुल गांधी यांनी लोकसभेत आज चर्चेदरम्यान अनेक खोटी आणि दिशाभूल करणारे आरोप केले. त्यामुळे भाजप त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणणार," असं केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनंत कुमार यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

लोकसभेत राजनाथ सिंह यांचं भाषण सुरू.

दरम्यान, बीबीसीचे कार्टूनिस्ट किर्तीश यांचे हे निरीक्षण पाहा -


दुपारी 3.26 - मुलायम सिंह यांनी सरकारला सुनावलं

चर्चेसाठी समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह उभे राहून बोलू लागले. "आम्ही तीन गोष्टींचं निराकरण करण्याची विनंती केली होती - शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी. पण या सरकारने काहीच केलं नाही."

असं ते म्हणाले, "उत्तर प्रदेशमध्येच पाहून घ्या. भाजपचं सरकार आहे इथे पण भाजपवालेच खूश नाही. सगळे रडत आहेत... शेतकरी आणि व्यापारी सर्वांत जास्त त्रस्त आहेत."दुपारी 2.00 - मोदींना मारली 'पप्पू'ने मिठी

तुम्ही मला 'पप्पू' म्हटलं तरी मी तुमचा द्वेष करणार नाही, असं म्हणत राहुल गांधी थेट सरकारी बाकांपर्यंत चालत गेले. त्यांनी अचानक पंतप्रधान मोदींना मिठी मारली.

Image copyright Loksabha TV
प्रतिमा मथळा राहुल गांधींनी मारली मोदींना मिठी

त्यामुळे पंतप्रधान मोदींनाही आश्चर्याचा धक्का बसल्याचं दिसत होतं. मिठी मारून राहुल माघारी निघाले असता मोदींनी त्यांना हाक मारली आणि हस्तांदोलन केलं तसंच हसत हसत राहुल यांच्या पाठीवर हातही ठेवला.


दुपारी 1.45 - सुमित्रा महाजन वैतागल्या

कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच सभापती सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधी यांना सल्ला दिला की सभागृहात नसलेल्या लोकांची नावं घेऊन आरोप करू नका. पुरावे नसताना नाव घेऊन आरोप करू नका, असंही त्या म्हणाल्या.

राहुल गांधी यांच्या भाषणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे की भारतातल्या महिलांना असुरक्षित वाटत आहे, असा दावा राहुल गांधींनी केला. पूर्ण देशातल्या दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत, असंही ते म्हणाले.


दुपारी 1.37 - गोंधळात कामकाज तहकूब

राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या शाब्दिक हल्ल्यामुळे लोकसभेत गदारोळ सुरू झाला. अखेर कामकाज दुपारी 1.45 पर्यंत तहकूब करण्यात आलं.


दुपारी 1.25 - नजरेला नजर द्या - राहुल गांधी

पंतप्रधान मोदी इकडे तिकडे बघत आहेत, पण राफेल विमान प्रकरणी मी बोलत असताना ते माझ्या नजरेला नजर देऊ शकत नाहीयेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे. त्यानंतर लोकसभेत जोरदार गोंधळ सुरू झाला. गोंधळातच त्यांचं भाषण सुरू आहे.

पंतप्रधानांनी देशाच्या सैनिकांना धोका दिला, असा आरोप त्यांनी केला.


दुपारी 01.05 - राहुल गांधी यांचे भाषण सुरू

Image copyright loksabha

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण सुरू. देश 'जुमल्या'मुळे हैराण असल्याचा राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप.

- मोदींनी 2 कोटी रोजगार निर्मितीचं आश्वासन पाळलं नाही.

- जीएसटीमुळे छोट्या व्यापाऱ्यांच नुकसान झालं.

- अमित शहांच्या मुलाचं नाव सभागृहात घेतल्यानं भाजप खासदारांचा गोंधळ.

- राफेल विमानांच्या खरेदीबाबत निर्मला सितारामन यांनी देशाला खोटी माहिती सांगितल्याचा राहुल यांचा आरोप. भाजप खासदारांचा गोंधळ.


दुपारी 12.13 - भाजपचं उत्तर

भाजप खासदार राकेश सिंह यांच्या भाषणाला सुरुवात. राकेश सिंह हे जबलपूरचे खासदार आहेत. अविश्वास प्रस्ताव आणण्याचं कुठलंही ठोस कारण नाहीये, असं सिंग म्हणाले. सिंह यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारनं गेल्या 4 वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला.

राकेश सिंह मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये येत्या डिसेंबरमध्ये निवडणुका आहेत. या राज्यांमध्ये भाजपनं केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी त्यांच्या भाषणात मांडली.

Image copyright LOKSABHA

दुपारी 12.01 - शिवसेनेत गोंधळ?

मतदानाच्या वेळी काय भूमिका घ्यायची, याविषयीचा व्हिप शिवसेनेने जारी केला होता की नाही, यावरून गोंधळ झाल्याची बातमी मराठी वृत्त वाहिन्या देत आहेत.

पण बीबीसी मराठीशी बोलताना खासदार चंद्रकांत खैरे यांनी मात्र हे वृत्त फेटाळलं आहे. त्यांची उचलबांगडी झाली असल्याची बातमी एक वृत्तवाहिनी चालवत आहे; ती खोटी आहे, असंही खैरे म्हणाले.

Image copyright Getty Images

सकाळी 11.40 - शिवसेनेचा पूर्ण बहिष्कार

शिवसेनेच्या खासदारांनी आजच्या पूर्ण कामकाजावर बहिष्कार घातला आहे. शिवसेना चर्चेसाठी जाईल आणि मतदानाच्या वेळी तटस्थ राहील, असं आधी संजय राऊत यांनी जाहीर केलं होतं. पण चर्चा सुरू झाल्यानंतरही शिवसेनेचे खासदार त्यांच्या कक्षाबाहेर पडले नाहीत.

आताचा पक्षाचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी जाहीर केलं आहे की उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांनी बहिष्कार घातला आहे.


सकाळी 11.11 - अविश्वास प्रस्ताव मांडला

Image copyright Loksabha TV
प्रतिमा मथळा जयदेव गल्ला, तेलुगू देसम खासदार

तेलुगू देसम पक्षाचे खासदार जयदेव गल्ला यांनी सरकारवर अविश्वास प्रस्ताव सादर केला. जयदेव गुंटूरमधून निवडून आले आहेत. मोदी सरकार नाकर्ते ठरले आहे, असा आरोप त्यांनी केला. आंध्र प्रदेशातले मुद्दे हे राष्ट्रीय मुद्दे आहेत, असंही ते म्हणाले. मोदी सरकारने आंध्र प्रदेशला सापत्न वागणूक दिली, असा आरोप त्यांनी केला.

आंध्र प्रदेशातल्या भाजप खासदारांनी जयदेव गल्ला यांच्या भाषणाला आक्षेप घेतला. भाजप खासदारांचा गोंधळ घातला.


सकाळी 11.05 - विरोधक संतापले

चर्चा फक्त 5 तासांमध्ये आटोपू नका, जास्तीत जास्त काळ चर्चा होऊ द्या, अशी मागणी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केली. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी वेळ वाढवून द्यायला नकार दिला.


सकाळी 10.45 - शिवसेना तटस्थ

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं की शिवसेना तटस्थ राहणार. त्यापूर्वी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारने लोकांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.


का आणला आहे प्रस्ताव?

या प्रस्तावाचा थेट संबंध आंध्र प्रदेशातल्या राजकारणाशी जास्त असल्याचं बीबीसी तेलुगूचे संपादक राममोहन गोपीशेट्टी सांगतात.

त्यांच्या मते, "निवडणुकांच्या काळात आणि संसदेमध्ये भाजपनं आणि तेलुगू देसमनं वेळोवेळी आंध्रातल्या लोकांना वेगवेगळी आश्वासनं दिली. दिल्लीपेक्षा चांगली राजधानी बनवण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं. पण विशेष राज्याचा दर्जा तर नाहीच, शिवाय आंध्र प्रदेश विभाजन कायद्यातील तरतुदींनुसार मदतसुद्धा देण्यात आलेली नाही. परिणामी लोकांच्या मनात भाजपविरोधात राग आहे."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा तेलुगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू

"निवडणुका जवळ आल्यानं कुण्या एका व्हिलनच्या शोधात तेलुगू देसम पक्ष होता. त्यांना भाजपच्या रूपात तो मिळाला. आता कट्टर भाजप विरोधक कोण, यावरून तेलुगू देसम आणि YSR काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. त्याचाच परिपाक हा अविश्वास प्रस्ताव आहे," असं ते पुढे सांगतात.

"खऱ्या समस्या आणि दिलेल्या आश्वासनांपासून दूर पळण्यासाठी असे हातखंडे वापरले जात आहेत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)