सोशल : 'शांत मोर्च्यांची दखल न घेतली गेल्यानं मराठा मोर्चे आक्रमक झालेत'

मराठा मोर्चा Image copyright Getty Images

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. सोलापूर, औरंगाबाद आणि लातूरमध्ये ठिय्या आंदोलनं करण्यात आली. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागत बस फोडल्याचं वृत्तही आहे.

शांतता मोर्चाच्या मार्गाने जाणारं हे मराठा आंदोलन आता आक्रमक होत आहे का, असा प्रश्न आम्ही वाचकांना विचारला.

वाचकांच्या आलेल्या प्रतिक्रियांपैकी या आहेत काही निवडक आणि संपादित प्रतिक्रिया -

"शांततेत मोर्चे काढले तर दखल घेत नाही, आक्रमक मार्गानं केलं तर नुकसान होतं म्हणता, मग न्याय मागायचा तरी कसा," असा सवाल गणेश लटके यांनी केला आहे.

Image copyright Facebook

"शांततेच्या मार्गानं गेले अनेक दिवस मोर्चे काढले पण सरकारनं दखल घेतली नाही, म्हणून आता मोर्चे आक्रमक होत आहेत," असं चक्रपाणी नेवासे म्हणतात.

Image copyright Facebook

"मोर्चे शांततापूर्ण मार्गानं होत होते आणि मागण्या वास्तव होत्या तोपर्यंत जनतेची सहानुभूती होती. आता सर्व मागण्या मंजूर होऊनही मोर्चे निघत आहेत, त्यामुळे जनतेच्या मनात चीड निर्माण झाली आहे. याची मोर्चेकऱ्यांना कल्पना आल्यामुळे त्यांनी हिंसक मार्ग स्वीकारला आहे," असं दामोदर देशमुख यांनी म्हटलं आहे.

Image copyright Facebook

प्रतीक दगडे यांनी मात्र ट्वीटरवर त्यांच्या प्रतिक्रियेत एक सल्ला दिला आहे. ते म्हणतात की, "मंत्रालयासमोर जाऊन हे करायला हवं. मंत्र्यांना जाब विचारायला हवा, सामान्य माणसाला त्रास होईल, अस कशाला वागता?"

Image copyright TWITTER

"मराठा आरक्षणासाठी मराठा आमदारांना जाब विचारायला हवा," अशी ओमकार पवार यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया दिली आहे तर योगेश चौधरी यांनी "सरकारकडे मॅनेजमेंट नावाची गोष्ट नाही," असं म्हटलं आहे.

Image copyright FACEBOOK

राजेंद्र निरहाळी यांनी म्हटलं आहे की, "सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्यास ते भरून काढण्यासाठी महागाई वाढेल आणि त्याचा सर्वांनाच फटका बसेल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)