मी 22 वेळा माउंट एव्हरेस्ट सर केलंय आणि ही आहे माझी कहाणी

Image copyright Kami Rita Sherpa Archive
प्रतिमा मथळा कामी रीता शेर्पा

नेपाळच्या खुंबू भागातील सोलुखुंबू जिल्ह्यातील थामे हे आमचं गाव. दगडांनी तयार केलेल्या अवघ्या 45 घरांच्या याच गावात खुंबू भागातील सर्वांत जुना बौद्ध मठ आहे.

थामे हे शिखर चढाई करणाऱ्या शेर्पांचं गाव म्हणून ओळखलं जातं. 1953मध्ये सर एडमंड हिलरी यांच्यासोबत चढाई करणारे शेर्पा तेनसिंग नोर्गे आणि 21 वेळा एव्हरेस्टवर चढाई केलेले आपा शेर्पा हेसुद्धा थामे गावचेच रहिवासी.

माझं बालपण अगदीच सामान्य होतं. डोंगराळ भागातील आमचं गाव खूप मागास होतं. तीन मोठ्या बहिणी, तीन लहान बहिणी, एक मोठा भाऊ आणि आई-वडील, असे एकूण दहा जण आम्ही एका छोट्याशा घरात राहायचो.

थामे गावातच चौथीपर्यंत माझं शिक्षण झालं. पुढे शिकू शकलो नाही कारण घरची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. शिवाय, मलाही अभ्यासात फारसा रस नव्हता.

गिर्यारोहण हाच आमचा खेळ

लहाणपणी मी हुशार, चुणचुणीत आणि मस्तीखोर होतो. आमचा बराचसा वेळ गावभर धावणं, दगडांवर, छोट्या टेकड्यांवर चढणं, यातच जायचा. खरंतर तेच आमचे खेळ होते. फुटबॉल, व्हॉलीबॉल असे खेळ आम्हाला माहितच नव्हते. आम्ही ते कधी पाहिलेसुद्धा नाहीत.

मी लहान असताना मला बौद्ध भिख्खू व्हायचं होतं. आमच्याच गावातील एका उंच कड्यावर असलेल्या 500 वर्षं जुन्या 'डेकन चौखरलिंग बौद्ध मठा'त मी काही काळ शिकत होतो. पण मला तिकडचं राहणीमान फारसं रुचलं नाही.

Image copyright Kami Rita Sherpa Archive
प्रतिमा मथळा कामी रीता शेर्पा

मठातून बर्फाच्छादित हिमालयाचं विलोभनीय दृश्य दिसायचं. मला मात्र त्याच्याविषयी प्रचंड आकर्षण होतं. त्यामुळे आपण डोंगरात काम करायचं आणि एक दिवस 'एव्हरेस्ट'वर चढाई करण्याचं स्वप्न मी उराशी बाळगून होतो.

1992मध्ये माझा मोठा भाऊ लाक्पा रीता शेर्पा 'अल्पाईन अॅसेंट इंटरनॅशनल' या कंपनीसाठी 'सिरदार' म्हणजेच 'मुख्य शेर्पा' म्हणून काम करू लागला. माझ्या भावाने मलाही त्याच्यासोबत येण्याचं आणि स्वयंपाकी म्हणून काम करण्याचं निमंत्रण दिलं. त्यावेळी माझ्या भावाच्या इतर साथीदारांसोबत मी 'बेस कॅम्प'वर स्वयंपाकी म्हणून काम करू लागलो.

वयाच्या 15व्या वर्षापासूनच मी ट्रेकिंगला सुरुवात केली. पण गिर्यारोहणाच्या मोहिमांमध्ये शेर्पा म्हणून 22व्या वर्षापासून सहभागी होऊ लागलो. मी मोहिमांवर जायचो तेव्हा माझे आईवडील चिंतेत असायचे. पण ते नेहमीच माझ्या यशासाठी प्रार्थना करायचे.

'शेर्पा म्हणजेच डोंगर आणि डोंगर म्हणजेच शेर्पा'

'शेर्पा म्हणजेच डोंगर आणि डोंगर म्हणजेच शेर्पा,' असं मला वाटतं. हे शेर्पा जेवढे काटक, चिवट आणि कष्टाळू तेवढेच ते अत्यंत हळवे, संवेदनशील आणि श्रद्धाळू असतात.

आम्ही वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षीच टेकड्यांवर चढायला सुरुवात करतो. त्यातूनच आम्हाला आजूबाजूचा परिसर, डोंगरातील लहान-मोठ्या वाटा, झाडाखुडपांची माहिती होते. लहानपणापासूनच अतिथंड हवामानात वावरण्याची सवय झालेली असते.

Image copyright Rajas Deshpande
प्रतिमा मथळा कामी शेर्पा आणि त्यांचा मुलगा लेक्पा शेर्पा

डोंगरात आलेल्या प्रत्येक अडचणीच्या वेळी स्वत:चे निर्णय स्वत:लाच घ्यायचे असतात. त्यामुळे शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक क्षमताही विकसित होते. कुठल्याही कठीण परिस्थितीत तग धरून राहायलाही आम्ही डोंगरातच शिकतो.

डोंगरातील माणसं नेहमीच इतरांना मदत करण्यासाठी तप्तर असतात. शेर्पाचं डोंगरातील ज्ञान म्हणतात ते हेच. या सगळ्याची आम्हाला उंच शिखरांवर चढाई करताना मदत होते.

आम्ही कायमच डोंगरमाथ्यावर आणि थंड हवामानात राहतो. त्यामुळे आम्हाला श्वसनाचा त्रास होत नाही. लहानपणापासून त्याच हवामानात आणि भौगोलिक परिस्थितीत वावरल्यामुळे आम्ही शरीराने आणि मनाने कणखर असतो. शिखरांवर दोर कसा बांधायचा, पुढे मार्गक्रमण करण्यासाठी योग्य वाट कशी निवडायची आणि हवामानाचा अंदाज कसा घ्यायचा, याच्या सखोल ज्ञानामुळे शेर्पा इतरांपेक्षा वेगळे ठरतात.

पहिल्या दोन चढाया अयशस्वी

13 मे 1994. 'माउंट एव्हरेस्ट'वरील माझ्या पहिल्या चढाईचा तो दिवस मला आजही आठवतो. त्या चढाईचा दोर मी स्वत: लावला होता. हवामान चांगलं होतं आणि मी खूप आनंदात होतो. वेगवेगळ्या देशांच्या गिर्यारोहकांचा आमचा जवळपास 14-15 जणांचा गट होता. जवळपास 15 ते 20 मिनिटं आम्ही शिखर माथ्यावर होतो. आम्ही तिथं फोटो काढले आणि आजूबाजूच्या पर्वतरांगा न्याहाळल्या.

Image copyright Rajas Deshpande

त्याआधी 1992-93मध्ये मी एव्हरेस्टवर चढाईचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा केवळ 'कॅम्प चार'पर्यंतच पोहोचू शकलो होतो. 'डेथ झोन'वर ऑक्सिजन अत्यल्प असतो. साधारणतः 200 ते 250 किलोमीटर प्रतितास वेगाने वारा वाहत असतो. अशा वातावरणात निभावून पुढे जाणं कठीण काम असतं. म्हणून तिसऱ्या वेळी चढाई करताना सुरुवातीला मनात थोडी भीतीसुद्धा होती. त्यामुळे तिसऱ्या प्रयत्नात चढाई यशस्वी झाल्याचा आनंद आजही शब्दांत व्यक्त न करता येण्यासारखा आहे.

प्रत्येक चढाईनंतर 'एव्हरेस्ट'ची माफी मागतो

आजवर मी सर्वाधिक वेळा 'एव्हरेस्ट'वर चढाई केलेली आहे. पण प्रार्थना केल्याशिवाय मी एव्हरेस्टच्या माथ्यावर कधीच पाऊल ठेवत नाही.

माथ्यावर जाण्याआधी काही अंतरावर थोडा वेळ थांबून बौद्ध प्रार्थना मनात म्हणतो आणि त्याच्याकडे माफी मागतो - "सागरमाथा, हा माझा व्यवसाय आहे. तुझ्या माथ्यावर पाय ठेवल्याबद्दल आणि मी काही चूक केली असेल तर मला क्षमा कर," माझ्यासोबतच्या शेर्पांनादेखील मी हे शिकवतो.

Image copyright Kami Rita Sherpa/Facebook
प्रतिमा मथळा थामे गाव

बौद्ध धर्माचं प्रतीक असलेली माळ कायम माझ्यासोबत असते. ती माळ माझं संरक्षण करते आणि मला प्रेरणा देते.

एव्हरेस्टवर चढाई करणं सोडणार होतो

आजवर सर्वाधिक वेळा माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली असली तरी डोंगरावरची प्रत्येक चढाई मला आव्हानात्मक वाटते.

2014मध्ये मी एका अमेरिकन टीमसोबत गिर्यारोहकांच्या मोठ्या गटासोबत 'माउंट एव्हरेस्ट'वर गेलो होतो. त्यावेळी चित्रिकरणासाठी आलेले जगातील महत्त्वाच्या प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीसुद्धा आमच्यासोबत होते.

'कॅम्प एक'ला जाण्यासाठी म्हणून पहाटेच शेर्पांची एक तुकडी पुढे निघाली होती. ते पुढे जाऊन वाट मोकळी करणार होते आणि सामान ठेवणार होते.

Image copyright Kami Rita Sherpa Archive

पहाटे साडेपाचच्या सुमारास खुंबू आईसफॉलच्या इथे ढगफुटी झाली. त्यामध्ये पुढे गेलेले शेर्पा अडकले. घटनेची माहिती मिळताच माझा भाऊ लाक्पा रीता, मी आणि इतरांनी मदतीसाठी त्या दिशेने धाव घेतली. जखमींना बेसकँपला घेऊन आलो.

पण या दुर्घटनेमध्ये 16 शेर्पांना आपले प्राण गमवावे लागले. माझ्या टीममधले पाच शेर्पाही त्यात मरण पावले. त्यामध्ये आमचे काकासुद्धा होते.

आपल्याच लोकांचे मृतदेह समोर पाहून मला माझ्याच कामाचा राग आला आणि मी हे काम सोडायचं ठरवलं. पण इतर लोकांनी माझं मन वळवलं. मी एक अनुभवी शेर्पा असल्याची जाणीव करून दिली. माझ्या मित्रांनी आणि कंपनीच्या लोकांनी मला पुन्हा शिखरचढाईसाठी प्रेरणा दिली.

2015 साली नेपाळमध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हादेखील मी डोंगरातच होतो. त्यावेळीही 'एव्हरेस्ट बेसकॅम्प'वरील 19 जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं होतं. आमच्या थामे गावाचीही भूकंपात प्रचंड हानी झाली.

पण 2016च्या मोसमात मी पुन्हा एकदा एव्हरेस्टवर यशस्वीरीत्या चढाई केली. माझ्या क्लायंटला वर जायला मिळणं, हाच माझ्यासाठी सर्वांत मोठा आनंद असतो. मी ज्या टीमसोबत जातो, त्यांच्यापैकी प्रत्येकाचं शिखर गाठणं, हीच मनाला समाधान देणारी गोष्ट असते.

आव्हानांचा सामना करायला आवडतं

'माउंट एव्हरेस्ट'वर नेपाळ आणि चीन, अशा दोन बाजूंनी प्रामुख्याने चढाई केली जाते. त्यापैकी खुंबू आईसफॉलमुळे नेपाळच्या बाजूची चढाई कठीण, आव्हानात्मक आणि मनात धडकी भरवणारी आहे. तर चीनच्या उत्तरेकडील बाजूने होणारी चढाई सोपी आहे.

Image copyright Rajas Deshpande
प्रतिमा मथळा कामी रीता शेर्पा

नेपाळची बाजू चढाईसाठी खूप टेक्निकल आहे तर चीनच्या बाजूने वाऱ्याचा फार त्रास होतो. पण ती बाजू चढाईसाठी सोपी आणि सुरक्षित आहे. पण मला नेहमीच नेपाळच्या बाजूने चढाई करायला आवडतं, कारण मला आव्हानांचा सामना करायला आवडतं.

एका चढाईसाठी अडीच लाख

एव्हरेस्टच्या एका चढाईसाठी आम्हाला अडीच ते तीन लाखाच्या आसपास मानधन मिळतं. जर एखादा VIP ग्रुप असेल तर ही किंमत वाढते. डोंगरातील चढायांसाठी वर्षाला कमीत कमी चाडेचार ते पाच लाख आणि जास्तीत जास्त नऊ ते दहा लाख रुपये आम्हाला मिळतात.

अलीकडच्या काळात अनेक भारतीय गिर्यारोहक 'माउंट एव्हरेस्ट'वर चढाई करू लागले आहेत. माझ्या मते ते चांगले गिर्यारोहक आहेत. पण मला अद्याप त्यांच्यासोबत चढाई करण्याची संधी मिळालेली नाही. तशी संधी मिळाली तर मला आनंदच होईल.

22व्यांदा केलेली विक्रमी चढाई

16 मे 2018ला सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी जगातील सर्वोच्च शिखर 22व्यांदा सर करून जागतिक विक्रमाला गवसणी घातल्याचा मला मला खूप आनंद आहे. विशेष म्हणजे माझ्या या विक्रमाप्रसंगी हवामानानेही उत्तम साथ दिली. यावेळी हवामान खूप चांगलं असल्याने आम्ही तब्बल एक तास 'एव्हरेस्ट' माथ्यावर होतो.

Image copyright Kami Rita Sherpa/Facebook

एव्हरेस्ट माथ्यावर किती वेळ थांबायचं, हे त्या वेळच्या हवामानावर अवलंबून असतं. सहसा पाच ते दहा मिनिटं थांबून ताबडतोब खाली उतरावं लागतं, कारण खराब हवामानात जास्त वेळ थांबलो तर श्वसनाचा त्रास आणि हिमबाधा होण्याची शक्यता असते. पण यावेळी मला जगातील उंच ठिकाणी तब्बल एक तास घालवता आला, हे मी माझं भाग्य समजतो.

त्या एका तासात मी आणि माझ्या सोबतच्या लोकांनी शिखरावर भरपूर फोटो काढले आणि आजूबाजूच्या शिखरांची मनसोक्तपणे पाहणी केली. यावेळी काठमांडूच्या 'सेव्हन समिट ट्रेक्स' या कंपनीतर्फे मी चढाई केली होती.

'सगरमाथा' म्हणजेच 'माउंट एव्हरेस्ट'ला मी देव मानतो. तो मला कधीच कसलीही इजा करत नाही. प्रत्येक वेळी सुखरूप खाली परत आणतो. जगातील सर्वात उंच शिखरावरून खाली पाहण्याची शेखी मिरवण्यापेक्षा, समिट करून पायथ्याशी आल्यावर मान उंचावून त्याच्या भव्यतेकडे पाहायला मला जास्त आवडतं.

मुलांनी शिकावं, या व्यवसायात पडू नये

सध्या मी, माझी पत्नी लाक्पा जाग्मू शेर्पा, मुलगा लेक्पा तेनसिंग शेर्पा (19) आणि मुलगी पासांग डोल्मा शेर्पा यांच्याबरोबर काठमांडूमध्ये राहतो. माझी दोन्ही मुलं महाविद्यालयात शिकत आहेत.

माझ्या वयाचे सर्व शेर्पा हे फार शिकलेले नाहीत. त्यामुळे ते या जीवावर बेतणाऱ्या व्यवसायात आहेत. पण नवीन पिढी शिकतेय. माझ्या मुलांनीही खूप शिकावं आणि मोठ्ठं व्हावं, असं मला वाटतं. माझ्यासारखा जोखमीचा व्यवसाय त्यांनी पत्करू नये.

देशाचं नाव उंचावल्याचा अभिमान

गिर्यारोहणातील शेर्पांच्या योगदानामुळे नेपाळचं नाव संपूर्ण जगात उंचावलं आहे. त्यामुळे मला कायमच शेर्पा कम्युनिटीचा अभिमान वाटत आलेला आहे. जगातील सर्वोच्च शिखरावर सर्वाधिक वेळा जाण्याचा विक्रम माझ्या नावावर जमा झाला असला तरी 22 वेळा नेपाळचा झेंडा एव्हरेस्टच्या माथ्यावर फडकवल्याचा मला जास्त आनंद आहे.

मी काठमांडूमध्ये असताना धावतो, चढाईचा सराव करतो, व्यायाम करतो. माझ्याकडे बाईक आहे, पण तिचा फारसा वापर करत नाही. मी चालण्याला जास्त प्राधान्य देतो, जेणेकरून माझी शारीरिक क्षमता टिकून राहील.

माउंट एव्हरेस्ट ही आमच्यासाठी, देशासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक क्षमता जोवर टिकून आहे, तोवर एव्हरेस्टवर चढाई करतच राहणार.

(बीबीसी मराठीसाठी प्रशांत ननावरे यांचं शब्दांकन)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)