#5मोठ्याबातम्या : राफेल प्रकरणी राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग आणण्याची तयारी

राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग Image copyright EPA

पाहूयात आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्वाच्या बातम्या.

1. राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग आणण्याची तयारी

राफेल व्यवहाराबाबत राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं सांगत भारतीय जनता पक्ष त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाणार असल्याचं वृत्त लोकमतनं दिलं आहे.

मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी राफेल कराराविषयी भाष्य केलं. संरक्षणमंत्र्यांवर खोटे आरोप करून, राहुल गांधी यांनी संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षांची माहिती चुकीची आहे. हे दुर्दैव असल्याचं सांगत संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केला जाणार असल्याचं सांगितलं.

राफेल कराराबाबत राहुल गांधी यांनी केलल्या वक्तव्यावर फ्रान्सनं निवेदन प्रसिद्ध केलं आहे. भारत व फ्रान्स यांनी गोपनीय माहिती उघड न करण्याची हमी त्या सुरक्षाविषयक करारात असल्याचं त्यात म्हटलं आहे.

2. भायखळा तुरुंगातील 81 महिला कैद्यांना संसर्ग

पोटदुखी, उलटी आणि अतिसाराचा त्रास सुरू झाल्यानं भायखळा तुरुंगातील तब्बल 81 महिला, एक पुरूष कैदी आणि चार महिन्यांचं एक बाळ यांना शुक्रवारी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Image copyright UNKNOWN

लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार, या सर्वांना पावसाळ्यातील आजारांचा संसर्ग झाल्याचं स्पष्टीकरण जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलं.

भायखळा तुरुंगात बंदी असलेल्या काही महिलांना गुरूवारी रात्रीपासूनच पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास होऊ लागला. रात्री तुरुंगातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. पण सकाळपर्यंत अनेकांची प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या रुग्णालयात या सर्वांवर उपचार सुरू असल्याचं प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी सांगितलं.

3. चार दिवसांत 40 लोकांनी बलात्कार केल्याचा आरोप

चार दिवसात चाळीस लोकांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप चंदीगड येथील 21 वर्षीय महिलेनं केला आहे.

Image copyright Getty Images

द इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, पंचकुला जिल्ह्यातील मोरणी हिल्स परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये आपल्याला डांबून ठेवण्यात आलं होतं. या दरम्यान दोन पोलिसांसह 40 लोकांनी आपल्यावर बलात्कार केल्याची माहिती या महिलेनं दिलं. पोलिसांनी या प्रकरणात मोरणी इथल्या लव्हली गेस्ट हाऊसचे मालक सुनिल आणि अवतार सिंग यांना अटक केली आहे.

या दोघांनी आपल्याला गेस्टहाऊसमध्ये नोकरीवर ठेवण्याचं आमीष दिलं होतं. तिथं चार दिवस डांबून ठेवण्यात आलं. या विवाहीत महिलेनं 18 जुलैला आपली सुटका करून घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली.

4. खड्डे बुजवण्याची जबाबदारी कोणाची?- हायकोर्ट

मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यांवरील खड्डे आणि खराब झालेला रस्ता यासाठी जबाबदार कोण आहे आणि खड्डे बुजवण्याची जबाबदारी कोणाची आहे, असा सवाल मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला केला.

Image copyright twitter

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, मुंबई हायकोर्टात मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांविषयीची जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

हायकोर्टानं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन हा महामार्ग कोणाच्या अखत्यारीत येतो आणि रस्त्यावरील खड्डे बुजवून तो रहदारीयोग्य बनवण्याची जबाबदारी कोणाची आहे, हे राज्य सरकारच्या वकिलांना विचारलं. याविषयी राज्य सरकारकडून सोमवारी स्पष्टीकरण मागितले आहे.

5. मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजा न करू देण्यावर आंदोलक ठाम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची पूजा न करू देण्याच्या पवित्र्यावर मराठा क्रांती मोर्चा ठाम आहे.

Image copyright Hindustan Times / Getty Images
प्रतिमा मथळा मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचं 'दुसरं पर्व' सुरू झाल्याची घोषणा तुळजापुरात केली.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, शासकीय महापूजेस मराठा समाजाने विरोध केल्यानंतर यावर मार्ग काढण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख हे आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणार होते.

पण या चर्चेवर मराठा क्रांती मोर्चाने बहिष्कार टाकला. आपण कोणत्याही परिस्थितीत आता चर्चा करणार नसल्याचं मराठा समाजाचे शंकर सुरवसे आणि धनगर समाजाच्या माऊली हळवणकर यांनी सांगितलं. महापूजेसाठी प्रशासन सज्ज असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा होणार असल्याचं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)