मेघा धाडे हिंदी बिग बॉसमध्ये; वाईल्ड कार्ड एन्ट्री

  • समृद्धा भांबुरे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली मेघा धाडे

फोटो स्रोत, Twitter/meghadhade

फोटो कॅप्शन,

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली मेघा धाडे

मराठी बिग बॉसचं पहिलं पर्व गाजवणारी आणि शो जिंकणारी मेघा धाडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळीही ती 'बिग बॉस'च्याच घरात दिसणार आहे. पण थेट हिंदी 'बिग बॉस'मध्ये.

मेघाला 'कलर्स चॅनल'वर सुरू असलेल्या हिंदी 'बिग बॉस' सीझन-12मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली आहे. आज, सोमवारी होणाऱ्या एपिसोडमध्ये ती बिग बॉसच्यामध्ये 'गृहप्रवेश' करणार आहे. त्यामुळे, मराठी प्रमाणेच हिंदी बिग बॉसमध्ये मेघा काय धम्माल करणारे याच्याबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

खडतर प्रवास

"सुरुवातीला घरच्यांचा माझ्या करियरला प्रचंड विरोध होता. घरातल्यांचा पाठिंबा नसेल तर त्या वयात आपल्या हातून अनेक चुका होता. तशीच एक चूक माझ्याकडूनही झाली. मी कुमारी माता झाले. मी आई झाल्यावर चार महिन्यातच माझे वडील वारले. 'माझ्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला,' असं सगळे मला बोलू लागले."

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेनं सिझनच्या तिसऱ्याच भागात आपल्या आयुष्याचा सगळ्यांत महत्त्वाचा भाग निडरपणे सगळ्यांसमोर सांगितला.

"माझ्या माथी तो कलंक लागला आहे. माझ्या भावानं माझ्याशी बोलणं टाकलं, पण आईनं मला साथ दिली. माझ्या पोरीला तिनं पदरात घेतलं. तू खुशाल करिअर कर, असं मला तिनं सांगितलं."

मेघा बिग बॉसच्या घरात जितकी वादळी ठरली तितकंच तिचं खासगी आयुष्यसुद्धा वादळी आहे.

ती कुमारी माता झाली. या काळात घरच्यांच्या तीव्र विरोधाला आणि आरोपांना तिला सामोरं जावं लागलं. पण यातून तिनं जिद्दीनं मार्ग काढला नि पुढे आली.

फोटो स्रोत, Megha Dhade/Facebook

'मी जिंकले यावर अजूनही विश्वास बसत नाही'

"मी अनेक वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं, याचा मला खूप आनंद आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा भाग होण्याची संधी मिळाली आणि आता मी हे पर्व जिंकले आहे, यावर मला विश्वासच बसत नाहीये," असं मेघा मीडियाशी बोलताना सांगते.

"या प्रवासामध्ये मी बऱ्याच गोष्टी शिकले, बरचं काही कमावलं आहे. हे 100 दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. या प्रवासात मला तीन जीवाभावाचे मित्र भेटले - पुष्कर, सई आणि शर्मिष्ठा. हा प्रवास अप्रतिम होता असंच मी म्हणेन."

शोच्या सुरुवातीपासूनच मेघा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली आणि हेच तिच्या विजेतेपदासाठी कारणीभूत ठरलं, असं म्हणता येईल.

तिच्या रोखठोक बोलण्यामुळे 'बिग बॉस'च्या घरात तिच्यावर अनेकदा टीका झाली. प्रत्यक्ष आयुष्यातही मेघा याच स्पष्टोक्तेपणासाठी ओळखली जाते.

शाळेत होती, तेव्हापासूनच मेघाला अभिनयात रस होता. शाळेतल्या अनेक नाटकात ती भाग घ्यायची.

एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत तिला पहिला ब्रेक मिळाला. या मालिकेनं मेघा चर्चेत आली घराघरात पोहोचली. यानंतर तिनं अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं.

याशिवाय तिने काही चित्रपटांची निर्मितीही केली, पण त्यात तिला यश आलं नाही.

फोटो स्रोत, Megha Dhade/Facebook

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

मेघाचा अपघात झाला आणि तिनं सिनेसृष्टीपासून फारकत घेतली. 'बिग बॉस'च्या घरात आऊ अर्थातच उषा नाडकर्णींशी बोलताना तिनं या गोष्टींचा उल्लेख केला होता.

"मला पैशांसाठी नाही तर माझी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पुन्हा सिनेसृष्टीत 'कम बॅक' करायचं आहे. त्यामुळेच खूप विचारपूर्वक पुढचे प्रोजेक्ट्स निवडणार" असल्याचं तिनं सांगितलं.

फिक्सिंग केल्याचा आरोप

बिग बॉसचा शो जिंकल्यानंतर सोशल मीडियावरून मेघावर जेतेपदासाठी फिक्सिंग केल्याचे आरोप झाले. याबाबत आम्ही मेघाच्या प्रसिद्धीचं काम पाहणारी PR एजन्सीशी संपर्क साधला.

मेघा शोमध्ये जाण्याआधी तिचे जेमतेम तीन हजार इन्स्टाग्राम फॉलोवर्स होते. पण आता त्यांची संख्या 50 हजारावर पोहोचली आहे. यामध्ये तिच्या शोमधल्या पॉप्युलॅरिटीचा मोठा वाटा आहे, असं या PR एजन्सीच्या पीयूष सुप्रिया यांनी सांगितलं.

"बिग बॉसच्या घरात ती रोज सकाळी जो डान्स करायची, तिचे जे काही नवीन लुक्स असायचे, तेच आम्ही प्रमोट करायचो," असं पीयूष सांगतात.

"यासाठी आम्ही कोणाबद्दलही काही वाईट प्रमोट केलं नाही. मला धमक्यांचेही कॉल आले. आमच्यावर फेक अकाउंट तयार केल्याचेही आरोप झाले, पण हे सगळे खोटं आहे. मेघा शोमध्ये इतकी पॉप्युलर होती की फेक किंवा फिक्सिंगचा प्रश्नच येत नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)