#5मोठ्याबातम्या - शिवरायांच्या पुतळ्याची उंची कसली मोजताय : उद्धव यांची फडणवीसांवर टीका

शिवाजी पुतळा Image copyright Twitter

पाहू या आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.

1. शिवरायांच्या पुतळ्याची उंची कसली मोजताय?

'अहो ते शिवराय आहेत! त्यांच्या पुतळ्याची उंची कसली मोजताय?' असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

सामनाने ही मुलाखत प्रसिद्ध केली आहे. शिवस्मारकाच्या संदर्भात आपल्याशी काही चर्चा झाली नाही, असं उद्धव म्हणाले. "फक्त सुरुवातीला जलपूजनाच्या वेळी मी गेलो होतो. नंतर तिकडे स्मारक कधी होईल, काय होईल, कसे करणार आहेत याची काही कल्पना नाही. मुळात शिवरायांच्या उंचीचे नेतृत्वच नाही. त्यांना स्मारकाची उंचीही पेलवणार नाही", असा टोला त्यांनी लगावला.

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची कमी करून महाराजांच्या हातातील तलवाराची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र मूळ आराखड्याप्रमाणे अश्वारुढ शिवपुतळ्याची एकूण उंची कायम ठेवण्यात आली आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा तपशील प्राप्त झाला आहे. जगातील सर्वाधिक म्हणजे 210 मीटर उंचीच हे शिवस्मारक असणार आहे.

त्यात मूळ आराखड्यात शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची 121 मीटर असेल. त्यात पुतळ्याची उंची 83.2 मीटर आणि महाराजांच्या हातातील तलवारीची उंची 38 मीटर आहे. स्मारकाचा खर्च कमी करण्यासाठी पुतळ्याची उंची 7.5 मीटरने कमी करून तलवारीची लांबी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुतळ्याची उंची 75.7 मीटर आणि शिवरायांच्या हातातील तलवारीची लांबी 45.5 मीटर असेल.

2. मेघा धाडे बिग बॉस विजेती

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा मेघा धाडे

अभिनेत्री मेघा धाडे पहिल्यावहिल्या मराठी बिग बॉस स्पर्धेची विजेती ठरली आहे. पुष्कर जोग आणि मेघा धाडे यांच्यात जेतेपदासाठी चुरस होती. अखेर मेघा यांनी बाजी मारली. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

बिग बॉस मराठीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही हे जाहीर करण्यात आलं.

मुख्य स्पर्धकांसह तीन वाइल्ड एंट्रीसह 18 जणांनी बिग बॉस मराठीमध्ये सहभाग नोंदवला. शेवटच्या टप्प्यात आस्ताद काळे, सई लोकुर, शर्मिष्ठा राऊत, मेघा धाडे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर हे सहा स्पर्धक उरले. सहा स्पर्धकांमधूनच अंतिम विजेता ठरेल असं जाहीर करण्यात आलं.

विजेता ठरल्याने मेघा यांना 18 लाख 60 हजार एवढ्या बक्षीस रकमेसह खोपीलीत आलिशान घर मिळणार आहे.

3. तीन वर्षे विनावापर 'आधार' आता निराधार

Image copyright Huw Evans picture agency
प्रतिमा मथळा आधार कार्ड तीन वर्ष न वापरल्यास ते निराधार होणार आहे.

सलग तीन वर्ष आधारकार्डाचा वापर न केल्यास ते निष्क्रिय करण्याचा निर्णय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) घेतला आहे. त्यामुळे पॅनकार्ड आणि बँक खात्याला आधार जोडणी करणे बंधनकारक करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

आधार आणि पॅन कार्ड यांच्यावरी नाव, जन्मदिनांक, जन्मवर्ष, छायाचित्र या माहितीमध्ये तफावत आढळल्यास त्यांची जोडणी करता येणार नसल्याचंही प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांना पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी जोडणी करण्यासाठी दिलेली मुदत 31 मार्च 2019 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत आधार आणि पॅन क्रमांक जोडणीसाठी तब्बल पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. हीच मुदत आता 31 मार्च 2019 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

दरम्यान बँक खातं, मोबाईल सिमकार्ड, एलपीजी गॅस सिलिंडर अनुदान, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली आहे. आधार कार्ड सक्तीचे करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, अद्याप निर्णय झालेला नाही.

सलग तीन वर्ष आधारचा वापर न केल्यास ते निष्क्रिय करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचं प्राधिकरणाकडून पाठवण्यात आलेल्या इमेलमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

4. मृतांच्या नातेवाईकांची दगडफेक; 13 पोलीस जखमी

सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या सचिन जैसवार (17) या तरुणाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर घेराव घेतला. पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करत नातेवाईकांनी त्याचा फोटो घेण्यासाठी रुग्णालयात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखल्याच्या रागात जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला.

या घटनेमुळे रुग्णालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात 5 पोलीस वाहनांचे नुकसान झाले तर 13 पोलीस जखमी झाले. याप्रकरणी सायन पोलिसांनी 100 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 'लोकमत'ने याबाबत बातमी दिली आहे.

5. 'अॅलेक्सा'च्या निर्मित्तीत भारतीय तंत्रज्ञाचं योगदान

अॅलेक्सा या अमेझॉनतर्फे तयार करण्यात आलेल्या 'स्मार्ट असिस्टंट' यंत्राच्या निर्मितीत भारतीय तंत्रज्ञ रोहित प्रसाद यांचा मोलाचा वाटा आहे. रोहित मूळचे झारखंडमधील रांचीचे आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अॅलेक्सा

प्रसाद आणि त्यांचे सहकारी टोनी रेड यांनी अलेक्सा हे बहुपयोगी मशीन तयार केलं. प्रसाद यांचं शिक्षण डीएव्ही हायस्कूलमध्ये झालं. इंजिनियरिंगचं शिक्षण त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पूर्ण केलं. इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन्सचं शिक्षण घेतलेल्या प्रसाद यांनी अमेरिकेतील इलिनॉइस इन्स्टियूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी MSचं शिक्षण पूर्ण केलं. वायरलेस अप्लीकेशनच्या लो बिट रेट स्पीच कोडिंग हा त्यांच्या खास अभ्यासाचा विषय आहे.

14 वर्ष त्यांनी रायथॉन कंपनीच्या बीबीएन टेक्नॉलॉजीसाठी काम केलं. 2013 पासून ते अमेझॉनमध्ये कार्यरत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी अलेक्सा मशीनसाठी काम करायला सुरुवात केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)