'खड्डे विचारत नाहीत तुम्ही मराठी की गुजराती, ब्राह्मण की मुस्लीम' - मलिष्का

मलिष्का

"खड्डे विचारतात का की, तुम्ही मराठी आहात, गुजराती आहात, ब्राह्मण आहात, मुस्लिम आहात की इतर कोणी आहात? नाही... खड्ड्यांना कधीच जात, धर्म किंवा भाषा नसते," सलग दुसऱ्या वर्षी आपल्या मुंबईतल्या खड्ड्यांवरच्या गाण्यांमुळे चर्चेत आलेली मलिष्का बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होती.

बीबीसी मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत मलिष्कानं या गाण्यामागची प्रेरणा, त्यामुळे सहन करावा लागणारा विरोध, त्या विरोधाला तिची उत्तरं, तिचा प्रवास अशा अनेक गोष्टींवर आपल्या बेधडक आणि बिनधास्त शैलीत उत्तर दिली. या 'बेधडक गर्ल'च्या गप्पांमधून अनेक गोष्टी उलगडल्या.

1. गेल्या वर्षीही तुझं गाणं आलं आणि त्यावरून वाद झाला. यंदा तू पुन्हा एक गाणं प्रसिद्ध केलंस. हे ठरवून झालं की उत्स्फूर्तपणे?

मलिष्का: गेल्या वर्षीही मी असं काही ठरवलं नव्हतं. पण अशी विडंबनात्मक गाणी जवळ जवळ दर दिवशी बनत असतातच. पण मला बीबीसीशी बोलताना एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या रेडिओवरच्या करिअरची सुरुवात झाली तीच पावसात! मी 1 ऑगस्ट 2005 या दिवशी पहिल्यांदा रेडिओ जॉकी म्हणून कामाला सुरुवात केली. 26 जुलैचा मुंबईतला पाऊस पडून फक्त पाचच दिवस उलटले होते. तुम्ही नवीन शो सुरू करता, तेव्हा तुम्ही त्या शोमध्ये काय करणार, हेच सांगत असता. पण माझ्या पहिल्यावहिल्या शो चे पहिले काही दिवस मुंबईकरांना 'तुम्ही काय करा, काय करू नका,' हे सांगण्यातच गेले होते. म्हणून मी 'पावसाची मुलगी' आहे.


मुंबईच्या खड्ड्यांबद्दल मलिष्काला दोन वर्षांत दोन व्हायरल गाणी कशी सुचली? हा पब्लिसिटी स्टंट आहे की खरी तळमळ? मलिष्काला या सगळ्याबद्दल काय वाटतं? ऐका तिच्याच तोंडून.


या वर्षी काय, गेल्या वर्षीही मला गाणं बनवायची इच्छा नव्हती. पण झालं असं की, पावसाची सुरुवात होण्याआधी मी सगळ्या अधिकाऱ्यांना माझ्या शोमधून फोन करून 'आपण पावसाळ्यासाठी तयार आहोत का' असं विचारते. या वेळीही मी सगळ्यांना फोन केला होता. सगळ्यांनी सांगितलं की, हो, आपण तयार आहोत. पण मग झालं काय त्या तयारीचं? आता पाऊस आल्यावर समजलं की, आपली तयारी झालेली नाही. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवर लोक अडकले आहेत. पूल पडले, झाडं पडली. खड्ड्यांमुळे लोकांचे मृत्यू झाले.

हे असं का होतं? गेल्या वर्षीही काही जण खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडले होते. त्या वेळी अनेकांनी कारणं दिली की, त्या लोकांनी हेल्मेट घातलं नव्हतं. ही अशी कारणं तुम्ही देता? ही गंभीर समस्या आहे. लोकांचीही जबाबदारी आहेच की! आम्ही ती नाकारत नाही. कर भरा, प्लॅस्टिक वापरू नका, रस्त्यांवर थुंकू नका, हे सगळं आम्ही करतोच. पण रस्त्यांवर खड्डे पडले, तर आम्ही काय करणार?

खड्डे का पडतात, याची अनेक कारणं लोकांकडे आहेत. मी ती ऐकली आहेत. अनेक अधिकारी तर बिनधास्त सांगतात की, खड्डे नाहीतच! म्हणजे एकीकडे सर्वसामान्य मुंबईकरांपैकी कोणीतरी मला फोनवर सांगत असतो की, 'मलिष्का, मी आता अमुक अमुक ठिकाणी अडकलोय. खड्ड्यांमुळे प्रचंड ट्रॅफिक जॅम आहे' आणि दुसरीकडे हे अधिकारी म्हणत असतात, खड्डेच नाहीत.

Image copyright Getty Images

यंदाही तेच झालं. शेवटी लोक मला विचारायला लागले, या वर्षीच्या गाण्याचं काय म्हणून. गाण्यांनी खड्डे भरतात का, अशी टीकाही माझ्यावर होते. मला माहिती आहे की, गाणी केल्यानं खड्डे भरत नाहीत. पण किमान त्या खड्ड्यांबद्दल चर्चा तर होते. जोपर्यंत खड्डे आहेत, हे आपण स्वीकारत नाही, तोपर्यंत ते भरायला हवेत, असंही आपल्याला वाटणार नाही.

मी गाणं बनवते, तेव्हा ते गाणं विनोदी असतं. मला वाटतं की, शिव्यांपेक्षाही एखादा विनोद जास्त खोलवर वार करतो. या गाण्यामुळे तेच झालं. मला वाटतं की, मीच नाही तर इतरांनीही पुढे येऊन टीका करायला हवी. हे माझं गाणं नाही. हे तर मुंबईकरांचं गाणं आहे.

2. गेल्या वर्षीच्या गाण्यानंतर तुझ्यावर खूप टीका झाली होती. या वर्षीही टीका होईल असं वाटतं का आणि ती सहन करायची तयारी आहे का?

मलिष्का: तयारी आहे का? हो आहे ना, यंदा मी माझ्या घरातल्या डासांच्या अळ्या साफ केल्या आहेत. (मलिष्काचं नेहमीचं हास्य)

3. सध्या सोशल मीडियावर एक जोक फिरतोय... गेल्या वर्षीच्या गाण्यानंतर अधिकाऱ्यांना मलिष्काच्या घरात डासाच्या अळ्या सापडल्या होत्या. या वर्षी तर बहुतेक डायनॉसॉरची अंडीच मिळतील!

मलिष्का: काही जणांनी मला असंही म्हटलं होतं की, आता तुझ्या घरात त्यांना प्लॅस्टिक सापडेल. पण या सगळ्यांना मला सांगायचं आहे की, मी मुंबईसाठी 'मुंबईची प्लॅस्टिक सर्जरी' अशी मोहीम राबवली होती. मुंबईकरांनी त्यांच्या घरातलं प्लॅस्टिक आमच्याकडे जमा करावं, असं आवाहन मी त्यांना केलं होतं. लोकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. आम्ही एक ट्रकभरून प्लॅस्टिक पुण्याला पाठवलं. तिथे प्लॅस्टिकचं पॉलिफ्युएल बनवलं होतं. सांगायचं कारण की, या वर्षी माझ्या घरात प्लॅस्टिक नाही.

खरं तर गेल्या वर्षीही माझ्या घरात अळ्या असल्याचा कोणाताही पुरावा नव्हता. फक्त एवढंच झालं की, माझ्या घरचा पत्ता सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला. त्या गोष्टीचा मला खूप त्रास झाला होता. अळ्या सापडल्या म्हणून कोणाच्या घराचा पत्ता जगजाहीर केला जात नाही. माझ्या बाबतीत ते झालं.

4. काही मुंबईकर तुझ्यावर टीका करतात, तुला कसं वाटतं?

मलिष्का: मला नक्कीच राग येतो. पण मी दुर्लक्ष करते आणि लोकांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करते. कारण जे मुंबईकर खड्ड्यांमुळे कुठेतरी अडकतात, ज्यांनी खड्ड्यांमुळे आपले नातेवाईक गमावले आहेत, ज्यांना त्रास होतो, ते कधीच माझ्यावर टीका करणार नाहीत. मग टीका कोण करतं? ज्यांच्याकडे हेलिकॉप्टर आहे, जे कधी रस्त्यांवरून जातच नाहीत, ते टीका करतात. मी त्यात येत नाही. माझे सर्वसामान्य मुंबईकरही त्या गटात मोडत नाहीत. माझी मुंबई अठरापगड आहे. खड्डे ही सगळ्यांसाठीच डोकेदुखी आहे. त्यासाठी तुम्ही गाणं बनवणाऱ्यांच्या मागे लागू नका. त्यांच्यावर टीका केलीत, तर रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत, याची तरी काळजी घ्या.

Image copyright Hindustan Times via Getty Images

गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या टीकेत मला थोडा फरक जाणवतो. गेल्या वर्षी लोक माझ्या घरावर मोर्चे काढायच्या चर्चा करत होते. यंदा त्यांनी काही मीम्स तयार केले आहेत. त्यापैकी एकात त्यांनी बेडुक, खेकडे, गोगलगाय आणि माझा फोटो टाकलाय. त्याला त्यांनी कॅप्शन दिली आहे की, पावसाळ्यात बाहेर येणारे जीवजंतू! हे मस्तच आहे. हे असं नक्की करा. पण खड्डे बुजवा ना, म्हणजे निदान मलिष्का नावाचा जीवजंतू दरवर्षी पावसाळ्यात बाहेर येणार नाही.

5. लोक म्हणतात की, टीका करणं सोपं आहे. पण खड्ड्यांचा प्रश्न सोडवायला काय करायला पाहिजे?

मलिष्का: हे मी सांगायला हवं का? म्हणजे यातून काय मार्ग काढायचा, हे आता मी सांगायला हवं का? तुम्ही मला त्या अधिकारपदावर बसवणार आहात का? माझा मुद्दा एवढाच आहे की, माझं काम आहे लोकांचं मनोरंजन करणं! पण पावसात मला मनोरंजन करताच येत नाही. कारण लोक खड्ड्यांमुळे रस्त्यांवर अडकले असतात, कुठे पूल पडतो. मी त्या वेळी त्यांचं मनोरंजन करू शकत नाही ना.

या पुढची पायरी काय, तर हे कुठेतरी बोलावं, कोणीतरी ही व्यथा मांडावी. न्यूज चॅनल किंवा वर्तमानपत्रं या बातम्या सातत्याने देतच असतात. माझ्या आताच्या गाण्यातही आम्ही सगळे फोटो टाकले आहेत. गेली अनेक वर्षं या बातम्या येत आहेत. माझं गाणं आल्यानंतर लोकांना त्यात मुंबईची अब्रू गेल्यासारखं वाटतं. मग या बातम्या काय जगभरात पोहोचत नाहीत का? या बातम्यांमुळे मुंबईची इज्जत वाढते का? उलट ती दररोज चव्हाट्यावर येते. मी कदाचित विनोद हे माध्यम घेऊन काम करते म्हणून लोकांना जास्त झोंबत असावं.

Image copyright Hindustan Times via Getty Images

राजकीय इच्छाशक्ती ही एक गोष्ट आहे. मुंबईतल्या सगळ्याच गोष्टींसाठी एकच यंत्रणा जबाबदार नाही, हे आपण मान्य करू. पण मग लोकांनी बघायचं कोणाकडे? या सगळ्याचं उत्तरदायित्त्व कोणाचं आहे? मुंबईकरांनी नेमके कोणाला प्रश्न विचारायचे? आधी तुम्ही खड्डे आहेत, हे मान्य करा. लोक म्हणतात गेल्या वर्षीपेक्षा कमी आहेत. पण लोक आजही मरत आहेत.

मला वाटतं, अधिकाऱ्यांनी किंवा माझ्या गाण्यावर टीका करणाऱ्या जबाबदार लोकांनी पुढे येऊन मुंबईकरांना विश्वासात घेऊन अनेक गोष्टी सांगितल्या पाहिजेत. खड्डे का पडतात, ते दुरुस्त करण्यासाठी ते काय करतात, पुढील योजना काय आहे, आम्ही मुंबईकर काय करू शकतो, हे त्यांनी मोकळेपणे सांगितलं पाहिजे. मी अनेकदा त्यांना माझ्या शोमध्येही विचारते की, आम्ही काही करू शकतो का? कारण हे माझं शहर आहे आणि ती जबाबदारी माझीही आहे.

6. तुझं मराठी हासुद्धा अनेकांच्या कौतुकाचा आणि टीकेचाही विषय आहे. तुझी शाळा मराठी होती, शाळेत मराठी विषय होता, आवडायचा... नेमकं काय?

मलिष्का: मला मराठी खूप आवडायचं. मी कधी गृहपाठ केला नाही. त्या बद्दल शिक्षकांनी मला एकदा पट्टीही मारली होती. तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. माझं मराठी चांगलं आहे, मला सगळी उत्तरं येतात, मला विचारा. पण मला लिहायचा कंटाळा यायचा. मला भाषा आवडायच्या आणि मराठीत तर मला माझ्या वर्गात सगळ्यात जास्त मार्क मिळायचे. दहावीतही मला सगळ्यात जास्त मार्क मराठीत होते.

मी लहानपणापासून बंडखोर आहे. पण ती बंडखोरी एका चांगल्या कारणासाठी असते आणि मी माझं हत्यार म्हणून विनोदाचा वापर करते. मला राग येतो, पण मी माझा राग योग्य ठिकाणी व्यक्त करायला शिकले आहे. मला वाटतं की, बदल घडवण्यासाठी काही लोकांनी एकत्र येऊन हिंमत करून पुढे यायला हवं. ही बंडखोरी काही जग बदलण्यासाठी नसते, तर मला स्वत:ला एक चांगली व्यक्ती बनवण्यासाठी असते. त्यातून लोकांचंही आयुष्य बदलतं.

7. धडक प्रदर्शित होत आहे आणि त्याच वेळी तुझं गाणं येतंय. हा प्रसिद्धीचा तर भाग नाही ना?

मलिष्का: अजिबात नाही. मी म्हटलं तसं, मला अजिबात गाणं बनवायचं नव्हतं. पण जेव्हा बनवायचं ठरवलं, तेव्हा नेमक्या याच गाण्याची चाल डोक्यात आली. झिंगाट गाजतंय आणि धडकमध्ये ते आहे कारण ते गाजलंय. ते लोकांच्या लक्षात आहे. आम्हाला आमचं गाणंही लोकांच्या लक्षात राहावं, असंच वाटत होतं.

मला काय प्रसिद्धी मिळणार? माझं चांगलं चाललंय. दर दिवशी रेडिओवर असते, मी एका चित्रपटात काम केलं, टीव्ही शो केला, माझं आयुष्य मी जगतेय. मुंबईत माझी एक ओळख आहे. मला यातून काही पैसा मिळत नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.

लोकांना ही मजा वाटते. पण ही मजा नाही. आमच्या रेडिओ स्टेशनला दर दिवशी फोन येतात. लोक टीका करतात. माझ्यावर टीकेची राळ उठते. धमक्या येतात. लोकांना हे काहीच दिसत नाही. लोकांना असं वाटत असेल की, हे प्रसिद्धीसाठी केलं आहे, तर मी त्यांना सांगेन की, पुढच्या वर्षी तुम्ही असं एखादं गाणं बनवा आणि बघा किती प्रसिद्धी मिळते ते!

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)