राजस्थान : अलवरमध्ये गोरक्षणाच्या नावाखाली अकबरला ठेचून मारलं

गायींचा कळप Image copyright Getty Images

राजस्थानातल्या अलवरमध्ये कथित गोरक्षकांनी पुन्हा एकदा एका व्यक्तीला जबर मारहाण करत त्याची हत्या केली आहे. मूळचा हरयाणा इथल्या नूँह इथे राहणाऱ्या अकबर याला जमावानं बेदम मारल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येच्या आरोपांमध्ये दोन जणांना अटक केली आहे.

राजस्थानातल्या अलवरमध्ये कथित गोरक्षकांकडून मारहाण होऊन एखाद्याचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे.

गेल्या वर्षी पहलू आणि उमर या दोघांच्या गोरक्षकांकडून हत्या झाल्या होत्या. मुस्लीम मेव समुदायानं या घटनांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

या घटनेनंतर AIMIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी यावर प्रतिक्रिया देताना मोदी सरकारवर हल्ला केला आहे. ओवेसी म्हणतात, "गाय या प्राण्याला संविधानातील अनुच्छेद 21 नुसार जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. पण, एका मुसलमानाला मात्र मारता येऊ शकतं, कारण त्यांना 'जगण्याचा' नैतिक अधिकार नाही. मोदी सरकारची चार वर्ष म्हणजे लिंच-राज."

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या घटनेची निंदा केली आहे आणि दोषींच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अकबरचा मृतदेह जेव्हा शनिवारी त्याच्या मूळगावी कोलगाव इथे पोहोचला तेव्हा संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. या कोलगावातले इस्काह अहमत सांगतात, "त्याची मुलं आणि वृद्ध आई-वडील यांचा आधारच निघून गेला आहे."

केव्हा, कुठे आणि कशी केली हत्या?

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, अकबर शुक्रवारी मध्य रात्री दोन गायींना घेऊन चालत हरयाणाला निघाला होता. त्यावेळी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. अकबरसोबत यावेळी अस्लम नावाची व्यक्तीही होती. अस्लमने पळून जाऊन आपला जीव वाचवला. मात्र, जमावानं गायींचा तस्कर समजून अकबरला जोरदार मारहाण केली. यात हॉस्पीटलमध्ये घेऊन जातानाच अकबरचा मृत्यू झाला.

जयपूर पोलीस क्षेत्राचे अतिरिक्त महासंचालक हेमंत प्रियदर्शी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे या घटनेची माहिती दिली आहे. या पत्रकानुसार, इथल्या रामगड पोलीस ठाण्याला अर्ध्या रात्री सूचना मिळाली की, दोन जण गायींची तस्करी करुन चालले आहेत.

Image copyright Getty Images

या माहितीवरुन पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा अकबर जबर जखमी अवस्थेत पडलेला त्यांना आढळला. त्याने स्वतः पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि सांगितलं की, त्याला गायींचा तस्कर समजून मारहाण करण्यात आली आहे.

पोलिसांनी अकबरला हॉस्पीटलमध्ये नेलं, पण तिथे डॉक्टरांनी अकबरला मृत घोषित केलं.

घटनेची माहिती मिळताच मुस्लीम मेव समुदायाचे लोक हॉस्पीटलमध्ये जमले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला.

या घटनेची माहिती मिळताच अकबरच्या घरातले लोकसुद्धा हॉस्पीटलमध्ये पोहोचले. पोलिसांनी समजावल्यावर अकबरचे नातेवाईक पोस्टमार्टमला तयार झाले.

मोदी आणि कोर्टाचंही ऐकत नाही गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारीच लोकसभेत अशा घटनांवर चिंता व्यक्त केली होती आणि राज्यांना अशा घटना रोखण्याचं आव्हान केलं होतं.

Image copyright Getty Images

त्याआधीच सुप्रीम कोर्टानंही राज्यांना अशा जमावानं हत्या करण्याच्या घटना रोखण्यासाठी पावलं उचलण्याचे निर्देश दिले होते.

'प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अकबरचा मृत्यू'

अलवरमध्ये हॉस्पीटलच्या बाहेर असलेल्या लोकांमध्ये उपस्थित असलेले मौलाना हनीफ सांगतात, "पहलू खान प्रकरणात कडक कारवाई केली असती तर उमर गेला नसता. उमरच्या हत्येनंतर प्रशासनाकडून कडक धोरण अवलंबलं गेलं असतं तर अकबर कदाचित वाचला असता. पण, या घटनांनंतर भीती वाढू लागली आहे. या दुःखाच्या दिवसांत बहुसंख्याक समाजाचे लोक आमच्या बाजूनं उभे आहेत हीच आमची जमेची बाजू आहे."

कोलगावातले इस्काह सांगतात, "अकबरची पत्नी आणि मुलांचे हाल बघवत नाहीत. अकबरला 7 मुलं आहेत. आमचं गाव संमिश्र लोकसंख्येचं गाव आहे. या कुटुंबाच्या सांत्वनासाठी सगळ्या वर्गातले लोक आले आहेत. अकबरच्या घरात सरकारी योजनेअंतर्गत बनलेली एक पक्की खोली आहे. बाकी घर कच्चं आहे."

इस्काह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकबरचे वडील दूध विकतात आणि त्यांची दूध डेयरी आहे. गेल्या काही काळापासून अकबर त्याच्या वडीलांचं काम सांभाळत आहे. याच कामासाठी तो गाय खरेदी करण्यासाठी गेला होता.

मुस्लीम मेव समुदायाचे सद्दाम सांगतात, "मेव समुदायाचे लोक पशुपालन आणि शेती करुन पोट भरतात. सरकारी आकड्यांनुसार, अलवर जिल्ह्यांत दोन लाखांहून अधिक गोधन आहे. हे क्षेत्र मेवाड प्रांताचा भाग असून त्याचा विस्तार हरयाणापर्यंत आहे."

Image copyright MANSI THAPLIYAL

गोरक्षकांकडून पहलू खानची हत्या झाल्यानंतर मानवाधिकार संघटनांनी सरकारची कडक शब्दांत निंदा केली. पोलिसांनी पहलू खान प्रकरणांत 9 लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, यातील 6 जणांविरोधात ठोस पुरावे न मिळाल्यानं त्यांची सुटका झाली.

राजस्थानात गेल्या पाच दिवसांत कथित गोरक्षकांच्या हातून जागेवरच निवाडा करण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी कोटामध्ये कथित गोरक्षकांनी मध्यप्रदेशात दूधाची डेयरी चालवणाऱ्या प्रविण पंडित आणि त्यांचा ड्रायव्हर अहमद यांना घेरुन मारलं होतं. प्रविण त्याच्या दूध व्यवसायासाठी जयपूरहून गाय खरेदी करुन देवासला घेऊन चालले होते.

प्रविणने यावेळी स्वतः जातीनं ब्राह्मण असल्याचंही जमावाला सांगितलं. मात्र, कथित गोरक्षकांनी कोणतीही दया दाखविली नाही. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)