#5मोठ्याबातम्या: 'तालिबानी हिंदू' भाजप चालवत आहेत- ममता बॅनर्जी

प्रातिनिधिक छायाचित्र Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

पाहूयात आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्वाच्या बातम्या.

1. 'तालिबानी हिंदू' भाजप चालवत आहेत- ममता बॅनर्जी

भारतीय जनता पक्ष गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं झुंडशाहीला प्रोत्साहन देत असल्याचं सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या नेतृत्वाचं वर्णन 'तालिबानी हिंदू' असं केलं आहे.

द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला करत त्यांच्या हाताला दंगलीच रक्त लागलं असल्याचा आरोप केला. ते स्वतःला हिटलर आणि मुसोलिनीपेक्षाही जास्त शक्तिशाली हुकूमशाह समजतात असा आरोपही केला.

भाजप सरकारनं लोकसभेत अविश्वास ठराव फेटाळला असला तरी संसदेबाहेर त्यांना बहुमत मिळणार नाही. पुढच्या वेळेस भाजप सत्तेतून बाहेर पडलेला असले, असं त्या म्हणाल्या.

कोलकाता इथं ममता बॅनर्जी यांनी 19 जानेवारीला सर्व विरोधी पक्षांची महा रॅली आयोजित करणार असल्याची घोषणा केली. ही रॅली आघाडीची सुरूवात असेल असं त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांच्या घोषणेनंतर भाजपनंही तत्काळ सभेची घोषणा केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी, 23 जानेवारीला कोलकातामध्ये पंतप्रधानांची सभा जाहीर केली आहे.

2. विरोधी पक्षांची दलदल, कमळ फुलणार - नरेंद्र मोदी

जर एका दलात दुसरे दल मिळवले तर दलदल तयार होते. पण ती कमळाला उपकारक असते, कारण चिखलातून कमळच फुलणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Image copyright Getty Images

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील किसान कल्याण सभेत ते बोलत होते. राहुल गांधी यांनी मारलेली मिठी ही बळजबरीने गळ्यात पडणं होतं असंही ते म्हणाले.

विरोधकांचा डोळा फक्त खुर्चीवर असल्याचं म्हणत त्यांनी काल संसदेत डे घडले ते पाहून तुम्ही समाधानी आहात का, असा प्रश्नही सभेत विचारला.

दुसरीकडे मुंबईत आयोजित राष्ट्रवादीच्या मार्गदर्शन शिबिरात माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी राहुल गांधी यांनी घेतलेल्या गळाभेटीचं कौतुक केलं. राहुल गांधी यांच्या मनात कुठलाही आकस नसल्यानं त्यांनी ती गळाभेट घेतली असं पवार म्हणाले.

3. सॅनिटरी पॅडला GSTमधून वगळलं

सॅनिटरी नॅपकिनला जीएसटीतून सूट देण्याच्या एक वर्षापासून सुरू असलेल्या मागणीला जीएसटी परिषदेच्या बैठकीत शनिवारी मंजुरी देण्यात आल्याचं वृत्त लोकमतने दिलं आहे.

Image copyright BODYFORM

या बैठकीत 88 वस्तूंवरील कराचे दर कमी करण्यात आले आहेत. यात टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, विजेवर चालणारे घरगुती उपकरणं आणि अन्य उत्पादनांचा समावेश आहे. सॅनिटरी नॅपकीन व्यतिरिक्त राखी, हस्तकला, स्टोन, मार्बल, लाकडी मूर्ती, फूलझाडू, सालपत्ते आदी वस्तूंवर यापुढे कोणताही कर लागणार नाही. हस्तकलेद्वारे निर्मित छोट्या वस्तूही करातून पूर्णपणे वगळण्यात आल्या आहेत.

4. मुंबईसह राज्यात जाणवू शकतो भाजीपाला तुटवडा

देशव्यापी संपामुळे सलग दुसऱ्या दिवशी जवळपास सर्वप्रकारची मालवाहतूक, प्रवासी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.

Image copyright Pravin Thakare
प्रतिमा मथळा काही दिवांसपू्र्वीच दूध आंदोलनामुळे तुटवडा निर्माण झाला होता.

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने पुकारलेल्या या बेमुदत संपात सोमवारपासून अत्यावश्यक सेवा पुरवठादारही स्वेच्छेनं सहभागी होणार असल्याचा दावा केला जात आहे.

त्यामुळे सोमवारनंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात दूध, भाजीपाल्यासह अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा हळूहळू बंद होत जाईल, अशी भीती व्यक्त केली जात असल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे. या संपाच्या दुसऱ्या दिवशी मालवाहतूक क्षेत्राचं सुमारे आठ हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं दावा संघटनेतर्फे करण्यात आला आहे.

5. भारतात iPhone होऊ शकतो बंद?

TRAIने iPhone युजर्ससाठी डू-नॉट-डिस्टर्ब (DND) ऍपचे नवे वर्जन DND 2.0 ऍप डिजाइन केलं. पण Apple कंपनीनं अद्याप त्याचा समावेश आपल्या प्लेस्टोअर यादित केलेला नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आयफोन

NDTVने दिलेल्या वृत्तानुसार, TRAIने त्यांच्या अॅपकरिता यूजर्सचे कॉल्स आणि मॅसेजेस रेकॉर्ड करण्याची परवानगी मागितली आहे आणि Apple वाटतं की यामुळे iPhone यूजर्सची गोपनीयता सुरक्षित राहत नाही. iPhone यूजर्ससाठी आम्ही स्वतंत्र (DND) अॅप तयार करतो असे कंपनीचं म्हणणं आहे. फेक कॉल्स आणि स्पॅम मॅसेजेसवर लगाम लावण्यासाठी TRAIने दूरसंचार कंपन्यांसाठी नवी नियमावली तयार केली आहे.

TRAIने तयार केलेलं अॅप हे अँड्राइडवर आलं असलं तरी Appleच्या प्ले स्टोअरमध्ये अद्याप त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. TRAIने तयार केलेल्या DND 2.0 अॅपचा समावेश Appleने आपल्या प्ले स्टोअरमध्ये करावं असं TRAIला वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)